अपयशाचा मित्र?
अपयशाचा मित्र ? मी तेव्हा ११वीत होतो. धडपड्या आणि खटपट्या माझा स्वभाव. त्यातूनच मी काहीबाही उद्योग करायचो. अर्थातच चांगल्या अर्थानं. मी तेव्हा गुगल प्ले स्टोअरसाठी एका ॲपची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासमंडळ आणि सहयोगी किंवा मित्र मिळवून देण्याचा प्रोग्रॅम मी विकसित केला. वेळोवेळी मला खाऊ आणि बक्षीसांसाठी मिळालेले ११ हजार रुपये, खर्च न करता साठवून ठेवले होते. त्याचा उपयोग हा ॲप तयार करण्यासाठी झाला. हा ॲप मी प्ले स्टोअरवर ठेवला. पहिल्या तीन तासातच त्याचे १५ हजार डाऊनलोड झाले. हा ॲप पाच दिवस धडधाकटपणे चालला. पाचव्या दिवशी डाऊनलोडची संख्या ३० हजारावर पोहचली. मला मिळालेल्या सर्व्हरला हे ओझं म्हणा की दाब म्हणा सहन करणं शक्य झालं नाही. मला सर्व्हरवर अधिक जागा हवी होती. ती घेण्यासाठी निधी म्हणजेच पैशांची गरज होती. माझी सगळी बचत संपलेली. मी कोरडा ठणठणीत ! आता काय करायचं ? मला प्रश्न पडला. इकडेतिकडे धावाधाव सुरु केली. अनेक मोठमोठ्या कंपन्याच्या बॉसेसना इमेल पाठवले. अशा नव्या आणि नावीण्यपूर्ण उद्योगांना मदत करणाऱ्या गुंतवणुकदारांना ईमेल केले. पण कुणाचाही प...