कावळा आणि राजहंस
कावळा आणि राजहंस
एकदा सोमू कावळ्यानं उडत असताना खाली चमचमणारं पाणी आणि त्यात विहार करणारे पांढरे शुभ्र
पक्षी बघितले. असे बरेच पक्षी या पाण्यात खेळत होते, एकमेकांच्या
अंगावर पाणी उडवत होते. मध्येच, पाण्यात आपली मान घालून बराच
वेळ ते तसेच राहत. काही पक्षी खेळता खेळता पाण्यात डुबकी
मारुन गायब होतं. कितीतरी वेळ ते बाहेरच येत नसत. हे सगळं बघून सोमूस मजा वाटली.
तो, उडता उडता
सरोवराच्या जवळील एका झाडावर उतरला. पाण्यावर खेळणाऱ्या
पक्षांच्या हालचाली न्याहळू लागला. पाण्यावर विहरणारे पक्षी,
राजहंस असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
त्यांचा पांढरा शुभ्र रंग
बघून सोमूला
त्यांचा हेवा वाटला.
“आपला रंग काळा कां असेल बरं?”
तो विचारात पडला.
“राजहंस पक्षी सतत पाण्यात
राहतात, खेळतात म्हणून तर त्यांचा रंग पांढरा नसेल ना!”
सोमूच्या मनात विचार आला.
“समजा असं असेलही तर तुला त्याचं
काय करायचय?” कावळयाचं एक मन म्हणालं.
“मला असं वाटतं की आपण पाण्यातच राहिलो तर पांढरे शुभ्र होऊ.” तो स्वत:शीच
पुटपुटला.
“त्याने काय होईल?” कावळयाच्या दुसऱ्या मनाने त्याला विचारलं. सोमू
विचार करु लागला. मात्र या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही. आपण
पांढरं शुभ्र झाल्याने काय होईल? हे आता कुणाला बरं विचारावं? याचा विचार करत सोमू घरी
परतला.
आपल्या आजोबांना खूप अनुभव
असल्याने त्यांनाच विचारायला हवं, असं, घराकडे येताना सोमूस
सुचलं.
घरी आल्याआल्या आजोबांना गाठून मनातला
प्रश्न त्यांना विचारला.
यावर आजोबा गंभीर झाले. ते
काहीच बोलेना. आपलं काही चुकलं तर नाही ना, असं सोमूस
वाटलं.
“आजोबा, तुम्हास
ठाऊक नसेल तर सांगू नका. पण असं दु:खी होऊ नका हो.” सोमू म्हणाला.
“तसं नाही रे बाळा, तुझ्या प्रश्नानं मला खूप वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्देव्यी घटनेची आठवण
झाली.”
“म्हणजे काही विपरित झालं होतं
का आजोबा?” सोमूनं उत्सुकतेनं विचारलं.
आजोबांनी मेाठा श्वास घेतला.
आभाळकडे एकटक बघत ते बोलू लागले.
“आपल्या एका पूर्वजालासुध्दा
कधीकाळी असंच वाटलं होतं.”
“आँ!”
“हो रे राज्या.”
“मग ते झाले का पांढरे?”
“अरे, त्यांनी काही विचार केला नाही. तू जसं मला
विचारलं तसं त्यांनी त्यांच्या आजोबांना विचारलं नाही.”
“मग?”
“हे आपले पूर्वज कावळोबा थेट पाण्यात
शिरुन राजहंसासारखं राहण्याचा प्रयत्न
करु लागले. राजहंसाने त्यांना समजावलं की,
तू झाडावरचा पक्षी असल्यानं तू तिथे राहू
शकतो. मी पाण्यातला पक्षी म्हणून मी इथे राहू शकतो. असं एकमेकांची घरं बदलली तर
दोघांनाही राहता यायचं नाही आणि आपण प्राण गमावून बसू?”
“मग काय झालं?”
“राजहंसाचं म्हणणं त्या
कावळोबास पटलं नाही. राजहंसाशिवाय कुणीही पांढरे शुभ्र होऊ नये, असं त्याला वाटत असल्यानेच तो हे सांगतोय, असं या कावळोबांना वाटलं. तसं
त्यांनी बोलूनही दाखवलं. राजहंसाने पुन्हा समजावलं, पण आपले पूर्वज काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यांनी राजहंसाकडे दुर्लक्ष केलं. राजहंसानेही त्याचा पिच्छा सोडला. ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं, असं म्हणून राजहंस आपल्या
सवंगड्यांसोबत खेळू लागला.
आपले पूर्वज आजोबा
पाण्यावर आणि पाण्याखाली राहण्याचा अट्टाहास करु
लागले. पण सतत पाण्यात राहिल्याने त्यांना हुडहुडी भरली. त्यामुळे त्यांना धड उडता येईना.
ते कसाबसा उडाले नि लगेच खाली कोसळले. आता त्यांच्यात त्राण उरलं
नव्हतं. त्याचवेळी तिथून एक कोल्हा जात होता. त्याला खाली
पडलेले हे कावळोबा दिसले. त्याला आयतीच मेजवाणी मिळाली. कावळोबावर झडप मारुन
तो त्यांना मजेत खाऊ लागला.” आजोबा दु:खी
अंत:करणाने म्हणाले.
“अरेरे! वाईट
झालं.” सोमू म्हणाला.
“जे इतरांचं ऐकत नाहीत, सारासार विचार करत नाहीत, इतरांसारखं होण्याच्या
प्रयत्न करतात, जे शक्य नाही ते व्हावं याचा अट्टाहास करतात
त्यांचं असंच घडतं राज्या!” आजोबा म्हणाले.
“हं!”कावळयाने
दीर्घ श्वास घेतला. बरं झालं आपण आजोबांना विचारलं ते! असा
विचार त्याचा मनात येऊन त्याला हायसं वाटलं.
आजोबांच्या चोचिला चोच लावून त्याने आजोबांना
थँक्यू म्हंटलं.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment