प्रेमाची शक्ती
प्रेमाची शक्ती
सिंह
महाराजांना महाराणींचा खूप राग आला होता. त्याचं कारण होतं, महाराणींनी
आणलेली दोन नवजात पिलं. ती बिबट्याची होती.
एके दिवशी त्या
वननगरित प्रभात समयी फिरायला गेल्या असताना एके ठिकाणी ती दोन बारिकशी पिलं बेशुध्दाअवस्थेत
पडलेली दिसली. बाजूला त्यांची आई मरुन पडली होती. महाराणींनी
पिलांना हुंगलं. त्यांचा श्वास सुरु होता. त्यांनी त्या पिल्लांना जिभेनं चाटलं.
थोडया वेळाने ती पिल्लं शुध्दीवर आली. दोन्ही पिलं सिंहिण महाराणींना बिलगली.
महाराणिंनी त्यांना दूध पाजलं. नीट डोळेही उघडता येऊ न शकणाऱ्या त्या पिलांना घेऊन
महाराणी गुहेत परतल्या.
दुसऱ्या
प्राण्यांची पिलं गुहेत आणल्यामुळे सिंह महाराज त्यांना रागावले. त्या दोघांना
मारण्यासाठी त्यांनी पंजा उगारला. महाराणींनी त्यांना
अडवलं. त्या दोघांना काही इजा केली तर गुहा सोडून जाईन अशी धमकी त्यांनी दिली.
महाराजांचा
नाइलाज झाला. महाराणींपुढे त्यांची डाळ शिजेना, तरीसुध्दा महाराज काहीही करु शकतात
हे लक्षात आल्यानं महाराणी त्या दोन्ही पिलांची खूप काळजी घेऊ लागल्या.
बिबट्याच्या
पिलांनासुध्दा महाराणींचा लळा लागला. महाराणी त्यांना आपल्या नजरेसमोरुन दूर
जाऊ देत
नसत. हळूहळू बिबट्याची पिलं मोठी होऊ लागली. महाराणींनी त्यांना
स्वरंक्षण करणं, शिकार करणं व इतर अनेक बाबी शिकवल्या.
महाराजांबद्दलही
त्या त्यांना सतत चांगलच सांगत असतं. महाराजांचा राग करु नका.
ते प्रेमळ आहेत. ते रागावले तरी शांत राहा, असं बरच काही त्यांनी त्यांना शिकवलं.
महाराणींना दोन
राजपुत्र होते. त्यांचीही बिबट्यांच्या
पिल्लांसोबत मैत्री झाली. लहानपणापासून चारही जण एकत्रच वाढल्याने त्यांची
मैत्री घट्ट झाली. मात्र महाराजांना हे सुध्दा पसंत नव्हतं. ते कायम बिबट्यांच्या
पिल्लांवर गुरगुरत असत.
एकदा सिंह
महाराज जंगलात महाराणींसोबत फिरायला गेले होते. त्यांनी दोन्ही
राजपूत्र आणि बिबट्याच्या दोन्ही पिल्लांना सोबत यायला सांगितलं. महाराज आणि
महाराणी समोर आणि चारही पिल्ल मागे,अशी त्यांची छान भ्रमंती सुरु होती.
रमतगमत पुढे
पुढे जात असताना महाराज आणि महाराणी शिकाऱ्याच्या जाळयात सापडले. ते बघून राजपुत्र
पळून गेले. मात्र दोन्ही बिबट्यांची पिलं तिथचं घुटमळत राहिली. त्यामुळे शिकारी
चरुफडू लागले. शिकारी कुठे लपला असल्याचं एका बिबटयाच्या
लक्षात आलं. त्याने चपळाई
करुन त्याच्यावर हल्ला चढवला. हे बघून तो शिकारी घाबरला आणि पळू लागला. दुसऱ्याने
त्याची मानगुटी पकडून त्यास ठार केले. तो शिकारी ठार झाल्यावर त्या दोन्ही पिलांनी
आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडून काढलं व दोघांची सुटका केली.
आपण ज्यांचा
एवढा राग करत होतो त्यांनीच आपले प्राण वाचवल्याचं बघून महाराजांना गहिवरुन आलं.
त्यांनी महाराणींची क्षमा मागितली.
महाराणी
म्हणाल्या,
“आपण प्रेम दिलं
,काळजी वाहिली तर पिल्लं कुणाचीही असली तरी ती
अशी प्रेमळ होतात. आपल्यावर
माया लावतात. आपली काळजी घेतात, महाराज.”
“होय महाराणी, चुकलंच आमचं
असं म्हणून त्यांनी महाराणी आणि त्या दोन पिल्लांची क्षमा मागितली. त्यानंतर ती
पिल्लं महाराजांचे प्रमुख रक्षक झाले.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment