निको आणि गोष्ट
निको आणि गोष्ट निको म्हणजे रश्मीचा शेपूटवाला दोस्त. तो जेव्हा रश्मीच्या घरी आला तेव्हा तो अगदीच छोटा होता. एखाद्या दिवसाचा असेल. त्याच्या आईनं त्याला जन्म दिला आणि ती तिच्या इतर पिल्ल्यांसह कुठेतरी निघून गेली. हा राहिला मागे. बाबांनी त्याला जेव्हा रस्त्यावर बघितलं, तेव्हा हा भेदरलेला आणि गलितगात्र झाला होता. काय करावं हे त्याला कळत नव्हतं. त्याची ती केविलवाणी स्थिती बघून बाबांच्या ह्रदयाला पाझर फुटलं. त्याला ते घरी घेऊन आले. घरातील सर्वानांच त्याची अवस्था बघून फार वाईट वाटलं. आईने त्याला स्वच्छ धुतलं. त्याला दूध पाजलं. त्यामुळे त्याला थोडी तरतरी आली. भिरभिरत्या नजरेनं तो इकडे तिकडे बघू लागला. उठायचा प्रयत्न केला की लुडकून जायचा. आई त्याच्या सेवेतच होती. तिने त्याला आणखी दूध दिलं. खायला पोळी दिली. त्याला आणखी बरं वाटलं असावं. त्याने सगळयांकडे प्रेमानं बघून शेपटू हलवली. त्याला उभंही राहता आलं. तो आता इकडे तिकडे चालू लागला. छोट्या रश्मीशी त्याची पटकन गट्टी जमली. ती त्याच्याशी बराच वेळ खेळत राहिली. तोही चांगला रमला. रात्री पुन्हा आईने त्याला दूध-पोळी दिली. त्याला झोप...