न्यूटनराव बनले गॅलिलिओ


 न्यूटनराव बनले गॅलिलिओ

तो आमच्या घरी आला तेव्हा आम्हास म्हणजे मी, आई आणि बाबा यांना फार आनंद झाला अशातला भाग नाही. त्याला काही आम्ही निमंत्रण दिलं नव्हतं. तो कोण, कुठला हे सुध्दा आम्हास काहीच ठाऊक नव्हतं.

एके दिवशी खूप मुसळधार पाऊस पडत असताना तो आमच्या दारात आला. पावसानं चिंब भिजल्यानं तो कुडकुडत होता. आमच्या दारापाशी कुईकुई करत पडून होता. बराच वेळ हा आवाज येत राहिल्यानं आईनं दार उघडलं, तेव्हा तो एखाद्या बोचक्यासारखा दारात पडलेला दिसला. बाहेर मुसळधार पाऊस असताना त्या इवल्याशा जीवाला दारातून हाकलून लावावं की तसंच राहू द्यावं की त्याला घरात घ्यावं, असा आईचा गोंधळ उडाला. पण आई ती आईच. काही क्षण ती तशीच दारात उभी राहिली. मग तिने त्या बोचक्या सारख्या जीवाला घरात घेतलं.

आईचा हात लागताच,तो जीव तिच्या कुशीत शिरला. त्याचं कुईकुई ओरडणं वाढलं. तो रडत होता की थंडिने कुडकुडत होता की, त्याला त्याच्या आईची आठवण येत होती, आम्हाला काहीच कळेना. माझ्या आईच्या कुशित शिरलेल्या त्याला त्याच्या आईची उब जाणवली असावी. तो काही क्षणातच गाढ झोपी गेला. मग आईनं त्याला दिवाणखान्यात एका चटईवर ठेवलं. त्याचं अंग पुसून काढलं. त्याच्या अंगावर एक कापड टाकलं.

एका तासानं तो जागा झाला. पुन्हा कुईकुई करु लागला. त्याला आता बरं वाटू लागलं असावं. त्याचं कुडकुडणं थांबलं होतं. तो भिरभिरत इकडे- तिकडे बघू लागला. अंगावरचं कापड त्यानं भिरकावलं. त्याचं लक्ष आईकडे जाताच तो पुन्हा तिच्याकडे झेपावला नि तिच्या कुशित शिरला. तिचे हात चाटू लागला. त्याचं कुईकुई सुरुच होते. त्याला भूक लागली असेल असं म्हणून आईने
त्याला खाली ठेवलं नि स्वयंपाकघरातून त्याच्यासाठी दूध आणलं. त्याने दूध गटागटा पिलं. दूध प्यालानंतर तो लगेच पुन्हा झोपी गेला. दुसऱ्या दिवशीच उठला.

आता तो खूप ताजातवाणा दिसत होता. त्याच्या डोळयातील भीती गेली होती. त्याचं कुडकुडणं थांबलं होतं. सकाळी उठल्यावर त्याने मी आणि बाबांकडे जरा चमत्कारिक नजरेनं बघितलं. आपलं अंग आक्रसून घेतलं, मात्र आई दिसताच त्याने तिच्याकडे धाव घेतली. तिच्या पायाशी तो घुटमळू लागला. आईने त्याला जवळ घेतलं तसं तो तिचे गाल चाटू लागला. शेपटी हलवू लागला. त्याला झालेला आनंद त्याला लपवता येत नव्हता.

थोड्याच दिवसात ते पिल्लू, आईचं बाळ बणून गेलं. मला आणि बाबांना घरात सारखं सारखं बघून एक दोन दिवसात आमच्याबद्दलची त्याची भीती दूर झाली असावी. आम्ही दिसलो की तो आता पूर्वीसारखा आक्रसून जात नाही. शेपटी हलवतो. त्याला आनंदही होतो. पण, तो आईकडे जसा मनापासून धाव घेतो. तसं मात्र करत नाही. आईच्या त्या पहिल्या स्पर्शाने त्याला जी मायेची उब कळली, त्याला काही तोड नव्हती.

काळ्यापांढऱ्या रंगाचं व डोळयात वेगळीच चमक असलेलं हे छोटं बाळ म्हणजे एक कुत्र्याचं पिल्लू असल्याचं तुमच्या लक्षात आलच असेल. मात्र त्याची ही एव्हढीच ओळख पुरेशी नाही.

