अनाठायी भीती
अनाठायी भीती
वननगरीच्या खूप
आतमध्ये गोड्या पाण्याचा एक तलाव होता. त्याच्या अवतीभवती सुंदर फुले झाडे आणि
मधूर फळांची झाडं होती. पण तिकडे जाण्याची हिम्मत हरणांना होईना. कारण त्यांच्या
कानावर आलं होतं की, तिथे गेलं की तिथे दडून बसलेले कोल्हा, अस्वल, कुत्रे हल्ले
करुन हरणांना खाऊन टाकतात. तिथे म्हणे फक्त भूतच जाऊ शकतात. तिथे दुसरे कुणी गेलं
तर ती भूतं त्या प्राण्याला उचलून नेतात आणि तलावाच्या पाण्यात ढकलून देतात. तिथे
फक्त वननगरीच्या महाराजांनाच जाण्याची परवानगी आहे. दुसरं कुणी गेलं, तर वनदेवता
नाराज होऊन त्याला शाप देते. अशी ती वेगवेगळी कारणं होती.
पण आई, एका
पाडसाने एकदा आईला विचारलं, हे कधी प्रत्यक्ष घडल्याचं आपल्या हरण
काका-काकू-मामा-मामी-दादा-ताई-आजी-आजोबा यांनी प्रत्यक्ष बघितलय का?
याचं उत्तर
काही हरण आईस देता आलं नाही.
यावर ते पाडस
म्हणाले, आपण जाऊन यायचं का गं,तिथे? म्हणजे खरं काय ते कळेल ना.
अरे बाबा, नको
नको. कशाला सुखाचा जीव संकटात टाकायचा म्हणते मी, आई पाडसाला म्हणाली.
अगं कशाला
घाबरतेस तू?आपल्या
पायात किती शक्ती आहे. आपल्या इतक्या वेगानं कुणी धावू शकत नाही. आपल्यावर कुणी
हल्ला केला तर आपण त्याला गुंगारा देऊन सुटका करु शकतो. पाडसं
म्हणाला..
हो रे राज्या,
हे सगळं खरं असलं तरी कशाला उगाच आगीची परीक्षा घ्यायची?
अगं परीक्षाच
दिली नाही, तर तू म्हणते तशी फक्त आग आहे की फक्त अफवा आहे, हे कसं बरं कळेल? पाडसानं
युक्तिवाद केला.
खरं तर,
पाडसाचं म्हणणं बरोबरच होतं. पण आईचं मन काही होकार द्यायला तयार होत नव्हतं. ती
पाडसाला रागवली सुध्दा.
तेव्हा तो
म्हणाला, तू येणार नसशील तर मीच एकटा जावून खरं काय ते बघून येईन?
आईने त्याला
खूप समजावलं. पण ते पाडस आता इरेलाच पेटलं होतं. त्याने थेट त्या तलावाच्या दिशेनं
धावायला सुरुवात केली. ते बघून आई घाबरली. तिने त्याला हाका मारुन थांबवण्याचा
प्रयत्न केला. पण पाडस काही थांबलं नाही. ते बघून आईसुध्दा त्याच्या पाठिमागून
धावली. काही वेळाने ते दोघेही त्या सुंदर तलावाजवळ पोहचले.
तलावाच्या
अवतीभवती खूप झाडे होती. त्याला रंगीबेरंगी फुलं आली होती. काही वृक्षांना फळं
लगडलेली होती. फळं आणि फुलांच्या सुंगधाने तो परिसर भारुन गेला होता. झाडांवर
पक्ष्यांचा किलबिलाट सुरु होता.
जंगलातील
हरीण आणि तिचं बाळ पहिल्यांदाच तिथे
आल्याचे बघून एका झाडावरील गरुड पक्षाला आश्चर्य वाटलं. तो त्यांच्याकडे आला आणि
त्यांना म्हणाला,
हरीणताई वाट
चुकलीस काय इकडे?
इतक्या वर्षात या तलावाकडे तुमच्यापैकी कुणी आलं नव्हतं?
आई हरीण
काहीतरी बोलणार तोच पाडस धडधड बोलू लागला. त्याने आज काय घडलं ते सारं काही
सांगून टाकलं.
वा वा वा.फारच बहादूर आहेस हं तू.गरुडाने
पाडसाचं कौतुक केलं.
अहो, पण
गरुडदादा, ही बहादुरकी प्राणावर बेतू शकते ना. आई हरीण म्हणाली.
अहो ताई,तुम्ही
उगाच भिता बाँ. तुमच्या पाडसाला कळलं ते तुमच्या कां लक्षात येत नाही? गरुडाने
विचारलं.
म्हणजे?
अहो ताई, आता
बघा, तुम्ही इतका वेळ इथं आहात, काही झालं का तुम्हाला? आलं का भूत
इथलं?
रागावली का वनदेवता? कुठे
गेले ते कोल्हे-लांडगे-कुत्रे? समजा ते आले असते तरी तुम्ही वेगाने पळून तुमचं
रक्षण करु शकता ना.त्यांच्यापेक्षा कितीतरी चपळ आहात तुम्ही.
हेच तर मी
समजावून सांगत होतो काका! पण आई
काही ऐकालयाच तयार नव्हती.
बघा ताई, केवळ
भीती आणि अफवांमुळे तुम्ही हरीण मंडळी या सुंदर तलावाच्या पाण्यापासून, इथल्या
सुंदर फुल-फळांपासून वंचित राहिला की नाहीत?
हरीणीने
होकारार्थी मान हलवली..
ताई, भीती बाळगावी, पण त्यामुळे
गर्भगळित होऊ नये.
आपल्यापैकी
प्रत्येकास देवाने काहीना काही वेगळी शक्ती दिली आहे. त्या शक्तीचा
उपयोग करायला हवा. तो तसा केला नाही तर एखादे दिवशी तुमच्या पायातली शक्तीच देव
काढून घ्यायचा. गरुड म्हणाला.
हरीणीला त्याचं
म्हणणं पटलं. आपल्या पिढीच्या कोणत्याच हरणानं केवळ भीतीमुळे या तलावाकडे येणं
टाळलं आणि मोठ्या आनंद आणि सुखास मुकलो. मात्र आपल्या पाडसाने हिम्मत दाखवली.
गरुडाने डोळे उघडले. हरीण स्वत:शीच संवाद करत हसली.
काय झालं गं? पाडसानं
विचारलं.
आई काहीच बोलली नाही, तिने पाडसाला
जवळ घेतलं आणि त्याचे पटापट मुके घेउुन त्याचं कौतुक केलं.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment