कोहिनूर आणि मारुतीराया
कोहिनूर आणि मारुतीराया
अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मारुतीरायाच्या मंदिरात
संध्याकाळी या, असा व्हॉटस्ॲप संदेश तेजोमयीने टोळीच्या ग्रुपवर टाकला. त्यानुसार
टोळीतील सदस्य कल्याणी,वैष्णवी,चिंटू,पिंटू,प्रदीप,विनय,टिल्लू मंदिरात गोळा झाले.
काय गं, कुठे आभाळ कोसळलं?
मंदिरात आल्या आल्या प्रदीपने तेजोमयीला विचारलं.
सांगते ना,मात्र आधी आपण मारुतीरायाला जाब विचारायला हवा.
कोणता?कल्याणीने आश्चर्याने
विचारलं.
कशासाठी?वैष्णवी म्हणाली.
त्याने काय केलय? तोंडाचा चंबू करत विनय
म्हणाला.
अरे, सांगते सांगते सारं काही सांगते. चला माझ्यासोबत त्याच्यासमोर.
म्हणजे ,कशाचा जाब मी विचारतेय हे तुमच्या लक्षात येईल. तेजोमयी
म्हणाली.त्याप्रमाणे सर्वजण मारुतीरायासमोर उभे राहिले.आधी त्यांनी मनोभावे
मारुतीरायास वंदन केले.मारुतीरायांनी गदा हलवून सर्वांना आशीर्वाद दिल्याचा भास
नेहमीप्रमाणे तेजोमयीस झाला आणि तिने तसं सर्वांना सांगितलं.
अग, पण जाब विचारायचा होता ना, मारुतीरायाला... तेजोमयीस कल्याणीने आठवण करुन दिली..
अं हो हो .....तेजोमयी म्हणाली.आपणास कोणता जाब विचारणार म्हणून
मारुतीरायांनी कान टवकारले?
मारुतीराया तुम्ही त्या ठिकाणी असताना, ते घडलचं कसं? तेजोमयीनं विचारलं.
अगं काय घडलं? कुठे आणि कधी घडलं?तू काय बोलतेस हे कळतय का तुला? विनय म्हणाला.
कशाचा पायपोस कशात नाही...टिल्लूने प्रतिक्रिया दिली.मारुतीरायांना
सुध्दा असच काहीसं बोलावस वाटलं.पण आपल्या मनातलं या मुलांनीच तेजोमयीस
विचारल्याने ते चूप बसले.
आता थेट सांगतेना, 1310साली
आंध्रप्रदेशातील वरंगळू येथे असणाऱ्या मंदिरातील देवीच्या डोळयांच्या जागी
असणाऱ्या हिऱ्यावर खिलजी आक्रमकांनी दरोडा टाकला,तेव्हा समोरच उभे असलेले
मारुतीराया काय करत होते,हा जाब विचारायचाच मला.
अगं बये,1310साली म्हणजे 910
वर्षांपूर्वी आपले हे मारुतीराया त्या ठिकाणी होते हे कुणी सांगितलं
तुला?तुझं आपलं काहीतरीच?कल्याणीनं,तेजोमयीची
खिल्ली उडवली.
समजा हे मारुतीराया तेव्हा असतील तरी त्यांना आता काय आठवणार, तेव्हा
काय घडलं ते? चिंटू म्हणाला.
ही चर्चा कानावर पडणाऱ्या मारुतीरायांनाही हा प्रश्न पडला.आपण 1310साली त्या मंदिरात होतो का?मग
देवीच्या डोळयातून हिरा काढणारे लुटारु कां बरं आपणास दिसले नाही. मारुतीरायांना
प्रश्न पडला.त्यांनी डोळे मिटले आणि ते थेट 1310साली दरोडा
पडला,त्या काळात पोहचले.तेव्हा त्यांचा लक्षात आलं की त्याक्षणी त्यांना किंचित डुलकी
लागली होती.तेवढया वेळात दरोडेखोरांनी आपला कार्यभार साधला. अरेरे वाईटच झालं
म्हणायचं. तेजोमयीस काय बरं उत्तर द्यावं आता? मारुतीरायांना
प्रश्न पडला ते पुन्हा आताच्या काळात आले.
०००
अगं तेजो, कसल्या हिऱ्याबद्दल तू जाब विचारत आहेस, मारुतीरायास?पिल्लू म्हणाला.
कोहिनूर हिरा रे.नेहमी याची चर्चा आपल्या कानावर पडते ना,तोच तो.
मग पुढे काय घडलं?
