महाराजांचे पत्र?
महाराजांचे पत्र?
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला त्याच दिवशी, तेजोमयी, कल्याणी, वैष्णवी,
टिल्लू, पिल्लू, समीर ही कॉलनीतली मित्र-मैत्रिणींची टोळी मारुतीरायाच्या मंदिरात
गोळा झाली. मारुतीरायांना सर्वांनी मनोभावे नमस्कार केला. गदा हलवून ते सर्वांना आशीर्वाद
देतात,असा भास तेजोमयीस होतो. त्याला सर्व मित्रांची मान्यता होती. आताही तिने,
मारुतीरायाने सर्वांना आशीर्वाद दिल्याचं सांगितलं. सर्वांचे चेहरे उजळले.
आपण कशासाठी इथे आज आलोत ते मारुतीरायास सांगूया का? तेजोमयीने इतरांना विचारलं.
कशासाठी आलो? वैष्णवी म्हणाली.
अगदी बरोबर... इतर मुलांनी गलका
केला.
अगं, इथे कशाला आलोत याची काहीच चर्चा केली नाही ना आपण?तू काही मनात ठरवलस का?ते सांग
बघू. कल्याणी तेजोमयीस म्हणाली.
हो, माझ्या मनात काय चाललय ते सांगते? तेजोमयी म्हणाली.
आधी आपण बाकांवर बसू आणि मग चर्चा करु. पिल्लू म्हणाला.त्यानुसार
टोळीतील सर्व मुलं मंदिरातील बाकांवर बसली. बसताक्षणीच टिल्लूने तेजोमयीला
विचारलं,
काय आहे गं तुझ्या मनात?सांग
बरं पटकन.
आपल्याला नव्या मुख्यमंत्र्यांना भेटायला जायला हवं?तेजोमयी म्हणाली.
यावर टोळीतील सर्वजण जोरात हसले.त्यांच्या हसण्याच्या आवाजाने
मंदिरातील भाविक त्यांच्याकडे वळून बघू लागले.
ते लक्षात येताच टोळीने जोरजोरानं हसणं थांबवलं.
अगं तेजो ,कशासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायच तुला?ते आपल्यासारख्या मुलांना भेटत नाहीत?
असं कुणी सांगितलं?बरोबर ना मारुतीराया, समीर
त्यांच्याकडे बघत म्हणाला.त्यांनी मान हलवल्याचा भास झाला.बघा मारुतीरायांनी मान
हलवली.
ती, हो साठी होती की नाहीसाठी?
काय हो, कशासाठी होतं तुमचं मान हलवणं?तेजोमयीनं
मारुतीरायांकडे बघत विचारलं.तेव्हा मारुतीरायांनी डोळे मिटून घेतल्याचा भास तिला
झाला.
कठीण प्रश्नांवर मारुतीराया उत्तरच देत नाही बुवा.तेजोमयी म्हणाली.
अगं, मुख्यमंत्र्यांना भेटायचा कसला आलाय कठीण प्रश्न?
ते आपले मुख्य पालक आहेत.त्यांना तर कधीही भेटता आलं पाहिजे.
समजा ते भेटले तर आपण काय सांगायचं
त्यांना?
त्याचाच आपण आत्ता विचार करु
या?
म्हणजे काय करायचं?पिल्लू म्हणाला.
हे बघा, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर ते म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांसाठी
हे करु,सामान्य नागरिकांसाठी हे करु,बेरोजगारांसाठी हे करु,उद्योगांसाठी हे
करु,विजेची समस्या मिटवण्यासाठी हे करु.तेजोमयी म्हणाली.
बरोबरच आहे ना ते!त्यात काय चुकलं त्यांचं?
मी कुठे चुकलं म्हणतेय?
मग?
पण त्यांनी मुलांचा काहीच उल्लेख केला नाही. म्हणजे असा की आम्ही
मुलांसाठी अमूक करु, तमूक करु?
