भुताटकीचा धडा
भुताटकीचा धडा गावाकडच्या घरी एका सावकाराकडे असलेल्या कोंबडेरावांचा थाट काही और होता. उंचापुरा, डौलदार आणि त्याचा तो भरदार तुर्रा ! तो चालायचा तेव्हा जणू एखाद्या राजाची स्वारी निघाल्यासारखी वाटे. सावकाराच्या घरातील इतर कोंबडे, कोंबड्या, बदकं, कुत्रे, मांजरी, गाढवं या कोंबडेरावाला जरा वचकून असत. हे कोंबडेराव सावकारांचे फार आवडते. कुणीही पाहुणे त्यांच्याकडे आले की सावकार कोंबडेरावांची विशेष ओळख करुन देत. येणारा प्रत्येक पाहुणा कोंबडेरावांचं मनसोक्त कौतुक करायचा. त्याच्या जागी दुसरं कुणी असतं तर या अशा कौतुकानं शेफारुनच गेला असता. त्याला गर्वही झाला असता. पण कोंबडेरावांचं तसं काही झालं नाही. त्याचे पाय जमिनीवरच राहिले. तो सावकारांचा आवडता असल्याने त्याला इतर प्राण्यांपेक्षा, ते त्याला चांगलं खाऊ पिऊ घालत. काजू-बदाम देत. आपल्या सोबत्यांसोबत खान्यापिन्याचा बाबत सावकार भेदभाव करतात हे बघून कोंबडेरावांना वाईट वाटे. यातून त्याने आपल्या बुध्दीने एक मार्ग काढला. तो सावकारांची नजर चुकवून त्याला मिळालेले काजू-बदाम आलटून पालटून घरातील इतर कोंबड्या, बदकं, कुत्रा,गाढव आणि मांजरी...