सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)
सिंहेश्वर, मच्छरास
घाबरतो तेव्हा...(भाग दोन)
पूर्वसूत्र-आपल्या शक्तीचा
गर्व झाल्याने सर्वांना तुच्छ समजू लागलेल्या सिंहेश्वरास धडा देण्याचा विडा मच्छरांनी
उचलला..त्यात त्यांना यश मिळाले काय? पुढे...
हत्तीरावांनी मग तसं
सर्वांना सांगितलं. सभेत शांतता पसरली. मच्छर काय सांगतो याकडे प्रत्येक प्राणी कान
देऊन ऐकू लागला.
मोठा मच्छर म्हणाला,
आम्ही सिंहेश्वराला धडा शिकवू शकतो. त्याला या वनातून हाकलून सुध्दा लावू शकतो. मात्र
त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे.
अरे मूर्खा, तू एवढासा
चिलटासारखा जीव. तू कसा काय त्या अगडबंब सिंहेश्वरास धडा शिकवणार? आमच्यापैकी
कुणालाही जे जमू शकत नाही ते तुला कसं शक्य होणार? आँ. तुला काय
आम्ही महामूर्ख वाटलो की काय? लांडगा म्हणाला.
हत्तीरावानं त्याची
सोंड जरी इकडे तिकडे फिरवली, तरी तुम्ही कुठे जाऊन पडाल याचा तुम्हालाही पत्ता
लागणार नाही. अजगर म्हणाला.
हे मच्छर आपल्या जखमेवर
मीठ चोळत आहेत. यांना हाकलून लावा हत्तीराव, कोल्हा म्हणाला.
अरे, तुमचा जीव इतका
धोक्यात आला असताना तुम्हाला हा लहान, तो मोठा अशा गोष्टी सुचतात. तुम्हाला विनोद
वाटतो माझं बोलणं. आपला शत्रू कितीही बलाढ्य असला तरी घाबरायचं नसतं. तुमच्यासारखं
मूगगिळून बसायचं नसतं. हिमतीनं लढायचं असतं. मार्ग काढायचा असतो. तुमच्या सारखं
मुळूमुळू रडत बसून उपयोग होत नाही. मुळूमुळू रडणाऱ्यांच्या मदतीला कुणी येत नाही. समजलं.
तुम्हाला आमची मदत नको असेल आमचंच काय आमच्या लाख पिढ्यांचही काही जाणार नाही. नुकसान
तुमचचं आहे. बसा बोंबलत आता. असं म्हणून तो मोठा मच्छर हत्तीच्या मस्तकावरुन उडून गेला. त्यासोबत
त्याचे साथिदारही उडून गेले.
मच्छरं तिथून उडून गेल्यावर सभेतले सर्वप्राणी
पुन्हा खो खो हसले. या हसण्यानं त्या दिवसभरातला उरलासुरला ताण दूर झाला. मात्र सिंहेश्वराबाबतचा
प्रश्न तसाच अनिर्णित राहिला.
०००
या सभेची बित्तंबातमी
एका कावळयानं सिंहेश्वराच्या कानी टाकली. त्याक्षणी सिंहेश्वराला सर्वप्राण्यांचा
प्रचंडच राग आला. पण त्याहीपेक्षा त्याला त्या मोठ्या मच्छराचा खूप राग आला. आपल्या
धडा शिकवण्याची भाषा करणारा हा मच्छर सिंहेश्वराच्या अजिबातच पचनी पडला नव्हता.
असं बोल कधीच त्याच्या कानावर पडले नव्हते. आपल्या शक्तीला आव्हान देण्याची भाषा
करणाऱ्या या मच्छरांचा नायनाट आधी करु आणि नंतर इतर प्राण्यांचा समाचार घेऊ असं
सिंहेश्वरानं मनोमन ठरवलं.
हे मच्छर कुठे दिसतात,
कुठे राहतात याचा शोध घेण्याचं त्याने कावळयाला सांगितलं. अशी माहिती दिली तर
यापुढे आपण आपल्या शिकारीतील काही वाटा त्याला आणि त्याच्या पिल्लांना कायम राखून
ठेऊ असं सिंहेश्वरानं कावळ्यास सांगितलं. कावळा खुष झाला.
कावळा मग मच्छरांचा शोध
घेऊ लागला. इकडे तिकडे भटकत असताना त्याच्या लक्षात आलं की, सिंहेश्वर वनातल्या
ज्या तलावात पाणी प्यायला जातात, त्या ठिकाणी हा मोठा मच्छर, त्याचे कुटुंबीय आणि
साथिदार राहतात. त्याने ही माहिती सिंहेश्वरास दिली. सिंहेश्वराला अत्यानंद झाला.
सिंहेश्वरा, आपण मला
दिलेलं आश्वासन मात्र विसरु नका. कावळ्यानं सिंहेश्वराला आठवण करुन दिली.
काळुंद्र्या ते नंतर
बघू .. सिंहेश्वर त्याच्याकडे तुच्छतेने पाहत म्हणाला आणि वेगाने
तळयाकडे निघाला. सिंहेश्वर आपल्याला फसवत असल्याचं कावळयाच्या लक्षात आलं. आपण
मच्छरांचा पत्ता त्याला सांगून मोठीचूक केल्याचं कावळ्याला वाटलं. तो अधिक वेगाने
तळ्याकडे पोहचला. मोठा मच्छर जिथे राहत होता. त्याठिकाणी जाउुन जोरजोरात ओरडू
लागला.
त्याच्या ओरडण्यानं सावध होऊन मोठ्या मच्छरानं त्याला काय झालं हे विचारलं. तेव्हा
कावळ्यानं त्याला सारं काही सांगितलं. आपल्या दुष्टपणाबद्दल क्षमा मागितली.
कावळ्याचं बोल ऐकून
मोठा मच्छर खुदकन हसला. बराच वेळ हसत राहिला. तो कावळयासोबत काहीच बोलला नाही. केवळ
हसत राहिल्यानं, सिंहेश्वराची धमकी ऐकून हा मच्छर वेडा झाला असं कावळ्याला वाटलं. आपल्यामुळे
ही परिस्थिती उद्भवली हे वाटून कावळ्यास दु:ख झालं. पण आता तो काहीच करु शकत
नव्हता. त्यामुळे तो तिथून उडून एका झाडावर जाउुन बसला. सिंहेश्वर आल्यावर काय
घडेल याची त्याला उत्सुकता लागली होती..
कावळा उडून गेल्यावर
मोठा मच्छर हसण्याचा थांबला. त्याला कावळ्याच्या दुष्टपणाचा राग आलाच होता. पण आता
आधी सिंहेश्वराचा समाचार घ्यायचा असं त्याने मनोमन ठरवलं. सिंहेश्वर इथे आल्यावर
काय करायचं, हे त्याने आपल्या सर्व साथिदारांना समजावून सांगितलं.
थोड्याच वेळात
सिंहेश्वर धावत धावत तळ्याच्या ठिकाणी पोहचला. धावल्यामुळे त्याला दम लागला होता.
आधी त्याने तळयातील पाणी पिलं. मग तो खाली बसला. थोड्या वेळानंतर ताडकन उठला आणि
गर्जना करत म्हणाला, मच्छरांनो कुठे दडून बसला आहात, आता या ना माझ्यासमोर. तुम्हाला
चांगलाच इंगा दाखवतो. वननगरीतील प्राण्यांना फितवता काय, माझ्याविरुध्द भडवता काय,
मला धडा शिकवण्याची भाषा करता काय, मूर्खांनो अरे, मीच या वनाचा राजा आहे आणि पुढेही
राहणार आहे. कुणी हुं की चू करु शकत नाही माझ्यासमोर. तुम्ही कोण आलात रे
तिस्मारखान...
सिंहेश्वर असं बोलत
असताना त्याचा अंहकार, गर्व आणि अभिमान ओसंडून वाहत होता. आपणास तुच्छ समजणाऱ्या या
सिंहेश्वराला आपला प्रताप दाखवण्याची योग्य वेळ आता आल्याचं मोठ्या मच्छरानं ताडलं.
त्याने सर्व साथिदारांना इषारा केला. हा इषारा मिळताच मच्छर टोळी सिंहेश्वरावर
तुटून पडली. जमेल तिथे त्याला चावा घेउु लागली. सिंहेश्वरानं गर्जना केली. जबडा
मोठा केला. शेपटी जोरजोरानं हलवली. तो गडबडा लोळायला लागला. थयथयाट करायला लागला. पण
मच्छरांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. ते चाव्यावर चावे घेतच राहिले. या चाव्यांनी अखेर त्रस्त
होऊन सिंहेश्वरानं तिथून धूम ठोकली.
