झेब्र्याच्या चमत्कार!
झेब्र्याच्या चमत्कार!
तेजोमयीचा काका गेल्याच
आठवड्यात आफ्रिकेवरुन परतला. तो त्याच्या घरी नागपूरला जाण्याआधी काही काळासाठी
तेजोमयीच्या घरी थांबला. आफ्रिकेमध्ये त्याने बऱ्याच जंगल सफारी केल्या. या
सफारीचं वर्णन तो,
असं
करायचा की जणू काही ते प्रत्यक्षच तिथे आहेत. अलेक्झांडरसुध्दा तन्मयतेने कान देऊन
सारं काही ऐकत असे.
या सफारीच्या गोष्टी
सांगता सांगता काका म्हणाला,
मी एक गंमत दाखवतो.
“कशाची
रे?”
तेजोमयीने
विचारलं.
“अगं
तू,
आधी
बघ की.” असं बोलून त्याने पेनड्राइव्ह टीव्हीला
लावला. त्या पेनड्राइव्हमध्ये त्याने, एका झेब्राचा जन्म चित्रित केला होता.
चित्रफित सुरु असताना तो आँखो देखा हालही रंगवून रंगवून सांगू लागला.
" जिराफाचं बाळ आईच्या
पोटातून बाहेर आलं. त्या बाळाच्या रंगावर करडा आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे होते.
आईच्या पाठीवर काळे आणि पांढरे पट्टे होते. ते बाळ बरोबर पंधराव्या मिनिटाला
स्वत:च्या पायावर उभं राहिलं. त्या ठिकाणी जमलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
टूर गाईड म्हणाला, आणखी अर्धातास थांबून पुढचा चमत्कार बघा.
काहींना हा चमत्कार बघण्यात रस वाटला नाही. मी आणि एक दोन जण मात्र तिथेच थांबलो.
अर्ध्या तासानंतर काय घडतं?
याबद्दल
माझी उत्सुकता शिगेला पोहचली. आणि तो क्षण आला. ते पिल्लू चालू लागलं. माझे डोळे
विस्फारले.
थांबायचं की पुढे जायचं? गाईडने विचारलं.
आता काय घडणार?मी पुन्हा विचारलं
नक्कीच अदभूत घडणार! टूर
गाईड उत्साहाने म्हणाला. दुसऱ्या पर्यटकाला, ते अदभूत बघण्यात रस नसल्याने तो पुढे निघून
गेला. मी मात्र तिथेच थांबलो. एका तासानंतर, ते चालणारे पिल्लू चक्क धावू लागले. मला तर
विश्वासच बसेना."
काका झेब्र्याच्या
पिल्ल्याचं कौतुक करण्यात चांगलाच रंगून गेला होता.
चित्रफीतीतले ते दृष्य
बघून तेजोमयी थक्क झाली. अलेक्झांडरही आ वासून
आणि जिभ लांब करुन ते दृष्य बघत राहिला. हे चित्रीकरण पुन्हा पुन्हा तेजोमयीनं
बघितलं.
“भारी चमत्कार बॉ! जन्मल्यानंतर एका तासात दौड
!” ती आश्चर्य व्यक्त करीत म्हणाली.
“मानसाच्या
बाळाला स्वत:च्या पायावर उभं राहायला किमान एक वर्षं लागतं.”
काका म्हणाला.
“खरंच
रे काका,
हे
झेब्र्याचं बाळ,
मानसाच्या
बाळापेक्षा किती सक्षम असलं पाहिजे.”
“आहेच
की! तोच काय इतरही बरेच प्राणी, या सृष्टितले अनेक पक्षी, जलचरसुध्दा आपल्यापेक्षा सक्षम आहेत. पण या
सगळ्यांना मानवानं बिच्चारं करुन सोडलय?”
“म्हणजे
रे काय काका?”
“अगं, ही पृथ्वी काही केवळ मानवासाठी बनलेली नाही .
मानवाच्या आधीपासून म्हणजे कोट्यावधी वर्षापासून इथे वेगवेगळया प्रजाती वास्तव्यात
आहेत. पण मानवाने आपल्या स्वार्थासाठी
निसर्गाची,
पर्यावरणाची
जमेल तितकी नासधूस केली. त्यामुळे यातील काही प्रजाती नष्ट झाल्या तर काही नष्ट
होण्याच्या मार्गावर आहेत.”
“बापरे...”
“तुमच्यासारख्या
मुलांनी निसर्गाची ही हेळसांड थांबवली पाहिजे. अन्यथा एके दिवशी जन्मानंतर अवघ्या
एका तासात धावू शकणारा हा पृथ्वीचा सक्षम लेकरु, झेब्रा आपल्या डोळयादेखत नष्ट होऊन जायचा.”
काका खोल आवाजात म्हणाला. अलेक्झांडरने कुंई करुन त्याला सहमती दर्शवली. तेजोमयीचे
डोळे पाणावले.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment