मानगुटीवर पुस्तक
मानगुटीवर पुस्तक
ते साल
होतं १९३१. घटना
घडली हुआन प्रातांत. हा प्रांत येतो चीन देशात. एके दिवशी या
प्रांताचे राजे फार चिडले. त्यांच्या
चिडचिडण्याने राजवाडा दणाणून गेला. राणीसाहेबांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न
केला, पण चिडलेल्या राजेसाहेबांनी त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ते तरातरा
तरातरा चालत दरबारात आले.
प्रधानजी
नुकतेच दरबारात आले होते. राजेसाहेबांनी प्रधानजींना आपल्या जवळ बोलावून घेतलं आणि
त्यांच्या कानशिलात लगावली. दरबारात असं पहिल्यांदाच घडत होतं. याप्रकाराने
प्रधानजी हबकून गेले. दरबारात टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता निर्माण झाली.
सेनापती थरथर कापू लागले. राजेसाहेबांना असं अचानक काय बरं झालं असेल? याचा विचार
प्रत्येक दरबाराच्या मनात आला. राजेसाहेबांनी प्रधानजींना जागेवर बसण्याची आज्ञा
केली. हबकलेले प्रधानजी कसेबसे आसनस्थ झाले.
राजेसाहेबांनी
आता सेनापतींना आपल्या जवळ बोलावलं. सेनापती गर्भगळीत झाले. त्यांचे पाय लटपटू
लागले. त्यांच्याच्याने चालवेना. तेव्हा राजेसाहेब तरातरा तरातरा चालत
त्यांच्याकडे गेले आणि त्यांना आदेश देते झाले,
"सेनापती,
आम्ही जसं प्रधानजींना हाणले तसं तुम्ही आम्हास हाणा !" राजेसाहेबांचा
हा आदेश ऐकून सर्व दरबाऱ्यांची, महाराजांना भूत-प्रेत बाधा झाल्याची खात्री झाली.
प्रधानजी
हबकलेल्या अवस्थेतही राजेसाहेबांना नम्रपणे म्हणाले,
"महाराज
तुम्ही, आम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा मारा. पण असं मानगुटीवर भूत बसल्यासारखं
आमच्याकडून मार खाण्याचा विपरीत आदेश देऊ नका. मांत्रिकांना बोलावून
आपल्या मानगुटीवर बसलेल्या भुताची करणी आपण सोडवून टाकू."
"प्रधानजी अहो, भूत
माझ्या मानगुटीवर बसलेलं नाही. तर हे पुस्तक बसलय माझ्या मानगुटीवर." राजेसाहेब
म्हणाले.
"पुस्तक?" सर्व
दरबारी एका आवाजात आश्चर्यचकित होऊन किंचाळले.
सेनापतींच्या
आता जिवात जीव आला. त्यांचे लटपटणारे पाय स्थिर झाले.
त्यांनी
विचारलं,
"कोणतं
पुस्तक महाराज
?"
"हे ते
पुस्तक."आपल्या
विजारीतून पुस्तक काढून राजेसाहेबांनी सेनापतींकडे दिलं. सेनापतींनी उलटसुलट करुन
ते बघितलं. त्यांनी ते प्रधानजींकडे दिलं. त्यांनीही ते उलटसुलट करुन बघितलं.
"महाराज
हे पुस्तक तर लहान मुलांसाठीचं आहे." प्रधानजी
म्हणाले.
"प्रधानजी,
लहान मुलांसाठी असेल, म्हणून काय झालं?"
"काय
झालं महाराज?" सेनापतींनी
धीर धरुन विचारलं.
"सेनापती,
या पुस्तकात पशू-पक्षी बोलतात असं लिहिलय. तुम्ही कुणीतरी बघितलय का
कधी पशू-पक्षांना बोलताना?"
"नाही
महाराज, नाही महाराज."दरबारातील सर्वजण एकासुरात म्हणाले.
"पशूपक्षी
बोलतात, असं लिहून या पुस्तकाच्या लेखकानं आपल्यासारख्या मानवांचा अपमान केलाय."
राजेसाहेब म्हणाले. हा अपमान कसा झाला? हे काही त्यांनी सांगितलं नाही.
दरबाऱ्यांनीही ते विचारलं नाही.
"मग
महाराज, आता आपण काय करायचं?" प्रधानजींनी विचारलं.
"या
अपमानाचा आपण बदला घेतला पाहिजे."
"बदला !" सेनापती
भीतीयुक्त आश्चर्यानं म्हणाले.
"होय
बदला ! चांगली
अद्दल घडली पाहिजे, त्या लिहिणाऱ्यास."
"आपण
आदेश द्या महाराज." प्रधानजी म्हणाले.
"प्रधानजी
या पुस्तकावर बंदी टाका. आत्ता या क्षणापासून. ज्याने हे लिहिलेय त्यात तुरुंगात
पाठवा."
"होय
महाराज".
प्रधानजी म्हणाले.
प्रधानजींना
दिलेल्या आदेशाने राजेसाहेब समाधानी झाले. त्यांची चिडचिड कमी झाली. दरबारातून प्रस्थान
करण्यापूर्वी त्यांनी प्रधानजींकडे जाऊन त्यांची क्षमा मागितली.आपल्या आदेशाची
त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
०००
राजेसाहेबांच्या
आदेशानुसार प्रधानजी कामाला लागले. राजेसाहेबांनी ज्या पुस्तकावर बंदी आणण्यास
सांगितलं होतं ते होतं, "अलाईस ॲडव्हेंचर इन
वंडरलँड." या
पुस्तकात लहानगी अलाईस ही मुलगी एका सशाच्या
बिळात पडते. ती पुढे पोहचते एका कल्पनारम्य जगात. जिथे खूप घटना-घडामोडी घडतात. या
जगातील पशू-पक्षी खूप बोलतात. चांगलं बोलतात.वाईट बोलतात.बहुतेकवेळा सर्वांना
कळणारं बोलतात. तर काहीवेळा कुणालाही काहीही न कळणारं बोलतात. राजेसाहेबांना या
पशुपक्ष्यांचं असं बोलणं आवडलं नव्हतं. प्रधानजींनी या पुस्तकावरील बंदिचा आदेश
ताबडतोब जारी केला.
या
पुस्तकावर लेखकाचं नाव होतं, ल्युईस कॅरोल. याला शोधायचं कसं? हा प्रश्न
प्रधानजींना पडला. अशावेळी सर्व राजे-महाराजे यांचे प्रधानजी जे
करतात तेच त्यांनी केलं. त्यांनी सर्व दिशांकडे ल्युईस कॅरोलला शोधायला खासे
म्हणजे विशेष सैनिक पाठवले. काही महिन्यांनी हे सर्व सैनिक हात हलवत परत आले.
एकालाही लुईस कॅरोलचा पत्ता लागला नाही.
०००
मात्र
दरम्यान एक दुर्घटना घडली.
सर्व
सैनिक येण्याच्या एक दिवस आधीच राजेसाहेबांचं निधन झालं. त्यामुळे प्रधानजींपुढची
समस्या आपोआपच मिटली.त्यांना हायसं वाटलं.
००००
राजेसाहेबांचं
अंत्यसंस्कार पार पाडून प्रधानजी आपल्या राजवाड्याकडे परत असताना, रस्त्यावरील
पिंपळाच्या झाडावरुन राजेसाहेबांचं भूत त्यांच्यासमोर उभं ठाकलं. प्रधानजींना
दरदरुन घाम फुटला. भीतिने त्यांचा घसा कोरडा पडला.
"प्रधानजी,
आम्हास ठाऊक आहे, तुम्हाला लेखकाचा पत्ता लागलेला नाही ते ! त्यामुळे
आमच्या आत्म्यास शांती मिळणार नाही हे लक्षात आल्यानं आम्हीच त्या लेखकाचा शोध
घेतला. तुमच्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं आणि माझ्या मानगुटीवरचं पुस्तकाचं भूत
अंतर्धान पावावं म्हणून मीच तुमच्यापुढे हे रहस्य उघडे करतो नि मुक्त होतो यातून !"
"म्हणजे
महाराज ?"
प्रधानजी त त प प करत विचारते झाले.
"प्रधानजी,
ल्युईस कॅरोल नावाचा कुणी लेखकच नाही."
"काय
सांगता ?"
प्रधानजींनी दचकून विचारलं.
"अहो,
चार्ल्स डॉजसन हा गणितज्ज्ञ या पुस्तकाचा लेखक ! त्याला
दूरदृष्टी असावी. माझ्यासारख्या राजांना पशूपक्षांचं बोलणं आवडणार नाही. असं
काहीबाही लिहिलं म्हणून ते आपणास पकडून शिरच्छेद करतील,अशी त्याची पक्की समजूत
होती. म्हणून त्याने टोपण नावानं हे पुस्तकं लिहिलं."
"कुठे
राहतो महाराज हा लबाड चार्ल्स ?आता सैनिक पाठवतो नि त्याला पकडून तुमच्यासमोर
उभा करतो."
"प्रधानजी
जाऊ द्या हो. आता काय करायच त्याला पकडून ? आमच्यासोबतच
आमची आवडनिवडही संपली. तुमच्यासमोर रहस्य उघड केल्याबरोबर आता आम्हास खूप खूप बरं
वाटतय. चिडचिड कमी झाली. प्रधानजी, आपल्या राज्याने जरी पुस्तकावर बंदी आणली तरी
तुम्ही हे पुस्तक गुपचूप वाचा हं ! जगातल्या ९० भाषेत हे पुस्तक
भाषांतरीत झालयं. वाचताना खूप मजा येते. कल्पनतेल्या जगात रमायला कुणाला आवडत नाही
म्हणा ! तुम्ही
रमा नि आंनद घ्या बरं का?" असं बालून राजेसाहेबांनी
पिंपळाच्या झाडावर जाउुन बसलं आणि हळूहळू अंतर्धान पावलं.
प्रधानजी
भानावर आले. ते धावतच महालात पोहचले. राजेसाहेबांनी दिलेलं, अलाईस इन
वंडरलँड, हे पुस्तक अधाशासारखं वाचून काढलं.

Comments
Post a Comment