भुताटकीचा धडा
भुताटकीचा धडा
गावाकडच्या घरी एका सावकाराकडे
असलेल्या कोंबडेरावांचा थाट काही और होता. उंचापुरा, डौलदार आणि त्याचा तो भरदार
तुर्रा! तो
चालायचा तेव्हा जणू एखाद्या राजाची स्वारी निघाल्यासारखी वाटे. सावकाराच्या घरातील
इतर कोंबडे, कोंबड्या, बदकं, कुत्रे, मांजरी, गाढवं या कोंबडेरावाला जरा वचकून असत.
हे
कोंबडेराव सावकारांचे फार आवडते. कुणीही पाहुणे त्यांच्याकडे आले की सावकार
कोंबडेरावांची विशेष ओळख करुन देत. येणारा प्रत्येक पाहुणा कोंबडेरावांचं मनसोक्त
कौतुक करायचा. त्याच्या जागी दुसरं कुणी असतं तर या अशा कौतुकानं शेफारुनच गेला
असता. त्याला गर्वही झाला असता. पण कोंबडेरावांचं तसं काही झालं नाही. त्याचे पाय
जमिनीवरच राहिले.
तो सावकारांचा आवडता असल्याने त्याला
इतर प्राण्यांपेक्षा, ते त्याला चांगलं खाऊ पिऊ घालत. काजू-बदाम देत. आपल्या सोबत्यांसोबत
खान्यापिन्याचा बाबत सावकार भेदभाव करतात हे बघून कोंबडेरावांना वाईट वाटे.
यातून त्याने आपल्या बुध्दीने एक मार्ग
काढला. तो सावकारांची नजर चुकवून त्याला मिळालेले काजू-बदाम आलटून पालटून घरातील
इतर कोंबड्या, बदकं, कुत्रा,गाढव आणि मांजरीला देऊ लागला. त्याच्या या प्रेमळपणा
आणि आपुलकीमुळे तो सर्वांचा आवडता झाला.
कुत्रा त्याला त्याच्या पाठीवर बसू
द्यायचा. मांजर मावशी त्याला गावातून काहीबाही आणून द्यायची. बदकोबा पाठीवर घेऊन
नदीतून रपेट मारुन आणायचा. सर्वांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं होतं.
सगळयांचे दिवस असे आनंदात आणि मजेत
चालले असताना, एके दिवशी सावकाराकडे कुणीतरी बडी आसामी आली. त्याने मालकाला भरपूर
बिदागी देऊन कोंबडेरावास विकत घेतले. तो कोंबडेरावास घेऊन जाऊ लागला तेव्हा,
कुत्र्याच्या लक्षात आले. तो दत्त म्हणून त्या बड्या असामीच्या समोर उभा राहिला.
त्यांच्यावर भुंकू लागला. त्याचे तीक्ष्ण दात बघून ती बडी आसामी घाबरली.
कुत्र्याला भुंकू नकोस म्हणून सावकाराने सांगण्याच्या प्रयत्न केला. पण कुत्र्याने
भुंकणं सोडलं नाही. तेव्हा त्याने त्याच्यावर लाकूड भिरकावला. ते लाकूड गाढवाने
आपल्या लाथेने बाजूला ढकलले. सावकाराचा दुष्टपणा लक्षाल आल्याने, मांजराने
त्याच्यावर उडी घेतली. बदकही त्याच्या पायाला टोचू लागले. इतर कोंबड्या फडफड करत
त्याच्या डोळ्यासमोर उडू लागल्या. या सगळया प्रकाराने ती असामी आणखी घाबरली.
त्याला ही भुताटकी वाटली. त्याचे पाट लटपटू लागले. त्याने कोंबडेरावास तिथेच सोडून
धूम पळ काढला.
इकडे, सावकार प्राण्यांच्या
हल्ल्यामुळे त्रस्त होऊन गडबडा लोळू लागला. त्याला आपली चूक लक्षात आली. दोन्ही
हात जोडून क्षमा करा,क्षमा करा असं तो प्राण्यांना विनवू लागला.
गाढवोबा, रागाने सावकाराच्या समोर आला.
त्याला जोरदार लाथ हाणून घराबाहेर पडला. त्याने सर्वांना ईशारा केला. त्याचा अर्थ
होता की, या दुष्ट सावकाराकडे आपण रहायचे नाही, आता. कोंबडेराव गाढवाच्या पाठिवर
बसला. मांजर मावशी कुत्रोबाच्या पाठिवर बसली. त्यांच्या पाठोपाठ बदकंही निघाले.
जंगलातील एक तलाव दिसताच त्यांनी तिथेच रहायचं ठरवलं. सर्वजण प्रेमाने आनंदाने आणि
एकमेकांना मदत करत अनेक वर्षे तिथे राहिले.
०००
सर्व प्राणी घरुन निघून गेल्यावर
सावकाराचे प्राणच गेल्यासारखे झाले. घरात स्मशान शांतता पसरली. त्याच्याकडे कुणीही
येईनासं झालं. कुत्रा नसल्यानं एक दिवशी चोरांनी घर लुटलं. कामासाठी गाढव
नसल्यानं, त्याला कष्ट सहन करणं कठीण झालं. मांजर नसल्यानं घरात उंदरांचा सुळसुळाट
झाला.
आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्राण्यांना
त्रास दिला तर त्याचा त्रास आपल्यालाच अधिक होतो, परमेश्वर सुध्दा आपल्यावर
रागावतो, हा धडा सावकारास मिळाला.
गावातील मंदिराच्या पारावर बसून सावकार
तिथे येणाऱ्या जाणाऱ्या हा धडा सांगण्याचा प्रयत्न करु लागला. आता कुणी त्याचं ऐकतात. तर कुणी त्याला वेडा रे
वेडा म्हणून संभावना करतात.
सुरेश वांदिले
.png)
Comments
Post a Comment