झाडावर बसलेला कावळा हे
दृष्य बघून चकित झाला. सिंहेश्वराला मच्छरांनी पळवल्याचं अदभूत घटना त्याच्यासमोर
घडली होती. सिंहेश्वर पळू लागताच मच्छर टोळीही त्याच्या पाठीमागे ऊडू लागली. आता
पुढे काय घडणार याची उत्सुकता ताणल्या गेल्यानं कावळाही त्यांच्या पाठीमागे उडू
लागला. सिंहेश्वर जिवाच्या आकांतानं पळत पळत गुहेत पोहचला. तो धापा टाकत कसा बसला
खाली बसत नाहीच तोच मच्छरटोळी पुन्हा त्यांच्या अंगावर चावा घेऊ लागली. आता
त्यांनी सिंहेश्वराच्या कुटंबियांवरही हल्ला केला. या चाव्यांनी सिंहेश्वर आणि
त्याचे कुटंबीय घाबरुन गेले. ते सर्वजण गुहेच्या बाहेर पडले. वाट मिळेल तिकडे पळू
लागले. मच्छरांनी शेवटपर्यंत त्यांचा पाठलाग केला. सिंहेश्वर आणि त्याचे कुटुंबीय वनातून
बाहेर पडल्यावरच मच्छरांनी त्याचा पाठलाग सोडला.. कावळा हे सर्व काही बघत होता. त्याच्या
डोळयावर अजिबातच विश्वास बसत नव्हता. त्याने मच्छरांचा जयजयकार केला.
सिंहेश्वराला मच्छरांनी
पळवल्याचं तो सांगत सुटला. सर्व प्राण्यांना आश्चर्य वाटलं. बरेच प्राणी
सिंहेश्वराच्या गुहेजवळ गोळा झाले. खरोखरच सिंहेश्वर पळून गेला की नाही याची खात्री
करण्यासाठी अजगर आत शिरला. काही क्षणानंतर तो बाहेर येऊन त्याने खरोखरच सिंहेश्वर
पळून गेल्याचं सांगितलं. सर्व प्राण्यांनी मोठा जल्लोष केला. तो जल्लोष बघून
मोठ्या मच्छराला आनंद झाला. हत्तीरावानं मोठ्या मच्छराची क्षमा मागितली. तूच आमचा
आता राजा हो, अशी गळही घातली. तेव्हा मोठ्या मच्छरानं नम्रपणे त्यास नकार दिला.
तो म्हणाला की, हे
वन आपल्या सर्वांचं आहे. सर्वजण सारखेच आहेत. कुणाकडे शक्ती अधिक आहे म्हणून काही
तो या वनाचा राजा होत नाही. आपण सर्वांनी आता गुण्यागोविंद्यानं राहिलं पाहिजे. कुणी
जर डोईजड होऊ लागला तर त्याचा समाचार घेण्यासाठी आम्ही आहोतच. कोण किती मोठा, किती
लहान यावर जाउु नका. प्रत्येक जणामध्ये काहीना काही गुण असतातच. थोडीशी शक्तीही
असते. ते गुण, ती शक्ती आणि युक्ती याचा वापर केला तर कुणालाही भ्यायची गरजच पडत
नाही.
मोठ्या मच्छराचं म्हणनं
सर्वांना पटलं. त्यांनी मोठ्या मच्छराचा जयजयकार केला. वननगरीत त्यानंतर सर्वप्राणी
गुण्यागोविंद्यानं राहू लागले...
०००
इकडे वननगरीतून पळत
सुटलेला सिंहेश्वर व त्याचे कुटंबीय हे गीरच्या जंगलात पोहचले. त्यांना आता पळणं
शक्यच होत नव्हतं. त्यामुळे त्यांना सक्तिनं एका ठिकाणी विश्रांतीसाठी बसावं
लागलं. घाबरुन सिंहेश्वर आणि त्याचे कुटुंबीय बसले. मोठ्या मच्छराची भीती
त्यांच्या मनात होती. सिंहेश्वरानं मागं वळून बघितलं. दूरदूरपर्यंत मोठा मच्छर आणि
त्याची टोळी दिसत नव्हती.. सिंहेश्वराला हायसं वाटले. पण अजूनही मनात धाकधूक
होतीच. असा बराच वेळ गेला. पण मच्छरटोळी काही तिथे आली नाही. सिंहेश्वर व त्याच्या
कुंटुंबीयांची भीती पळून गेली.. त्यानंतर त्यांनी पुढे गिरच्याच जंगलात राहण्याचं
ठरवलं. तेव्हापासून सिंहेश्वरानं आपलं घर गिरच्या जंगलात केलं.....
.jpg)
Comments
Post a Comment