अरे, हा कोहिनूर पुढे २१६ वर्षे दिल्लीच्या वेगवेगळया सुलतानांकडे
होता. १५२६ साली तो मुघल सम्राट बाबरकडे आला. पण आपल्या मारुतीरायांना याचीही
खबरबात नाही.
अगं, तू कसं काय असं म्हणू शकतेस?
मग सांगावं त्यांनी?
मी काय सांगणार?मारुतीराया स्वत:शीच
म्हणाले. ते पुन्हा २१६ वर्षे मागे गेले.तेजोमयी पुन्हा टोळीस नवी माहिती
देण्याच्या आधीच आपणच या कोहिनूरचं बाबरने काय केलं ते बघावं म्हणून मारुतीराया
आधी १६२७ सालात गेले.तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कोहिनूर हिरा हा बाबरच्या
वंशजांकडेच होता.१७२७ सालातही हा हिरा मुघल सम्राटांच्याच ताब्यात असल्याचं
मारुतीरायांना दिसलं. १७३९ सालात कुणी एक नादिरशहा नावाचा आक्रमक सुलतान, पर्शियन
प्रांतातून इकडे भारतात आला. त्याने मुघलांकडून कोहिनूर हिरा हिसकावून घेतला.
वाव...मारुतीराया स्वत:शीच बोलून गेले.
अहो,मारुतीराया यात कसलं वाव टाव करता?तुम्ही
तेव्हाही काही केलं नाहीत ना?ते स्वत:शीच पुटपुटले आणि
ओशाळलेसुध्दा.
०००
अगं पुढे काय झालं या कोहिनूर हिऱ्याचं?
वैष्णवीनं विचारलं.
अरे तो आधी मुघलांकडे गेला, मग नादिरशहाने तो पळवला.या नादिरशहाचा नातू
शुजा शहा याने हा हिरा १८०० साली पंजाबचे महाराज रणजीतसिंहांना दिला.
तो कशासाठी बॉ? इतका अव्दितीय
हिरा,रणजीतसिंहांना देणारा हा गृहस्थ ग्रेटच म्हणायला हवा.
तसं नाही रे. नादीरशहा मेल्यावर त्याच्या कुटंबात राज्य ताब्यात
घेण्यासाठी एकमेकांत प्रचंड लढाई झाली. त्यावेळी रणजीतसिंगांनी नादिरशहाच्या नातूस
मदत केली. त्याची ही परतफेड होती.
मग पुढे काय झालं?
अरे,१८४९ साली इंग्रज आणि शिख सैन्यात लढाई झाली. या लढाईत इंग्रजांचा
विजय झाला. तेव्हा इंग्रजांचा सेनापती लॉर्ड डलहौसीने कोहिनूर हिरा जप्त
करुन,ब्रिटनच्या राजाकडे पाठवून दिला.
याचा अर्थ १७२ वर्षांपूर्वीची घटना!
ही चर्चा ऐकणारे मारुतीराया स्वत:शीच म्हणाले.आपण या १७२ वर्षातही काहीच कसं केलं
नाही बॉ?मारुतीरायांनी पुन्हा स्वत:ला प्रश्न करुन ते
विचारमग्न झाले.
मग तुझं म्हणणं तरी काय?कल्याणीने
तेजोयमीस विचारलं.
बिचाऱ्या मारुतीरायांचा यात काय दोष? वैष्णवी म्हणाली.
त्यांचा काही दोष नाही रे?पण
ते १३१० साली ज्या दिवशी कोहिनूर हिऱ्यावर दरोडा पडला तेव्हा जरासे सावध राहिले तर
हे असं घडलं नसतं ना?
बरोबर ना मारुतीराया? तेजोमयी त्यांच्या
डोळयात बघत म्हणाली.
तिचं म्हणनं बरोबरच असल्याने मारुतीराया गप्पच राहिले.
पण झालं ते झालं,आता तो हिरा ब्रिटनचे राजा/राणी जो मुगुट
घालतात,त्यात तो बसवलाय.तो मारुतीराया कां बरं आणत नाहीत?
अरे, तू काहीही काय म्हणतोस.आपल्या या मारुतीरायास कसं शक्य आहे ते?
कां नाही?त्यांना अतिप्रचंड
द्रोणागिरी पर्वत आणणं सहज शक्य झालं,तर हा पिटुकला हिरा आणणं का शक्य होणार नाही?
हा खरा मिलियन पौंडी प्रश्न आहे?
मग काय म्हणाता ,मारुतीराया याबद्दल?
तेजोमयीनं त्यांच्याकडे बघत विचारलं.
या प्रश्नाचं काहीच उत्तर माहीत नसल्यानं मारुतीरायानं आपले बंद
केलेले डोळे टोळी मंदिरातून जाईपर्यंत उघडलेच नाहीत.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment