उघडा डोळे बघा नीट..
उघडा डोळे बघा नीट.. कुंभलगडच्या किल्ला बघत असताना एका दालनात तेजोमयी थबकली. त्या दालनात रंगवलेली सर्वच्या सर्व चित्रं फक्त हत्तींची होती. हत्तीशिवाय दुसऱ्या प्राण्यांची चित्र कां बरं काढलं नसतील इथं... असा प्रश्न तेजोमयीच्या मनात आला. तिने तो बाबांना विचारला. तेव्हा कुठे बाबा आणि सोबतच्या काका काकूंच्या लक्षात या दालनातील हत्तीच्या चित्रांचं वैशिष्ट्य लक्षात आलं. तेव्हा साऱ्यांनी पुन्हा एकदा त्या चित्रांकडे काळजीपूर्वक बघितलं. चारही भिंती हत्तींच्या चित्रांनी व्यापलेल्या होत्या. एकाहून एक धिप्पाड हत्ती रागावलेले दिसत होते. काहींचा राग अनावर झाला होता. काही हत्ती दुस-या हत्तींसोबत लढत होते. जणू काही दोन शत्रू एकमेकांसमोर उभे ठाकून लढताहेत, असं ती चित्र बघून वाटत होतं. या चित्रातील एकही हत्ती शांतपणे बसलेला नव्हता. रागावलेले हत्ती आपला राग एकतर झाडांच्या बुंध्याना धडका देऊन काढत होते. सोंड उंच करुन चित्कार करुन राग दर्शवत होते. सोंडेत ओंडके पकडून दुसरीकडे फेकण्याची कृती करत होते, किंवा एकमेकांवर धावून जात होते. काही निव्वळच इकडून तिकडे निरर्थक धावताना दिसत ह...