अरे वा,बरोबर लक्षात ठेवलस तू ते?
अगं पण तेजो,कोणतेच मुख्यमंत्री मुलांचा विषय पहिल्या दिवशी काढत नाहीत.मी
लक्षात ठेवलय ना ते?
तेच तर माझं सांगणं आहे ना,म्हणूनच आपण मुख्यमंत्र्यांना भेटलं
पाहिजे.
पण कायरे, कोणत्याही मुख्यमंत्रीसरांना मुलांचा विषय स्वत:हून कां
काढावा वाटत नसेल बॉ?
कारण मुलं ही देवाघरची फुलं असतात,वैष्णवी म्हणाली.
पण ही फुलं कोमेजू शकतात ना?टिल्लू
म्हणाला.
ती कायम टवटवीत राहावी असं मुख्यमंत्रीसरांना वाटायला हवं की नाही?
हा खरा बिलियन डॉलर्स प्रश्न?
त्यासाठी आपण मुख्यमंत्रीसरांना भेटायला हवं म्हणते मी.तेजोमयी
म्हणाली.
काय मारुतीराया, तुमची परवानगी आहे ना मुख्यमंत्रीसरांना भेटण्यासाठी? तेजोमयी त्यांच्याकडे बघून म्हणाली. मारुतीरायांनी
गदा हलवून परवानगी दिल्याचं तिने टोळीला सांगितलं.
मारुतीरायांची परवानगी
मिळाल्यानं टोळीचा उत्साह व्दीगुणित झाला. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्धार
करुन टोळी घरी परतली.
०००
त्यादिवशी रात्री प्रत्येकाने आपल्या घरी मुख्यमंत्र्यांना भेटायला
जाण्याचा हट्ट धरला. सर्वांच्या घरी या हट्टाला हसण्यावारी नेण्यात आलं.
मुख्यंत्र्यांना मुलांनी भेटू
नये, असा काही नियम आहे की काय?तेजोमयीने बाबांना
विचारलं.
तसं नाही तेजो.मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रितसर वेळ घ्यावी
लागते.असं कुणालाही वाटलं आणि भेटलं असं शक्य नाही.त्यांना खूप कामं असतात.खूप
लोकांना त्यांना भेटायचं असतं.बाबांनी समजावून सांगितलं.
हो बाबा, हे जरी सगळं खरं असलं तरी त्यांना मुलं नेहमी कुठे भेटतात?सगळी मोठी मानसच भेटतात ना!मग
आम्ही पहिल्यांदाच भेटायचं ठरवलं तर त्यांनी आम्हाला भेट दिलीच पाहिजे.तेजोमयी
म्हणाली.बाबांनी कसातरी हा विषय संपवला. मुलांच्या या हट्टाविषयी पालक मंडळींनी
व्हॉट्सॲपवरुन एकमेकांना कळवलं.
दुसऱ्या दिवशी तेजोमयीच्या घरी टिल्लू आणि कल्याणीचे बाबा आले.त्यांनी,
मुख्यमंत्र्यांना मुलांच्या भेटण्याचा विषय काढला.
हा बालीश हट्ट पुरवायचा का आपण?
टिल्लूचे बाबा तेजोमयीच्या बाबांना म्हणाले.
काका हा बालीश हट्ट नाही,त्यांना पाणी देताना तेजोमयी म्हणाली.
म्हणजे तू माझं म्हणणं ऐकलस वाटतं?
काकांनी विचारलं.
हो ऐकलना.मुलांचा प्रत्येक हट्ट बाबामंडळींना
बालीशच कां वाटतो काका? तेजोमयीनं काकांना
विचारलं. या प्रश्नाचं उत्तर काही त्यांना देता आलं नाही.
तेजोमयीच्या बाबांनांही मुलांचा हट्ट बालीश वाटत असला तरी त्यांना
मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्हावी याच कौतुकही वाटत होतं.तसं त्यांनी
टिल्लूच्या बाबांना बोलून दाखवलं.
