गांधीजी, माकडं आणि असहकार...
गांधीजी, माकडं आणि असहकार...
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात एकच हलकल्लोळ माजला. इतक्या वर्षात
प्रथमच असं घडलं. या उद्यानात गांधीजींच्या तीन माकडांच्या मूर्ती बसवण्यात आल्या
आहेत. या तीन माकडांपैकी एक़ डोळयावर दोन्ही हात ठेऊन सांगत असतो की वाईट काही बघू
नका. दुसरा माकड दोन्ही कानावर हात ठेऊन सांगत असतो की़, वाईट काही ऐकू नका. तिसरा
माकड तोंडावर दोन्ही हात ठेऊन सांगतो की, काहीही वाईट बोलू नका. वर्षानुवर्षे
पर्यटक येथे येतात आणि या माकडांना बघून खूष होतात. त्यांच्यासोबत छायाचित्र
काढतात. आताशा सेल्फी काढायला लागले. गांधीजींची ही तिन्ही माकडं सर्वांना आनंद
देणारीच होती.
०००
आज मात्र विपरीत घडलं. पहिल्या माकडाने कानावरुन हात काढले. दुसऱ्याने
तोंडावरुन तर तिसऱ्यानं डोळयावरुन. यामुळे त्यांचं वैशिष्ट्यच गेलं.
हा कुणाचा तरी खोडसाळपणा असावा, असं तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यास वाटलं. पण
तसं तर काही दिसत नव्हतं. कारण या मूर्तींची कुणी तोडफोड केली नव्हती.
मग हे कसं झालं? या परिसरात घनदाट
जंगल आहे. या जंगलात राहणाऱ्या भूत आणि चेटकिणीने तर जादू केली नसेल ना? असं या अधिकाऱ्यास वाटलं.
मात्र, ही जादू करायची गरज काय
जंगलातील भुतांना ? या माकडांशी त्यांना
काय घेणं देणं? असा सवाल त्या अधिकाऱ्याच्या मनात आला.
कुणी जुन्या मूर्ती पळवून नवीन तर आणून ठेवल्या नाहीत ना इथं. असंही
त्या अधिकाऱ्यास वाटलं. तेव्हा आपल्या
शंकेचं निरसन करण्यासाठी त्याने मूर्तींची कसून पाहणी केली. पाचवेळा त्याने
मूर्तींना फेऱ्या मारल्या. मूर्ती जुन्याच होत्या.
या निरीक्षणानंतर तो अधिकारी मटकन खालीच बसला. कारण, मूर्तींनी त्यांचे
हात त्यांना नेमून दिलेल्या अवयवांवरुन काढून टाकण्याचं कोणतच कारण त्याच्या
लक्षात येत नव्हतं.
अधिकारी रडकुंडीस आला. त्याने मूर्तींपुढे लोटांगण घातलं आणि रडत
त्यांना म्हणाला..
वानर देवांनो, आमचं काय चुकलं ते सांगा. पण असा असहकार करु नका ..
असहकाराचं नाव कानावर पडताच, एक माकड अधिकाऱ्याला म्हणाले, तुम्हाला
असहकार आंदोलन ठाऊक आहे ना...
हो हो हो वानरदेवा, इतिहासात शिकलो मी...
हे आंदोलन कुणी सुरु केलं होतं?
दुसऱ्या माकडाने विचारलं.
कुणी बरं?अधिकारी विचार करु
लागला.
मोहनदास करमचंद गांधी यांचं नाव कानावरुन गेलय ना तुमच्या...
तो अधिकारी पुन्हा विचारमग्न झाला...
म्हणजे तुम्हास ठाऊक नाही का? तिसऱ्या माकडानं विचारलं.
नाही नाही, असं काही नाही. आठवत होतो. इतिहास शिकून बरीच वर्षे झाली
ना.
मोहनदास करमचंद गांधी आठवायला इतका वेळ लागतो.पहिला नाराज होऊन
विचारता झाला.
नाही म्हणजे हो, हं हा आठवलं... आठवलं. महात्मा गांधी...मोहनदास
करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी. बरोबर ना.
अरे वा, अखेर तुम्हास आठवलं म्हणायचं.मग आम्हाला सांगा,महात्मा गांधी
यांनी असहकार आंदोलन कां सुरु केलं?
कां केलं?
अहो, तुमचा इतिहास इतका कच्चा कसा?
नाही म्हणजे,आता इतक्या वर्षानंतर...
अहो साहेब, सगळा इतिहास नाही आठवत असेल तर एकवेळ समजू. पण महात्मा
गांधीजींच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी तर ठाऊक पाहिजे की नाही तुम्हास?
आँ! हो हो हो पण...
महात्मा गांधी कोण होते? एका माकडानं विचारलं.
कोण म्हणजे? ते महात्मा होते...
आणि...
राष्ट्रपिता होते...
हो ना, मग आपल्या पित्याच्या
महत्वाच्या गोष्टी तुम्ही कां लक्षात ठेवत नाही?
नाही म्हणजे सॉरी...
सॉरी काय सॉरी, आपल्या पित्याने सांगितलेल्या हिताच्या गोष्टी जे कुणी
ऐकत नाहीत ना ते रसातळात जातात.
हो हो बरोबर, पण त्यांनी काय सांगितलं?
अहो, वाईट बोलू नका, पाहू नका, ऐकू नका असं साधं सोप सरळ सांगितलं ना
त्यांनी. ते सुध्दा तुमच्या लक्षात राहत नाही.
आलं आलं,लक्षात आलं.अधिकारी म्हणाला.
आता काय उपयोग?राष्ट्रपित्याने
सांगूनही तुम्ही वाईट बोलणं सोडलेलं नाही.
पाहणं सोडलेलं नाही आणि वाईट ऐकण हा तर तुमचा मोठ्ठाच टाइमपास.
आँ!
म्हणून आम्ही आता तिघांनीही
असहकार आंदोलन करायचं ठरवलय. गांधीजींनी काय सांगितलं याची आठवण करुन देणारे हात
आम्ही आता कधीच आमच्या डोळे, कान आणि तोंडावर ठेवणार नाहीत.
वानर देवांनो, असं काही करु नका.गांधीजींना काय वाटेल, त्यांना किती
दु:ख होईल हे तरी लक्षात घ्या.तो अधिकारी काकुळतीने म्हणाला.
अहो, तुम्ही त्यांची मुलं असून काही लक्षात घेत नाही.आम्हीच थोडाच
ठेका घेतला आहे.तिसरे माकड म्हणाले.
माकडांच्या या युक्तिवादाने अधिकाऱ्याची शुध्द हरपली आणि त्यातच ते
बेडवरुन खाली पडले. सकाळची स्वप्नं खरी ठरतात म्हणे.हे स्वप्न तरी खरं ठरायला
नको,म्हणून त्यांनी वनदेवतेस हात जोडले.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment