साराची भिंत


 

साराची भिंत

साराच्या घरी केव्हाही जा. सर्वत्र पसारा पसरलेला. कुठलही सामान जागच्या जागी नाही. शिवाय घराच्या सर्व भिंती रंगवलेल्या. त्यात उभ्या आडव्या रेषा, वेगवेगळया आकृत्या, पशू-पक्षांची चित्रे होतीच शिवाय एक सुंदरसी बाहुलीही सर्वत्र रेखाटलेली होती. अस्ताव्यस्त सामान आणि रंगवलेली भिंत याचं साराच्या आईबाबांना काहीच कसं वाटत नसेल, हा प्रश्न एकदा त्यांच्याघरी आईबाबा आणि अलेक्झांडरसोबत गेलेल्या तेजोमयीस पडला. तिने आईला हलकेच कानात विचारलं.

काय विचारतेय आमची तेजो डॉल तुम्हाला,साराच्या आईनं हसत विचारलं.

काही नाही हो,असचं आपलं.

आपलं काय?साराच्या बाबांनी विचारलं.

म्हणजे आपलं-तुपलं सुध्दा असतं की काय? असं तेजोमयीचं बाबा हसत हसत म्हणाले. ही मंडळी नेमकं कशाबद्दल बोलताहेत हा प्रश्न पडून अलेक्झांडर आलटून पालटून सर्वांकडे बघू लागला.

ठोंब्या, तुला काही कळलं नाही ना रे..आईने विचारलं. त्याने आज्ञाधारकपणे मान डोलावली. पण चाललय तरी काय असे भाव त्याच्या डोळयात उमटलेच. आईने भिंतीकडे बोट केलं. तेव्हा अलेक्झांडर भिंतीजवळ जाऊन चित्रांकडे निरखून बघू लागला. एक चित्र झालं की दुसरं चित्र बघण्यात दंग होऊन गेला.

अच्छा तर, या चित्रांविषयी तेजो तुम्हाला कानात विचारत होती म्हणायची. साराची आई म्हणाली. यावर आई हसली.

चित्रांविषयीच  तिने विचारलं. तुम्ही कशी काय काढू दिलीत असा तिला प्रश्न पडला. तेजोमयीच्या आईने सांगितलं. भिंतीवरच्या चित्रांचं कानावर पडताच तेजोमयीच्या बाबांचं भिंतीकडे लक्ष गेलं.

अरे वा, घराचा सुंदर नकाशा केलेला दिसतो सारानं...छान छान...आमच्या अलेक्झूला आवडलेला दिसतो हा नकाशा...

अहो हा नकाशा नाही, चित्र आहेत.तेजोमयी म्हणाली.तेव्हा बाबा जागेवरुन उठले आणि भिंतीजवळ जाऊन चित्र निरखू लागले.

वा वा, फारच छान! फारच सुंदर! असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले.

चित्र सुंदर आहेत हो, पण त्यामुळे भिंत खराब झाली असं वाटत नाही का तुम्हाला? तेजोमयीची आई म्हणाली. तेजोमयीनेही तशीच मान डोलावली.

अजिबातच नाही. साराचे बाबा म्हणाले.

उलट मला तर मस्त वाटतय. साराने रंगवलेल्या चित्रांकडे बघितलं की एखाद्या परीच्या राज्यात गेल्यासारखं वाटतं. साराची आई म्हणाली.

परीचं राज्य? तेजोमयीनं आश्चर्यानं विचारलं.

हो गं, परीचं छान छान असं राज्य. तिचे सैनिक, तिचा रथ, तिचे मित्र- मैत्रिणी, तिचं खेळणं, तिची बाग, बागेतील फुलांचं तिचं बोलणं, आणि तीचं फुलासारखं दिसणं! किती छान ना फुलासारखी परी किंवा मग परीसारखी फुलं!

असं दिसतं तुम्हाला या या आडव्या तिडव्या आणि कशाही काढलेल्या रेघोट्यांमध्ये?तेजोमयीनं आश्चर्यानं विचारलं. साराच्या आईचं बोलणं ऐकून परीच्या राज्याचं चित्र आई काळजीपूर्वक बघू लागली. अलेक्झांडर तर कधीचाच यात दंग झाला होता. बाबांना काही क्षणातच कंटाळा आला आणि त्यांनी साराच्या बाबांकडे आपला मोर्चा वळवला.

काय हो, इतका महागडा रंग तुम्ही भिंतीला दिला. तो या चित्रांनी खराब झाला, याचं वाईट नाही वाटलं तुम्हाला?

वाईट कशाला वाटणार बुवा?अरे,ज्या दिवशी साराने पहिली रेघ ओढली आणि ती रेघ बघून ती आनंदानं नाचायलाच लागली.

तेव्हाच आमच्या लक्षात आलं की ही या रेघोट्या ओढण्यात मस्त रमतेय.तेव्हा रंगवू द्यायला काय हरकत आहे?तिच्या आनंदापुढे रंगांसाठी केलेला खर्च एकदम शुल्लक, नाही का? साराची आई म्हणाली.

तेजोयमीची बाबा,तेजोमयी किंवा तिची आई काही बोलण्याआधीच अलेक्झांडरनं कुईई केलं...

बघा बघा...अलेक्झूलाही ते पटलं.साराचं बाबा म्हणाले.

सारा किती भाग्यवान!तिला भिंतीवर रंगवण्याचा आनंद मिळाला.आपण रंगवण्याचा प्रयत्न केला तर राक्षस येईल नि घेऊन जाईल अशी भीती आईने दाखवली होती.हे आठवून तेजोमयी आधी खिन्न झाली आणि लगेच स्वत:शीच हसली.

कशासाठी हसलीस गं बाई तू, हे मला कळलय असं सांगण्यासाठी अलेक्झांडरनं शेपूट हलवलं.

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!