मग आपण यांना घेऊन जायचय का मुख्यमंत्र्यांना भेटायला?त्यांनी टिल्लू आणि कल्याणीच्या बाबांना विचारलं.
दोघांचेही बाबा हो म्हणाले.मग तिघांनी मिळून इतर मुलांच्या बाबांना
विचारलं.सर्वांनी परवानगी दिली.
०००
तेजोमयीचे बाबा मंत्रालयात कामाला होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात
त्यांची ओळख होती.त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना भेटून मुख्यमंत्र्यांना
भेटण्याची मुलांची इच्छा असल्याचं सांगितलं. भेटीची वेळ मागणारं पत्र त्यांना दिलं.
मुलं स्वत:हून मुख्यमंत्र्यांना भेटू इच्छितात हे सचिवांसाठी नवीन
होतं. त्यांनी यातलं वेगळेपण ओळखलं. मुलांचे लाडके मुख्यमंत्री, अशी प्रतिमा
करण्यासाठी या भेटीचा उपयोग होऊ शकतो, हे त्यांच्या चाणाक्ष बुध्दीनं बरोबर हेरलं.
तेजोमयीच्या बाबांना आपल्या दालनात बसवून ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले. मुलांनी
भेटीसाठी वेळ मागितल्याचं पत्र त्यांना दाखवलं. मुख्यमंत्रीही मुलांच्या या
इच्छेने भारावून गेले. त्यांनी दोन दिवसानंतरची वेळ दिली.
सचिवांनी तसं तेजोमयीच्या बाबांना सांगितलं. ठरलेल्या भेटीच्या १५
मिनिटे आधी येण्याची सूचना केली.
मुख्यमंत्री साहेब,इतक्या लवकर मुलांना भेटायला तयार होतील,असं तेजोमयीच्या
बाबांना अजिबात वाटलं नव्हतं.पण मुख्यमंत्र्यांनी त्यांचं असं वाटणं खोटं
ठरवलं.आपण उगाच काहीबाही शंका काढत राहतो,असं ते स्वत:ला म्हणाले.मंत्रालयातील आपल्या
ऑफिसच्या दालनात आल्यावर टोळीतील इतर मुलांच्या पालकांना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी
वेळ दिल्याचं सांगितलं.सर्वांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता.
मुलांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी आधी बाबा मंडळींचा जयजयकार केला
आणि नंतर मुख्यमंत्र्यांचाही केला. तेजोमयीनं मनातल्या मनात एक गोष्ट पक्की केली.
ते तिने सर्वांच्या कानात सांगितलं.याविषयी अजिबात बोलायचं नाही असं तिने सर्वांना
बजावलं.
दुसऱ्या दिवशी बाबांनी मंत्रालयातील प्रवेशासाठी सर्व मुलांच्या प्रवेशिका
काढून ठेवल्या. सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांपर्यंत मुलांच्या येण्याचा निरोप
मुख्यमंत्री कार्यालयाकडून पोहचेल याची व्यवस्था केली.
०००
ठरलेल्या दिवशी तेजोमयीचे बाबा टोळीतील सर्व मुलांना घेऊन मंत्रालयात
आले. आकाशवाणीजवळच्या गार्डन गेटवरील सुरक्षाचौकीला या मुलांच्या येण्याचं
कळवण्यात आलं होतं. त्यामुळे दरवाज्याजवळील पोलिसांनी सर्वांना हसत हसत आत जाउु
दिलं. बाबा सर्वांना सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनात घेऊन गेले. आधी
ते सचिवांना भेटले.मुख्यमंत्री आले की मुलांसोबत त्यांची भेट करुन देतो असं
सचिवांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर असलेल्या स्वागतकक्षात मुलं
बसली.सचिवांनी प्रत्येकाला एक छानसं डॉर्क चॉकलेट दिलं.मुलांसाठी हे अनपेक्षित
होतं.चॉकलेटमुळे त्यांचे चेहरे आणखी खुलले.
