अभागी आणि दुर्देव्यी!


 

अभागी आणि दुर्देव्यी!

बेरिंग समुद्राचं नाव तुमच्या कानावरुन गेलयं का कधी? या ठिकाणी २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात भलतच विपरीत घडलं.

काय घडलं नेमकं?

या दोन वर्षात या समुद्रातील १० अब्ज जीव नाहीसे झाले. बापरे! कुठे गेले ते? काय झालं त्याचं? त्यांना कुणी पळवून नेलं का? एखाद्या परग्रहावरुन आलेल्या यानात बसून ते परग्रहावर तर निघून गेले नाहीत ना? की त्यांची हत्या झाली?

बापरे बाप! किती हे प्रश्न! आणि किती भयावह. दहा अब्ज जीव नाहीसे होतात नि त्याची कुणालाच खबरबात नसते म्हणजे काय? मग ही फेक म्हणजे खोटी बातमी किंवा घटना तर नाही ना?

छे छे, मी कशाला खोटं सांगेन.

पण मग तुम्ही कोण? तुम्हालाच कसं ठाऊक हे सारं? की तुम्हीही फेकच म्हणजे खोटेराव बनचुके!

छे छे, मी कशाला खोटे सांगू. कारण मी त्यावेळी तिथे होतोना. मी प्रत्यक्ष बघितलं की या जीवांचं काय झालं ते.

हे १० अब्ज जीव नाहीसे झाल्याचं सगळयात आधी अमेरिकेतील अलास्का म्हणजे बेरिंग समुद्र असलेल्या प्रदेशातील मच्छिमारांना कळलं. त्यांनी तेथील काही अधिकाऱ्यांना तसं कळवलं. युनायटेड स्टेट्स नॅशनल ओशनिक अँड ॲटमोस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनची शाखा असलेली अलास्का फिशरी सायंस सेंटर आणि सागरी जैवतज्ज्ञांनी या हरवलेल्या जीवांचा शोध घेण्याचं ठरवलं.

मग सुरु झाली शोधयात्रा! या १० अब्ज जीवांनी स्थलांतर केलं का? याचा शोध या शास्त्रज्ञांनी घेतला. पण तसं काही घडलं नसल्याचं त्यांना आढळलं. मग या जिवांचं काय झालं असेल? शास्त्रज्ञ विचार करु लागले. चौफेर शोध सुरु झाला. त्यात जे काही आढळलं ते फार भीषण आणि धक्कादायक होतं.

या दोन वर्षाच्या काळात एक उष्णतेची लाट या भागात येऊन गेली. या उष्णतेच्या लाटेने शास्त्रज्ञांना शोधकार्यासाठी एक दिशा दिली.

म्हणजे नेमकं काय झालं?

तर झालं असं की, उष्णता वाढल्यानं बेरिंग समुद्राचं पाणी ३ सेल्सियने गरम झालं. बापरे! असं म्हणालात ना तुम्ही.

तसं शास्त्रज्ञही म्हणाले, कारण ३ सेल्सियसची गरमी किंवा उष्णता म्हणजे भयावहच! हे जे जीव एकाएकी गायब झाले, त्यांच्याबाबात पूर्वी एक संशोधन झालं होतं. त्या असं आढळलं की जेव्हा पाण्याचं तपमान वाढतं तेव्हा, या जीवांच्या उर्जेची आवशक्यता वाढते. त्यांच्या उष्मांकाची म्हणजेच अन्नाची गरज दुप्पट होते.

ही लाट येण्याच्या आधी या जीवांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली होती. त्यामुळे अन्नाची आवश्यकता वाढली. पाण्याचं तपमान वाढल्याने सर्वांची भूक खूप म्हणजे खूपच वाढली. त्यामुळे या जीवांमध्ये अक्षरश: स्पर्धा सुरु झाली. ही स्पर्धा त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली. अब्जावधी जीव उपासमारीला बळी पडले.

म्हणजे मृत्युमुखी पडले.

    अरेरे!

होय खरचं, अरेरे, असं म्हणण्याशिवाय पर्याय नाही. केवळ ३ सेल्सियसने उष्णता वाढल्याने या दुष्टचक्रात हे जीव सापडले.

उष्णतावाढीचा हा असा धोका, सगळ्याच प्राण्यांच्या मुळाशी आलाय. पर्यावरणाचं संरक्षण करा संरक्षण; कर्बाल्म वायुचं उत्सर्जन कमीत कमी होईल हे बघा, असं मनुष्यप्राणी एकीकडे सारखा बोलतो. पण दुसरीकडे मात्र सर्वात जास्त नुकसान तोच करतो. पर्यावरणाचं ‍संरक्षण होईल याकडे फारसं लक्षं देत नाही. मनुष्यप्राण्यासारखा दुतोंडी कुणी नसावं या जगात...

असू द्या...एक ना दिवस वाढत्या उष्णतेचा फटका त्यांनाही असाच या जीवांसारखा बसेल तेव्हा वेळ गेलेली असेल...

तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे इतकं रामायण घडत  असताना मी तिथे काय करत होतो? हो ना

मी सुध्दा त्या अभागी जीवांमधला एक. नशिब बलवत्तर म्हणून कसाबसा वाचलो. वाचलो म्हणून मला सारं काही बघता आलं. मी त्या नष्ट झालेल्या १० अब्ज जींवाचाच एक भाऊबंद...

मी हिम खेकडा!

अभागी आणि दुर्देव्यी!

सुरेश वांदिले        

 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!