ट्रिक्सपेक्षा संकल्पना महत्वाच्या!

ट्रिक्सपेक्षा संकल्पना महत्वाच्या!

बारावीतील विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या असलेल्या बोर्डाच्या परीक्षेची तारीख गेल्याच आठवड्यात जाहीर झाली. १२ वीनंतर वेगवेगळया शाखेतील प्रवेशासाठीच्या कॉमन एंट्रस टेस्ट (सीईटी) च्या तारखेचीही घोषणा झाली आहे. नीट आणि जेईई परीक्षेची घोषणा झाली आहे. याचा अर्थ, घोडा मैदान अगदी जवळ आलं आहे.

विद्यार्थ्यांचा अभ्यास जोरात सुरु असलेच. या क्लासमधून त्या क्लासमध्ये सारखी धावाधाव सुरु असणार. ही टेस्ट, ती टेस्ट अशा वेगवेगळया चाचणी परीक्षा त्यांना द्याव्या लागत असणार. हे चक्र स्वत:हून स्वीकारलं असल्यानं त्यातून शेवटच्या क्षणी बाहेर पडणं शक्य नाही आणि रडत बसणंही योग्य नाही. त्यामुळे पुढील काळात अधिकाधिक लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं पाहिजे.

पूर्ण सत्य नाही.

शिकवणी वर्गांमध्ये तर त्याचसाठी जातो ना, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असणार. ते काही अंशी खरं असलं तरी पूर्ण सत्य नाही. शिकवणी वर्गामध्ये, अभ्यासासाठी कमी आणि अधिकाधिक गुण कसे मिळवता येतील याचे ट्रिक्स आत्मसात करण्यासाठी जातो, हे वास्तव स्वीकारायला हवे. सीईटीमध्ये अधिकाधिक गुण मिळवून मनाजोगती शाखा आणि महाविद्यालय मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. पण फार कमी विद्यार्थ्यांना यात यश मिळतं. अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन लावलेले शिकवणी वर्गच अधिकाधिक गुण मिळण्याच्या वाटेत काटेरी कुंपन तयार करतात. हे कसं? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल.

मूळ अभ्यासाकडे दुर्लक्ष

तर मित्रांनो, अधिकाधिक गुण मिळवण्याच्या ट्रिक्स सांगण्याच्या भरात बहुतेक सगळ्या शिकवणी वर्गांमध्ये मूळ अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. याचा अर्थ असा की पाठ्यपुस्तकातले संपूर्ण धडे नीट समजावून सांगितले जात नाहीत. धड्यात येणारे कठीण शब्द, संकल्पना समजावून सांगितल्या जात नाहीत. पाठांतरावर भर द्या, असं सारखं सांगितलं जातं. पाठांतराने व्याख्या मेंदुत पक्की कोरली जाईल. मात्र त्या व्याख्येच्या दोन ओळींमध्ये नेमका काय अर्थ दडलाय हे कळत नाही. हे न कळणं म्हणजे संकल्पना स्पष्ट नं होणं.

संकल्पना स्पष्ट नसेल तर गुण मिळवण्यासाठी झगडावं लागतं. वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह पध्दतीचे प्रश्न सीईटीमध्ये विचारले जातात. हे प्रश्न काही सरधोपट असत नाहीत. मुलांच्या बुध्दीचा कस लागेल असेच ते प्रश्न असतात. या प्रश्नांच्या उत्तराचे चार पर्याय समोर असले तरी संकल्पना स्पष्ट नसल्यास या उत्तरांमधून अचूक उत्तर शोधनं कठीणं जावू शकतं. आता चार पर्यायांपैकी तीन चूक आणि एक बरोबर असे पर्याय राहतीलच असे नाही. चारही पर्याय बरोबर राहू शकतात. त्यातून सर्वाधिक अचूक पर्याय निवडायचा असतो. संकल्पना स्पष्ट नसेल तर मग या सर्वाधिक अचुक उत्तराच्या जवळ जाणं कठीण जातं. शिकवणी वर्गातील शेकडो चाचण्या, त्यातील गुण, अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी सांगितलेल्या ट्रीक्स सारे काही कुचकामी ठरतात.

 

संकल्पना स्पष्ट हव्यात

सीईटीमध्ये अधिकाधिक गुण मिळवायचे असेल तर, शिकवणी वर्गातील ट्रिक्सपेक्षा अभ्यास घटकातील संकल्पना स्पष्टपणे समजणं महत्वाचं ठरतं.

संकल्पना स्वयंस्पष्ट समजणं याचा अर्थ, कोणतीही शंका मनात नसणं, या संकल्पनेवर आधारित कसाही आडवा तिडवा प्रश्न विचारला गेला तर तो सोडवता येणं, उत्तर शोधताना किंवा काढताना कोणताही गोंधळ न उडणं, असा होतो.

संकल्पना समजून घेण्यासाठी अभ्यासातील सर्व घटक वाचायला हवेत. हा महत्वाचा, तो कमी महत्वाचा किंवा तो बिन महत्वाचा असे करु नये. सीईटी पेपर काढणाऱ्यांसाठी सगळे विषय घटक हे महत्वाचे असतात. गेल्या वर्षी एखाद्या घटकावर प्रश्न विचारले म्हणून यंदा त्याच घटकावर प्रश्न विचारले जाणार नाहीत असं समजू नये. सीईटी पेपर काढणारे तज्ज्ञ मंडळी गेल्यावर्षी किंवा त्याच्या गेल्यावर्षी, असं काही बघत नाहीत. विद्यार्थ्यांची सर्वांगीन आकलन क्षमता तपासण्यासाठी ते प्रश्नपत्रिका तयार करतात. त्यामुळे ते कोणत्याही घटकावर प्रश्न विचारु शकतात.

शिकवणी वर्गांमध्ये काही विषय घटकांवर अत्याधिक भर दिला जातो तर काही विषय घटकांच्या तोंडाला पाणी पुसलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जागरुक राहणं आवश्यक ठरतं. त्यासाठी बोर्डाने तयार केलेली विषयांची पुस्तकं मुळापासून वाचायला हवित. मुळापासून याचा अर्थ धड्यातील प्रत्येक शब्द नि शब्द. तसे केले तरच त्या धड्यातील कठीण शब्द, व्याख्या, सूत्रं हे लक्षात येतील. त्यापैकी जे कळणार नाही ते शिकवणी वर्गातील सरांना विचारायला हवं. एकदा त्याचं स्पष्टीकरण आल्यावर तेही कळलं नाही तर पुन्हापुन्हा विचारायला हवं. असं समजून उमजून पुढे गेलो नाही तर भरधाव निघालेली गाडी कुठे आणि कशी पंक्चर होईल, हे सांगता यायचं नाही. बहुतेक विद्यार्थी विषय घटकांच्या संकल्पना समजून घेणं म्हणजे वेळ वाया घालवणं असं समजतात. यात त्यांचं नुकसान होतं. पेपर खूप कठीण होता किंवा पेपरमध्ये अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न आले होते. अशी आरडाओरड होते. प्रत्यक्षात तसं अपवादानच होतं. एरव्ही पेपर हा अभ्यासक्रमावरच आधारलेला असतो. विषय घटकांच्या बाहेरच्या घटकांचा अजिबात विचार केला जात नाही.  ही बाब विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावी.

स्वत:चे वेळापत्रक

सीईटीच्या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना १२० ते १५० दिवसांचा कालावधी मिळू शकतो. या कालावधीत शिकवणी वर्गात बऱ्याच चाळण्या होतील. या चाळण्यांमध्ये प्रत्येक वेळी चांगले गुण मिळाले तर ते उत्तमच. कारण त्यामुळे मनात नकारात्मक विचार येत नाहीत. पण या चाळण्यामंधील हे उत्कृष्ट गुण काही सीईटी परीक्षेतही उत्तम गुण मिळवून देण्याची हमी देऊ शकत नाहीत. शिकवणी वर्गात विशिष्ट पध्दतीनं शिकवलं जातं व तशाच विशिष्ट पध्दतीनं प्रश्नपत्रिका काढल्या जातात. त्यांचा वारंवार सराव केल्यानं त्यात गुण मिळणं सुलभ जाऊ शकतं, ही बाब लक्षात ठेऊन विद्यार्थ्यांनी विषय घटकांच्या संकल्पना सर्वांशानं समजून घ्यायला प्राधान्य दिलं पाहिजे.

राज्य शासनाच्या सीईटी सेलकडून काही नमूना प्रश्नपत्रिका प्रकाशित केल्या जातात. त्या संकेतस्थळावरही ठेवल्या जातात. गेल्या वर्षीच्या किंवा त्याच्या आधीच्या वर्षिच्या अशा प्रश्न पत्रिका सोडवण्याचा सराव करावा. जे प्रश्न सोडवताना कठीण जातात, त्याची उत्तरं शोधण्यासाठी शिकवणी वर्गातील किंवा शाळेतील शिक्षकांकडून समजून घेतलं पाहिजे. त्यात काही वावगं वाटून घेऊ नये.

१२० ते १५० दिवसांमध्ये विषयानुसार स्वत:चं वेळापत्रक बनवावं. आपणास जे विषय कठीण वाटतात त्याला अधिक वेळ द्यावा. मात्र एखादा विषय सोपा जातो म्हणून त्याला अजिबातच वेळ न देण्याची चूक करु नये. सोपे विषयसुध्दा परिपूर्ण समजून घेतले पाहिजे. भाषेचा अभ्यास हा केवळ किमान गुण मिळण्यापुरताच करायला हवा, अशी एक चुकीची समजूत आहे. कारण पुढे पदवी अभ्यासक्रमात भाषेचा उपयोग उत्तम संवादकौशल्य आत्मसात करण्यासाठी होतो. ज्याचे संवादकौशल्य आणि सादरीकरण उत्तम असते त्याला यश मिळणं सोपं जातं. भाषा आणि संवादकौशल्याच्या अभावामुळे चांगल्या रोजगार संधी हातातून जाऊ शकतात. या बाबी लक्षात ठेऊन पुढील १२० ते १५० दिवसांठीचं अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजं. वेगवेगळया शिकवणी वर्गात कितीही व्यस्त असलो किंवा सारखी पळापळ करावी लागत असली तरी पाठ्यपुस्तक मंडळाची सर्व विषयांची पुस्तकं संपूर्णपणे वाचून काढण्यासाठी वेळ काढायलाच हवा. जे असा वेळ काढतील त्यांना सीईटी आणि पुढेही चांगलं यश मिळेल. जे वेळ काढणार नाहीत, त्यांचा अडथळ्याचा प्रवास कधी संपेल हे सांगता यायचं नाही.

सुरेश वांदिले


Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!