फुलासारखे मित्र
फुलासारखे
मित्र
तेजोमयीचे
बाबा तिला दर महिन्याला गोष्टीची पुस्तकं, मुलांची मासिकं
विकत घेऊन देतं. हळू-हळू पुस्तकं आणि मासिकं वाढल्याने, आईने तिला कपाटातला एक
कप्पा पुस्तकं ठेवण्यासाठी दिला.
पुस्तकं
वाचली की पुन्हा व्यवस्थित जागच्या जागी ठेवायचं, असं प्रत्येक
पुस्तकाच्या वेळी तिला आई- बाबा सांगत. त्यावर तेजोमयी
होकारार्थी मान हलवायची.
प्रारंभी तेजोमयीनं आई-बाबांचं
एैकलं. मात्र नंतर ती कंटाळा करु लागली. पुस्तकं वाचायला
घेतल्यावर कप्पा तसाच विस्कटलेला राहू लागला. या कप्प्यातून
ती खसकन पुस्तक काढायची. कशीही ठेवायची. यामुळे कधी मुखपृष्ठ
फाटायचं तर कधी पुस्तकांना घडी पडायची. कधी एखादं पानही फाटायचं. पुस्तकांचे हाल
बघण्यासारखे असे.
एकदा
बाबांनी हे सारं बघितलं. त्यांनी पुन्हा पुस्तकांची महती तेजोमयीला
सांगितली. "पुस्तकं
मित्रांसारखे असल्यानं त्यांना प्रेमानं वागवायचं असतं, फुलांसारखे असल्याने
काळजीपूर्वक हाताळायचं असतं", असं बाबांनी लक्षात आणून दिलं.
"आपण
यापुढे पुस्तकांच्या बाबतीत अजिबात हलगर्जी करणार नाही. त्यांना कपाटात
व्यवस्थित ठेऊ.
काळजीने काढू",असं
तेजोमयीनं बाबांना आश्वासन दिलं. पण तिचं आश्वासन एकाच दिवसात हवेत विरलं.पुन्हा येरे
माझ्या मागल्या. त्यामुळे एके दिवशी आईच्या हातचा प्रसाद खावा लागला. तरी फार
परिणाम झाला नाही. शेवटी आईबाबांनी या विषयावर बोलणं सोडून दिलं.
परवा, तेजोमयीला एका निबंध स्पर्धेसाठी काही
संदर्भ हवे होते. तिने बाबांना विचारलं. बाबांनी तिच्याकडे असलेल्या पुस्तकाचं
नावं सांगितलं. तेजोमयी पुस्तकं शोधू लागली. अथक प्रयत्नानं तिला हे पुस्तक
मिळालं. तिच्या ओढाओढीत हे पुस्तक अनेक
जागी फाटलं होतं. काही पृष्ठांचे तुकडे पडले होते. बरीच पृष्ठं दुमडल्याने काही
ओळी वाचताच येत नव्हत्या.
"आता हो
काय बाबा?" तेजोमयीने
इवलस तोंड करुन विचारलं.
"आता
काय? आलिया
भोगासी असावे सादर.आम्ही तुला समजावलं होतं,पण तू एैकलं नाहीस".
"पण
बाबा यापुढे मी चूक करणार नाही.मला सांगना प्लिज ."
"मुळीच नाही.तुला निबंध स्पर्धेत
बक्षीस नाही मिळालं तरी चालेल. पण मी तुला मदत करणार नाही.हे पुस्तक आज छान
स्थितीत असतं तर किती फायदा झाला असता तुझा. नाही का?"बाबा म्हणाले.
"होय बाबा", बारिक
आवाजात तेजोमयी म्हणाली.

Comments
Post a Comment