जादूचा मंत्र


 

जादूचा मंत्र

सिंह महाराजांना आपल्या राजपुत्राचे कोण कौतुक होते.तो दिसायला त्यांच्यापेक्षा डौलदार होता. त्यांच्यापेक्षा चपळ होता. त्याची बुध्दीही तेज होती. नजर करारी होती. आपल्यानंतर हा राजपुत्र वननगरीचा सांभाळ अतिशय सुयोग्यरीतिने करेलच पण या राज्याच्या सीमाही वाढवेल अशी त्यांना खात्री होती. आपल्या या हरहुन्नरी मुलाचा त्यांना अभिमान होता. पण राजपुत्राला कां कोण जाणे, शिकारीचा भयंकर कंटाळा यायचा. त्याला शिकार करण्यापेक्षा  शिकण्यात अधिक रस होता. राजाला कामापुरतं शिक्षण पुरेसं असतं असं महाराजांना वाटे. पण राजपुत्राला मात्र एखाद्या गुरुकडे जाऊनच शिकायची इच्छा होत असे. तसे त्याने महाराजांना बोलूनही दाखवले.

अरे पण शिकून काय करणार, महाराज त्याला म्हणाले.

आबासाहेब, शिकून मी  आपल्या राज्याचा कारभार अधिक चांगल्या पध्दतीने चालवणार. राजपुत्राने उत्तर दिलं.

म्हणजे आम्ही चांगलं राज्य चालवत नाही किंवा तुमच्या आजोबांनी किंवा तुमच्या पणजोबांना चांगलं राज्य चालवलं नाही असं म्हणायचय का तुम्हाला? महाराज रागावून म्हणाले.

आबासाहेब आम्हाला शिकू द्या मग ठरवा, शिक्षणाने कसा काय आमचा फायदा झाला ते.

राजपुत्र शिक्षणाचा हट्टच धरुन बसले. त्यामुळे नाइलाजाने त्यांना गुरुकुलात पाठवावे लागले.

०००

सिंह महाराज जरी वननगरीचे राजे असले तरी बहुतेक सर्व प्राणी त्यांच्यापासून दूरच राहणे पंसद करत. त्याचे कारण म्हणजे, ते कुणाशी फारस चांगलं बोलत नसत. सर्वांना तुच्छ समजत. सर्वांना हीडिस फिडीस करत. उगाचच त्रास देत. आपल्याच प्रजाजनांवर अन्याय अत्याचार करत. त्यामुळे हळूहळू वननगरीतले प्राणी त्यांना सोडून इतरत्र जाऊ लागले. त्यामुळे बाजूच्या वननगरीचा राजा अधूनमधून या वननगरीवर हल्ला करुन, वनगरीचा लचकेतोडू लागला. वननगरीच्या संरक्षणासाठी इतर प्राणी पुढे येईनासे झाले. वननगरीची रयाच गेली. त्यांचं भलंमोठं साम्राज्य आता त्यांच्या गुहेपुरतं आणि त्याच्या अवतीभवती असणाऱ्या झाडा झुडपांपर्यंत शिल्लक राहीलं होतं.

०००

काही वर्षानंतर राजपुत्र गुरुकुलातून शिक्षण घेऊन परत‍ आला. आपल्या राज्याची ही अशी दयनीय अवस्था बघून त्याला फार दु:ख झालं. त्याने महाराजांना नेमकं काय झालं हे विचारलं तर ते, जंगलातील प्राण्यांना शिवीगाळ करु लागले. अजुनही त्यांचा तोरा आणि अहंकार काही कमी झाला नव्हता. राजपुत्राच्या थोडंफार लक्षात आलं.

तो महाराजांना म्हणाला, महाराज आता मी आलोय ना. तुम्ही काही काळजी करु नका. मी सारं काही ठीक करतो. आपलं साम्राज्य पुन्हा नव्या झळाळीने चमकू लागेल. खात्री‍ बाळगा.

अरे तू, एकटा कसं काय करणार हे सगळं.

महाराज, माझ्याकडे एक जादुचा मंत्र आहे. त्याने हे सारं काही साध्य होईल. तुम्ही काळजी करु नका. राजपुत्राने महाराजांना दिलासा दिला. आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला.

०००

हा सिंह राजपुत्र त्याच्या वडीलांपेक्षाही अधिक क्रुर असेल असे समजून जंगलातील शिल्लक राहिलेले प्राणी त्याच्यापासून दूर दूर पळू लागले. राजपुत्राने आपल्या शिल्लक राहिलेल्या राज्याच्या या सीमेपासून त्या सीमेपर्यंत चक्कर टाकली. कुणालाही काही केलं नाही. उलट झाडावरच्या पक्षांकडे बघून ते प्रसन्न हसले. माकडांकडे बघून, येता का माझ्यासोबत जंगल भ्रमंतीला असं म्हणाले. झाडंझुडपात लपलेले प्राणी राजपुत्राचे बारकाईने निरीक्षण करत होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा राजपुत्र या टोकापासून त्या टोकापर्यंत गेले. पक्षांकडे बघून म्हणाले येता का माझ्यासोबत जंगलभ्रमंतीला, कुणाची हिंमत झाली नाही. पण एक इटुकली चिमणी त्यांच्या माथ्यावर येऊन बसली. तिला घेऊन राजपुत्र संपूर्ण जंगलात फिरला. परतीच्या प्रवासात त्याने चिमणीला तिच्या झाडाजवळ आणून सोडले. तिच्याकडे बघून हसत हसत निरोप घेतला. आजही झाडा झुडपात लपलेले प्राणी राजपुत्रांकडे बारकाईने बघत होते. त्यांचे निरीक्षण करत होते. तिसऱ्या दिवशी हरण आईच्या सांगण्याला न जुमानता एक पाडस राजपुत्राकडे आलं. ते दोघांनी नंतर जंगलं पालथं घातलं. संध्याकाळी  राजपुत्राने पाडसाला त्याच्या घराजवळ आणून सोडलं.

दिवसभर पाडस राजपुत्रासोबत असूनही त्याला त्यांनी काहीच केलं नाही, हे इतर प्राण्यांच्या लक्षात आलं. महाराजांपेक्षा हे राजपुत्र वेगळे असल्याची खात्री बऱ्याच प्राण्यांना पटली.

आठवडाभरानंतर बरेच प्राणी राजपुत्रासोबत‍ जंगल प्रवास करु लागले.एके दिवशी, राजपुत्राने जंगलातील मोठ्या तलावाजवळ सर्व प्राण्यांना नेलं. ते तलावाचं थंडगार पाणी प्याले. इतरही प्राण्यांना पाणी प्यायला सांगितलं. काही प्राण्यांनी पाणी पिलं नि ते लगेच बाहेर आले. पण एक गाढवं मात्र पाण्यात खेळत राहिलं. हे बघून पाण्यातल्या मगरीने त्याच्यावर हल्ला केला नि त्याचा एक पाय घट्ट पकडला. गाढव ओरडले. राजपुत्राच्या लक्षात सारं काही आलं. त्यांनी क्षणाचाही उशीर न करता पाण्यात उडी मारली. गाढवाला पाण्यात ओढून नेणाऱ्या मगरीचे शेपूट पकडून तिला पाण्याबाहेर ओढले. सिंह राजपुत्रांच्या तीक्ष्ण दातांनी तिच्या शेपटीला जखम झाली. तिला वेदना असह्य होऊ लागल्या. तिचा जबडा उघडला गेला. गाढवाने लगेच आपली सुटका करुन घेतली. मगरीच्या तीक्ष्ण दातामुळे त्याच्या पायला चांगलीच जखम झाली होती. त्याला धड चालता येईना. तो तिथेच धाडकन कोसळला. राजपुत्राने मगरीला सोडून दिले नि ते गाढवाकडे धावले. त्यांनी आजूबाजूला बघितले. ते लगेच बाजूच्या झुडपात शिरले आणि काही वेळाने तोंडात काही  झुडपं‍आणि फुलं घेऊन आले. त्यांनी त्या झुडपाचा पाला आणि फुल चावायला सुरुवात केली आणि लगेच त्यांनी त्याचा झालेला चोथा गाढवाच्या जखमेवर टाकला. गाढवाला बरे वाटले. त्याचे विव्हळणे कमी झाले वेदनाही कमी झाल्या. सर्व प्राणी राजपुत्राचे बारकाईने निरीक्षण करतच होते. हा राजपुत्र महाराजांपेक्षा वेगळा असल्याचे आता बहुतेक सर्वांच्या लक्षात आले.

इतर प्राण्यांनी गाढवाचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे आभार माणले.

हळूहळू राजपुत्राची ख्याती इतरत्र पसरु लागली. त्यामुळे वननगरीतून निघून गेलेले प्राणी पुन्हा परतू लागले. राजपुत्र सर्वांशी चांगला वागायचा. कधीही अरेरावी करायचा नाही. कुणाला त्रास द्यायचा नाही. त्यामुळे सर्व प्राणी त्यांच्यावर प्रेम करु लागले. राजपुत्राने त्यांचा विश्वास संपादन केला. एके दिवशी त्याने आपल्या सर्व नव्या मित्रांना आपल्या राज्याचे जुने वैभव परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. सर्वांनी ती आनंदाने मान्य केली. या सर्वांच्या सहाय्याने राजपुत्राने ,शेजारच्या ज्या राज्याने वननगरीचा भाग बळकावला होता. तो आक्रमण करुन परत मिळवला. शेजारच्या राजासोबत‍ झालेल्या लढाईत त्याने फक्त राजाला आणि त्याचे आक्रमण करणाऱ्या सैनिकांच पकडले. इतरांना जराही त्रास दिला नाही. उलट सर्वांशी तो प्रेमान वागला. नम्रपणे वागला.

आता महाराजांचे राज्य पूर्वीपेक्षाही मोठे झाले. महाराजांना फार आनंद झाला. एके दिवशी महाराज आणि राजपुत्र वननगरीची पाहणी करण्यासाठी निघाले. रस्त्यावर बरेच प्राणी गोळा झाले. ते सर्व राजपुत्राचा जयजयकार करु लागले. राजपुत्रही सर्वांशी नम्रपणे गोडीगुलाबीने बोलू लागला. काही प्राणी त्यांच्या सलगीही करु लागले. हे मात्र महाराजांना आवडले नाही. त्यांनी डरकाळी फोडली. ते प्राण्यांना अद्वात्दवा बोलू लागले. त्यांचा तो अवतार बघून इतर प्राणी तिथून पळून गेले. आणखी काही विपरीत घडू नय म्हणूने राजपुत्राने महाराजांना गुहेकडे चालण्याची विनंती केली. महाराज रागारागात गुहेकडे परतले.

घरी येता क्षणी ते राजपुत्रावर बरसले. प्राण्यांशी गोडीगुलाबीने बोलणाऱ्या राजपुत्राला त्यांनी मुर्खात काढले.

असे वागणे सिंहाच्या मुलाला शोभत नसल्याचे ते गरजले.

त्यांना शांत करत राजपुत्र म्हणाला, महाराज मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की, मी आपल्या राज्याचे जुनै वैभव पुन्हा परत आणीन.

हो हो ते आश्वासन तू पाळून मोठे कौतुकाचे कार्य केले आहे. पण म्हणून तू या प्राण्यांशी इतक्या नम्रपणे वागण्याची गरज नाही. आम्हाला ते आजिबात पटेलले नाही.

महाराज, मी तुम्हाला म्हंटलं होत नाकी माझ्याकडे जादुचा एक मंत्र असून त्याव्दारे मी आपले वैभव पुन्हा परत आणीन.

हो हो हो.. त्याचा आणि या नम्रपणाचा काय संबंध महाराज गरजले.

महाराज, माझ्या गुरुंनी सांगितेला तो जादूचा मंत्रच मी तुम्हाला ऐकवतोना. मग तुमची सुध्दा खात्री पटेलं..

हं सांग.महाराज गुस्स्यात म्हणाले.

राजपुत्राला मुखोदगत असलेला मंत्र म्हणू लागले,

अरे या चा अर्थ काय. महाराजांनपी विचारलं.

 

महाराज,याचा अर्थ असा की तुम्ही गोड बोलून नम्र वागून जे काही साध्य करु शकता ते इतरांना त्रास देउुन, धाकदपटशा करुन शक्य होत नाही...

या जादूच्या मंत्राचा मी वापर केली नि आपल्या सर्व प्राण्यांना मित्र केले. त्यांचा विश्वास संपादन केला आणि शेजारच्या राजालाही हरवले.

                    एका गोड बोलण्याने आपल्या साम्राज्याचे वैभव परत मिळाले...

आँ...

होय महाराज...राजपुत्र म्हणाला. महाराजांनी काही क्षण डोळे मिटले. त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळयात अश्रू होते.त्यांनी राजपुत्रांची क्षमा मागितली. आपण आतापर्यंत चूक करत होतो हे कबूल केले. त्‍यांनी दुसऱ्या दिवशी दरबार बोलावला नि राजपुत्राच्या डोक्यावर राजाचा मुकूट ठेवला. यापुढे हा तुमचा नवा राजा अशी त्यांनी घोषणा केली. सर्व दरबाऱ्यांनी टाळ्या वाजवून नव्या आणि जुन्या महाराजांचा जयजयकार केला.

०००

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!