काही वेळाने मुख्यमंत्री आले.आल्याबरोबर त्यांनी मुलांना आपल्या
दालनात भेटीसाठी बोलावं.
मुलं गलका करत आत शिरली. एका सुरक्षा सैनिकाने त्यांना दटावलं तेव्हा
ते शांत झाले.
जाऊ द्या हो,ते गलका नाही करणार तर काय आपण करणार?मुख्यमंत्री हसत म्हणाले.मुलांना हसू आलं.तेजोमयीच्या
बाबांच्या मनावरचा ताण कमी झाला.
मुख्यमंत्र्यांनी मुलांना आपल्या समोर बसायला सांगितलं.ते भव्य दालन
बघून सर्व मुलं थक्क झाली.सर्वजण भीरभीर इकडे तिकडे बघू लागली.
हं,तर मुलांनो,तुम्हाला भेटून मला फार फार आनंद झालाय...मुख्यमंत्री
म्हणाले.
आम्हाला पण...टोळीतील एकदोन जण म्हणाले.
मुलांनो,थेट मुख्यमंत्र्यांनाच भेटावं असं कां वाटलं तुम्हास?आईबाबांची तक्रार करायची की काय?मुख्यमंत्र्यांनी
विचारलं.
नाही हो सर,त्यांची कशाला तक्रार करायची? ते आमचे बेस्ट आई-बाबा आहेत,तेजोयमी म्हणाली.
मग माझी भेट कशासाठी हवी होती तुम्हाला?कुणाची
आहे ही आयडिया...
छत्रपती महाराजांची...टिल्लू हळूच म्हणाला.
हे ऐकताच तेजोमयीचे बाबा चमकलेच.त्यांच्या कपाळावर घाम आला.टिल्लूच्या
या आगावूपणाबद्दल त्याला चांगलच दटावलं पाहिजे असं ते मनात म्हणाले. सचिवांचा
चेहरा गंभीर झाला.
अरे वा, महाराज स्वप्नात आले होते की काय? मुख्यमंत्र्यांनी मिश्किलपणे विचारलं.
हो सर,त्यांनी हे पत्र तुम्हाला द्यायला सांगितलय... मुख्यमंत्र्यांना
एक पत्र देत कल्याणी,गंभीर चेहऱ्याने म्हणाली.
हे ऐकून तेजोमयीच्या बाबांना कंप सुटला.त्यांचे पाय थरथरु लागले.घशाला
कोरड पडली.या मुलांच्यापायी आपण मुख्यमंत्री आणि सचिवांच्या रोषाला बळी पडणार याची
त्यांना खात्री पटली. सचिवांच्या चेहऱ्यावर तीव्र नापंसती उमटली.
मुख्यमंत्री मात्र मुलांसोबत बोलण्यात दंग होऊन गेले होते.
कुणाचं बरं पत्र हे? मुख्यमंत्र्यांनी
विचारलं.
महाराजांनी त्यांच्या प्रधानांना लिहिलेलं पत्र आहे,सर.
अरे वा, मग वाचा की तुम्हीच...मुख्यमंत्री हसत म्हणाले.
कल्याणी पत्र वाचू लागली,
झाडांची कत्तल करु नका,झाडं नष्ट झाली तर जंगलं नष्ट होतील.जंगलातले
जीव नष्ट होतील.पर्यावरणाची हानी होईल.पाऊस कमी पडेल.खूप उन तापेल.जमिनीचा कस कमी
होईल.शेतातून कमी उत्पादन होईल.त्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल.याचा
फटका सर्वांना बसेल.त्यातही मुलांना अधिक बसून त्यांचं बालपण करपून जाईल.
