थेंबे थेंबे साखर!
दररोज एक बालकथा
थेंबे थेंबे साखर!
“उगाच कशाचीही नासाडी करणं योग्य नाही”, असं आई नेहमी रवीला बजावयाची. पण रवी या कानाने ऐकणार नि त्या कानाने सोडणार. खरंतर
बरेचदा तो, हो हो म्हणत ऐकायचं नाटक करायचा. त्यामुळे आईने काय सांगितलं हे याकडे त्याचं दुर्लक्ष व्हायचं.
आई त्याला सांगायची की,अरे, थोड्याथोड्या गोष्टींची नासधूस होत असताना त्यावेळेस ती गोष्ट अगदी किरकोळ वाटते. मात्र , या लहान सहान गोष्टींतूनच मोठी गोष्ट साध्य होते हे विसरता कामा नये. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना अगदी तसं.”
एकदा यावर रवी महाराज आईला उत्तर देते झाले,
“अगं आई, थेंबांनी कुठे काय तळं साचणार? एक थेंब पडला की तो लगेच जमिनीत विरुन जाणार!असे कितीही थेंब पडले तरी त्यांची गत अशीच होणार.!”
यावर आईला लगेच काही उत्तर देता
आलं नाही. आता याला कसं समजावं याचा
आई विचार करु लागली. शेवटी तिला एक कल्पना
सुचली. ती रवीला म्हणाली,
“तुला मी सिध्द करुन दाखवते.”
“म्हणजे जादू की काय?कधी शिकलीस गं तू, ही जादू?”” रवी डोळे बारिक करत
म्हणाला.
“अरे, ही जादू
नाही.गणित आहे यात.”
“म्हणजे गणिताची जादू म्हण की.”रवी हसून म्हणाला.
“तसं समज.” असं बोलून तिने
रविला साखरेचा डबा दिला. समोर एक रिकामा डबा ठेवला.
“हे काय?”
“ही जादू समज.तू या डब्यातून वीस साखरेचे दाणे दररोज काढून या रिकाम्या
डब्यात पंधरा दिवस टाक. सोळाव्या दिवशी जादू बघ.”
आईने सांगितल्याप्रमाणे रविने पंधरा दिवस बरोबर वीस दाणे रिकाम्या डब्यात टाकले. सोळाव्या दिवशी त्यात काय जादू
घडली म्हणून त्याने उत्सुकतेने तो डबा उघडून बघितला. त्यात त्याला साखरेशिवाय काहीच दिसलं नाही. आईने आपल्याला उल्लू बनवल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो तिरमिरीतच आईकडे आला नि तिला डबा देत म्हणाला.
“आई, या डब्यात तर
काहीच जादू दिसली नाही मला.तू मला बनवलेस.”
“छे छे, मी कशाला बनवेल?तुला जादू दाखवते. चल
स्वयंपायकघरात.”असं म्हणून आई तो डबा घेऊन रवीसोबत
स्वयंपाकघरात आली.तिने भांड्यात एक कप दूध घेतलं नि गॅसवर गरम करायला ठेवलं.
“तुला किती चम्मच साखर हवी असते रे इतक्या
दुधासाठी”,आईने रवीला विचारलं.
“एक चम्मच.”रवी म्हणाला.
आईने त्या डब्यात चम्मच घातला.त्यात बरोबर एक चम्मच साख्रर
जमा झाली होती.आईने ती चम्मचभर साखर दुधात टाकली.
“अगं पण यात कोणती आलीय जादू?” रविने आश्चर्याने
विचारलं.
“अजूनही तुला कळलं नाही.”
“नाही.”
“अरे,तू दररोज किती साख्रर या डब्यात टाकत होतास.”
“वीस दाणे.”
“अशा वीस दाण्यांची पंधरा दिवसात चमचाभर साखर झाली.”
“म्हणजे थेंबे थेंब तळे साचे म्हणतात ते हेच की
काय?” तोंडात बोटे
टाकत रवी म्हणाला.
“कळलं ना तुला आता.छोट्या छोट्या गोष्टींनी मोठी
गोष्ट कशी साध्य होते ते. म्हणूनच नासधूस करायची नसते
राज्या.”आई रवीला म्हणाली.
रवी आईच्या कुशीत शिरला आणि क्षमा मागत,यापुढे नासधूस करणार नाही
अशी त्याने शप्पथ घेतली.
Comments
Post a Comment