शहाणी लेक आजोबांची....
शहाणी लेक आजोबांची....
तेजोमयीच्या आजोबांची एक लाडकी मनीमॅंऊ होती. कॉलनीच्या
दाराजवळ ती आजोबांना भेटली..
आजोबा दररोज सकाळी फिरायला जात. एके दिवशी ही मनीमँऊ,
तेव्हा कदाचित एक किंवा दोन दिवसांची असावी. ती भिरभिरत्या नजरेनं इकडे तिकडे
बघताना आणि मध्येच स्वत:चा तोल घालून बसताना आजोबांनी बघितलं. तिची आई आजूबाजूला
दिसत नव्हती. याचा अर्थ तिला, आई सोडून गेली असावी किंवा ही आईपासून भरकटली असावी,
असा विचार आजोबांच्या मनात आला. ते अर्धा तास त्या ठिकाणी थांबले. पण मनीमँऊची आई
काही तिथे आली नाही. याचा अर्थ हे पिल्लू हरवल्याचं आजोबांच्या लक्षात आलं.
त्यांनी मग या पिल्लूस अलगद पकडून घरी आणलं. तिचं
अंग कोमट पाण्यानं धुतलं. तिला दूध पाजलं. लगेच ते पिल्लू आजोबांच्या हातावरच
झोपून गेलं .
आजोबांनी तिच्यासाठी बिछाना केला. त्यावर तिला हळुवार
ठेवलं. रात्रीसुध्दा त्यांनी तिला आपल्या खोलितच ठेवलं. पहिल्या रात्री तर ते
अक्षरश: जागलेच.
दुस-या दिवशी मनीमँऊस चांगलीच तरतरी आली. आजोबा
दिसताच ती त्यांच्याकडे झेपावली. तिने आजोबांना बरोबर ओळखलं. तिला आता पुन्हा
कालच्या जागेवर नेऊन ठेवायचं का? असं आजोबांनी आजीला
विचारलं. तुमचं तुम्ही बघा असं आजीचं यावरचं उत्तर होतं. याचा अर्थ तिला मनी मँऊचं
घरी येणं फारस आवडलं नव्हतं. पण तिला टाकून द्यावं असंही वाटत नव्हतं. हे
आजोबांच्या लक्षात आलं. त्यांनी मग मनीमँऊस घरीच ठेवायचं ठरवलं.
ते तिच्यासोबतच खेळायचे, तिला आंघोळ घालायचे, तिला
खाऊ-पिऊ घालायचे. तिचे केस विंचरायचे. कधी कधी तर तिला रिबीन बांधून सजवायचे. हळूहळू
मनीमँऊ मोठी होत गेली. आता तर ती आजोबांच्या गळयातील ताईतच बनली. आजी मात्र
तिच्यावर माया लावायची नाही. ती सुध्दा आजीपासून फटकून राहायची. मात्र आजोबा आणि
मनीचे खेळणं, लाडावणं याकडे कौतुकानं बघायची. तू सुध्दा सामील हो गं आमच्यात असं
आजोबा अनेकदा म्हणायचे, पण आजी आपली चार हात दूरच राहायची.
मनी आणखी मोठी झाली. डौलदार झाली. कधीकधी एकटीच
बाहेरही जाऊ लागली. जाताना ती आजोबांच्या समोर उभी राहायची. त्यांच्याकडे बघून मग
जायची. त्या दोघांमध्ये काय आणि कसा संवाद व्हायचा हे दोघांनाच ठाऊक. पण मनी
आजोबांची परवनागी घेत असावी आणि आजोबा हो- नाही करत तिला, जा बाई, पण लवकर ये असे
सांगत असावेत.
असेच दिवस जात होते. मनीमॅंऊने एकदा खूप बाळांना
जन्म दिला. तेव्हा तिचं सारे काही आजोबांनी केलं. इवल्या इवल्या पिल्लांनी घर
नुसतं भरुन गेलं. गजबजून गेलं. आजोबा त्या पिल्लांना सांभाळत. त्यांची आंघोळ करत.
त्यांना टॉवेलने पुसत.
हळूहळू पिल्लं मोठी होऊ लागली. काही दिवसांनी
प्रश्न निर्माण झाला की आता या सर्व पिल्लांचं काय करायचं? इतकी पिल्लं तर घरी ठेवणं तर शक्य नव्हतं. मात्र, लाडक्या मनीची पिल्लं बाहेर सोडून
देण्याचा विचार मनात आला तरी आजोबांना गलबलून यायचं. त्यांच्या डोळयातून अश्रू गळू
लागायचे.
आता काय करायचं? एके
दिवशी आजोबांनी आजीला विचारलं..
आजीला मनी आवडत नसली तरी, आजोबांचं तिच्यावरचं निर्वाज्य प्रेम तिला ठाऊक
होतं. आता मनिच्या मुला-मुलिंना इकडे तिकडे जाऊ देण्याचा विचार आजोबांसाठी किती
त्रासदायक असेल, हे आजीच्या लक्षात आलं....
तिने काही वेळ विचार केला आणि आजोबांना म्हणाली..
अहो, तुम्ही मनीलाच कां विचारत नाही.
हे ऐकून आजोबांना आश्चर्य वाटलं. मनी आवडत नाही
म्हणून ती अशी उपहासानं बोलतेय असं आजोबांना वाटलं. त्यांनी डोळे मिटून घेतले.
आजोबांच्या मनात मनात काय चाललय हे आजीच्या लक्षात
आलं.
अहो, मी काही उपहासानं किंवा तुच्छतेनं नाही
म्हणाले. तुमचा मनीवर आणि मनीवर तुमचा जीव आहे. तुम्ही बरेचदा बोलता किंवा एकमेकांच्या
डोळयात बघता, तेव्हा एकमेकांना काय सांगायचं हे कळतं ना.. हे मी बघितलय.. तुम्हास
सुध्दा ठाउुकाय ते..म्हणून मी म्हणाले. मनीशी बोला किंवा तिला सांगा..तिला न
सांगता तिच्या पिल्ल्यांना कसं बाहेर काढणार बरं....आजी म्हणाली.. आजोबांनी डोळे
उघडले. आजीचं म्हणणं बरोबरच होतं. हे आपणास कां सुचल नाही याचं त्यांना आश्चर्य
वाटलं.
दुपारचं मनीच खानंपिणं झाल्यावर आजोबांनी मनीला
जवळ घेतलं..
आणि एखाद्या मोठ्या माणसाला जसं सांगतात तसं तिला
पिल्लांबद्दल समजावून सांगितलं. मनी त्यांच्या डोळयाला डोळा भिडवून सारं काही ऐकत
होती. एकदाही तिची पापणी हलली नाही. पण आजोबांचं बोलणं संपलं तेव्हा तिच्या
डोळयातून अश्रू पडताहेत आणि तिला गहिवरुन आलयं असं आजोबांना जाणवलं. त्यांनी तिला
आपल्याजवळं घेतलं. तिच्या अंगावरुन किती तरी वेळ ते मायने हात फिरवत
राहिले....त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
आपण किती वाईट आहोत असंच मनीला वाटत असणार असं
सारखं सारखं त्यांना वाटू लागलं. त्या रात्री ते नीट जेवलेही नाही. मनीचही जेवणात
लक्ष नव्हतं. आपल्या पिल्लांकडे मात्र वारंवार ती जात राहिली.
मध्यरात्रीपर्यंत आजोबांना झोप लागली नाही. मात्र
कधीतरी त्यांचा डोळा लागला..
सकाळी जागे झाल्याबरोबर ते मनीच्या खोलित गेले. तेथील
दृष्य बघून थक्कच झाले. मनी शांतपणे झोपली होती. तिच्या कुशीत फक्त एकच पिल्लू
होतं..
आजोबांनी तत्काळ आजीस बोलावलं तिला ते दृष्य
दाखवलं...
आजीही आश्चर्यचकित झाली.. आजोबांना म्हणाली..
अहो, तुमच्यासारखीच ही तुमची लेक शहाणी ...काल
तुम्ही तिला समजावलं आणि बघा, तिनेच समजुतदारपणे आपल्या पिल्लांना सुरक्षितपणे
नेऊन ठेवलं...
आपल्या समजुतदार लेकिकडे आजोबा कितीतरीवेळ एकटक
बघत राहिले...
सुरेश वांदिले
0000
Comments
Post a Comment