पत्र वाचून झाल्यावर मुख्यमंत्री थोडे गंभीर झाले.हे पत्र खरोखरच
महाराजांनी दिलं की तुम्हीच लिहून आणलय?
असं त्यांना विचारावं वाटलं.पण ते असं
काही बोलले नाहीत. सचिवांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.आपण कुठून या फंदात पडलो
असं त्यांना वाटू लागलं.त्यांनी एक जळजळीत कटाक्ष तेजोमयीच्या बाबांकडे
टाकला.त्याने बाबा गर्भगळीत झाले.
मुख्यमंत्र्यांनी ते पत्र सचिवांकडे दिलं आणि मुलांचं कौतुक केलं.
मुलांसाठी सर्वाधिक प्राधान्यानं निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं.
बघा हं सर, नाहीतर महाराज
रागावतील बरं का? त्यांनीच आम्हाला तसं
सांगितलय? तेजोमयी बोलून गेली.
आतामात्र तेजोमयीच्या बाबांच्या छातीत धडधड वाढली. या आगावू मुलांना
इथे आणून,मोठीच घाडचूक केल्याचं त्यांना वाटू लागलं. आता तुमचं काही खरं नाही, असे
भाव दर्शवत सचिवांनी बाबांकडे बघितलं.बाबांनी मान खाली घातली. मुलं फारच अघळपघळ बोलून
मुख्यमंत्र्यांच्या वेळ वाया घालवताहेत असं सचिवांना वाटलं,त्यामुळे त्यांनी आता
आपण निघायला हवं, असं ते उसनं हसू आणत मुलांना म्हणाले...
मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवलं. तेजोमयीकडे बघत त्यांनी विचारलं,
महाराज कुठे भेटले तुम्हाला?
अहो सर, मंत्रालयाच्या प्रवेशव्दाराजवळ नाही का मोठ्या भव्य
फ्रेममध्ये ते! आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा
त्यांनी आम्हाला बोलावलं.खरचं सर! बाबासाहेब साक्षिला होते
तेव्हा.
आंबेडकर!
हो सर हो...तेजोमयी बोलून गेली. एैसपैस बोलण्याचा तिचा स्वभाव
मुख्यमंत्र्यांच्या समोर उघडा पडला. बाबांना काहीच सुचेनासं झालं... सचिवांचा
चेहरा अधिकच त्रासिक झाला.कधी ही मुलं दालनाच्या बाहेर पडतील असं त्यांना झालं
होतं.यापुढे असं, आ बैल मुझे मार,करायचं नाही,हे त्यांनी मनोमन ठरवून टाकलं.
दुसऱ्या बैठकीची वेळ झाल्याचं सचिवांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून
दिलं, तेव्हा ते उठले. मुलही उठली.
त्यांच्याकडे बघत मुख्यमंत्र्यांनी सचिवांकडून ते पत्र आपल्याकडे
घेतलं. मुलांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्या,असा शेरा त्या कागदावर लिहून तो
कागद त्यांनी पुन्हा सचिवांना दिला.अधूनमधून असंच भेटत चला,असं त्यांनी सांगितलं.
अशा हुषार,चुणचुणीत मुलांमुळेच महाराष्ट्र प्रगतीपथावर कायम वेगाने
घोडदौड करेल,नाही का,सचिव साहेब...मुख्यमंत्री सचिवांकडे बघत म्हणाले.त्यांना हो
म्हणण्यावाचून पर्याय नव्हता.
मुख्यमंत्र्यांचा विजय असो अशी घोषणा देण्याचा मोह टिल्लूला झाला. पण
त्याने तो टाळला.मात्र दालनाच्या बाहेर पडता पडता,समीरने छत्रपती शिवाजी महाराज की
जय, असा जयघोष केला.सर्वांनी जय म्हंटलं.यात मुख्यमंत्रीही सामील झाले.बाबांचा जीव
भांड्यात पडला.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment