संकटमोचक
संकटमोचक तेजोमयीच्या कॉलनितील पहिल्या मजल्यावरील मुनघाटे काकांनी नवी गाडी घेतली. त्यांनी कॉलनितील मित्र-मंडळींना गाडी बघण्यासाठी बोलावलं. तेजोमयी आणि बाबा एके दिवशी ही गाडी बघायला खाली गेले. पाठीमागे अलेक्झांडर महाशय होतेच. मुनघाटे काकांनी उत्साहाने गाडी दाखवली. गाडीच्या आतमध्ये कोणत्या नव्या सुविधा आहेत , याची माहिती दिली. गाडी एकदम भारी होती. तेजोमयीला फार आवडली. अलेक्झांडरनेही लांब जिभ करुन गाडीत डोकावून घेतले. तो गाडित शिरुन मउुशार गादी खराब करेल अशी काकांना भीती वाटली असावी , त्यामुळे अलेक्झांडरला जरा बाजूला कराना , असं हळूच त्यांनी बाबांना सांगितलं. बाबा अलेक्झांडरला हटकण्याच्या आधीच त्याने शहाण्यासारखं गाडीत डोकावणं सोडून दिलं. मुनघाटे काका , बाबा आणि तेजोमयी बोलत असताना , अलेक्झांडर गाडीसमोर जाऊन उभा राहिला. गाडीच्या समोर एका दांड्याला लटकवलेल्या लिंबू-मिरचीकडे एकटक बघू लागला. त्याच्या या एकटक बघण्याकडे तेजोमयीचं लक्ष गेलं. तिही त्याच्याकडे गेली. एक लिंबू आणि दोनतीन मिरच्या एका दोरित ओवून , हारासारखं दांड्याला मधोमध लटकावलं होतं. हवेमुळे ते इकडे तिकडे हलायचं. ...