काही दिवसात हे पिल्लू आमच्या घरी चांगलंच रुळलं. पुढे ते  बाबासाठी व माझ्यासाठी न्यूटनराव झालं तर आईसाठी गॅलिलिओ. या दोन्ही नामकरणाची छान गंमत - गोष्ट आहे..

या पिल्लूला आमच्या बागेत असणाऱ्या पेरुच्या झाडाकडे बघण्याचा आमच्या घरी आल्यानंतर दोन दिवसातच छंद लागला. झाडावरचं फळ पडताना दिसलं की तो आधी एकटक तिकडे बघायचा नि मग उड्या मारत त्याचा आनंद व्यक्त करायचा. त्यातलं त्याला काय कळायचं कुणास ठाउुक. थोर शास्त्रज्ञ न्यूटन सुध्दा असेच तासनतास सफरचंदाच्या झाडाकडे बघत बसायचे. या झाडावरुन सफरचंद पडताना बघितलं की त्यांना आनंद व्हायचा की काळजी वाटायची हे कुणी लिहून ठेवलेलं नाही. मात्र सफरचंद खाली पडण्याच्या क्रियेवरुनच एके दिवशी त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला.

सतत झाडाकडे बघणाऱ्या आणि त्यानंतर पेरु पडताना दिसला की आनंदानं उड्या मारणाऱ्या आमच्या घरी आलेलं पिल्लू मला आणि पप्पांना न्यूटनची आठवण करुन द्यायचा. त्यामुळे आम्ही दोघांनी या पिल्लूचं नामकरण न्यूटन असं केलं. झाडावरुन फळ पडण्याची क्रिया तन्मयतेनं बघणाऱ्या आमच्या या आयझॅक न्यूटनला जर लिहिता आलं असतं, तर कदाचित त्यानं, फळ झाडावरुन पडण्यात दडलेलं नवं गुपित किंवा वेगळं निरीक्षण सुध्दा नोंदवून ठेवलं असतं. त्याला बोलता आलं असतं तर त्याने नक्कीच आम्हास सांगितलं असतं. हे निरीक्षण न्यूटनसाहेबांपेक्षा वेगळही राहू शकल असत. पण तसं होणं नाही, याची आम्हास जाणीव आहेच.

फळं पडण्याच्या क्रियेचं निरीक्षण करण्यातला आमच्या न्यूटनरावांचा रस पुढे दिवसेंदिवस वाढतच गेला. हे निरीक्षण करण्यासाठी त्याने आमच्या वऱ्हांड्यातील खिडकीवर बसण्यासाठी एक जागाही शोधून काढली. त्यावर बसून तो कधी-कधी तर तास, दोन तास सुध्दा फळ पडण्याची वाट बघत बसायचा. सतत तर फळं खाली पडणार नाही, हे त्याला कसं सांगणार ?  फळं पडताना दिसलं की न्यूटनरावांचा खूष. नाहीतर महाशय खिन्न होऊन डोकं खाली घालून बसणार.

अशी स्थिती जेव्हा वांरवार येऊ लागली तेव्हा याचं काय करावं बरं, असा आम्हा तिघांना प्रश्न पडला. तेव्हा आईलाच एक कल्पना सुचली. एकदा न्यूटनराव असेच व्हरांड्यातील खिडकीत नेहमीच्या जागेत बसून, फळ पडणे क्रिया निरीक्षणासाठी सज्ज झाले असताना, एक दोन फुलं खाली पडली. आईने त्याकडे त्याचं लक्ष वेधलं. न्यूटनरावांनी प्रांरभी फार काही उत्सुकता दर्शवली नाही. मात्र नेमकी त्यावेळी हवा सुरु असल्यानं झाडावरची फुलं अधूनमधून खाली पडतच होती. ती पडताना दिसली की आई त्याला तिकडे बघायला सांगायची. अर्ध्या तासानंतर न्यूटनरावांना त्यात गंमत वाटू लागली. आणि तो फुलांच्या पडण्याची क्रिया सुध्दा फळ पडण्याच्या क्रियेसारखाच आनंदाने बघू लागला. समजा फूल आणि फळं एकाच वेळी पडताना त्याने ज्यादिवशी बघितलं तर मग त्याचा आनंद बघायलाच नको. त्याने घर डोक्यावरच घेतलं म्हणून समजा.

०००

तर अशा या न्यूटनरावांमध्ये दुसरे थोर शास्त्रज्ञ गॅलिलोओही दडले असल्यचा शोध एके दिवशी आईला लागला आणि मग त्यांचं दुसऱ्यांदा नामकरण झालं.

एके दिवशी, रात्री जेवण झाल्यावर एकदा आई त्याला घेऊन शतपावली करायला गेली होती. तेव्हा कॉलनीतील वीज अचानक गेली. सर्वत्र अंधार झाला. तो दिवस होता पोर्णिमेचा. चंद्र पूर्ण उगवला होता. त्याचा प्रकाश चांगलाच पसरला होता. आमच्या न्यूटनरावांचं लक्ष या प्रकाशाकडे गेलं. वर आभाळात त्याला पूर्ण उगवलेला चमचमणारा चंद्र दिसला. त्याला ते झाडावर लागलेलं फळ वाटलं असावं. तो बराच वेळ त्याकडे बघत राहिला. तो जेव्हा जागचा हलेना तेव्हा आईस सांगावं लागलं, की बाबा ते फळ नसून चंद्र आहे. हे फळ काही खाली पडणारं नाही. यातलं न्यूटनरावांना काय कळलं कुणास ठाऊक, त्यानं समजल्यासारखं मान हलवली. शेपटी हलवत तो आईसोबत घरी आला.

सकाळी झाडांकडे बघणारे न्यूटनराव दुसऱ्या दिवशी पासून रात्र झाली की, बाहेर पडण्यासाठी आईकडे हट्ट करु लागले. आईने त्यांना बाहेर नेले की न्यूटनराव आभाळकडे टक लावून बघू लागले. दररोज काही असं रात्री बाहेर नेणं आईला जमायचं नाही. न्यूटनरावांनी त्यांच्या पध्दतीनं यावर नाराजीही व्यक्त केली. या नाराजीचा फार काही परिणाम होत नसल्याचं लक्षात आल्यावर व्हरांडयातील खिडकीजवळील त्यांच्या जागेवर बसून रात्र झाली आकाशाकडे ते बघत राहत. याचाही त्यांना अजिबातच कंटाळा येत नसे. कधीकधी तर एक तासाच्यावर न्यूटनरावांचे आकाश निरीक्षण सुरु असायचं. त्यांना आकाशात काय दिसायचं किंवा ते काय शोधायचे हे काही आम्हास कळणं शक्य नव्हतं. त्यांनाही ते सांगणं शक्यच नव्हतं. पुन्हा तेच, आमच्या या न्यूटनरावांना लिहिता आलं असतं तर त्यांनी गॅलिलिलो साहेबांना न कळलेलं वा आकलन न झालेलं वेगळ वास्तव जगासमोर आणलं असतं. एवढं मात्र खरं की आकाशदर्शन मनासारखं झालं की न्यूटनरावांचा चेहरा उजळून जायचा. त्यावेळी तो एखादा तेज:पूंज शास्त्रज्ञच वाटायचा.

 अमावस्येच्या काळात आकाशात खूप तारे चमचम करत असत, तेव्हा न्यूटनरावांची समाधी लागायची. आई रागवेपर्यंत खिडकीतील आपली जागा ते सोडायचे नाहीत. एकदा त्यांनी एक तारा पडताना बघितला. न्यूटनराव झरदिशी खिडकीतून उतरले नि अंगणात धावले. आकाशातील झाडावरुन त्यांनी पहिल्यांदाच काहीतरी पडल्याचं बघितलं. पण अंगणात त्यांना काहीच दिसलं नाही. तेव्हा ते खिन्न झाले. त्यांचं ते खिन्नपण आम्हा सर्वांनाच जाणवलं. ते खूप अस्वस्थ झाले. सारखं घरात, अंगणात येरझाऱ्या घालू लागले. त्या दिवशी नेहमीच्या जेवण्याच्या वेळी त्यांनी त्यांच्या डिशकडे  बघितलं सुध्दा नाही. पुन्हा पुन्हा खिडकीत जाऊन आभाळाकडे बघू लागले. आईनं रागावलं तरी त्यांच्यावर आज काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी त्यादिवशी जेवणच केलं नाही.

आता काय करावं बरं. आईपुढे नवी समस्या निर्माण झाली. शेवटी बळजबरिनं आईने न्यूटनरावांना खिडकीतून उचलून आणले. नेहमीपेक्षा मोठा आवाज करुन त्यांना आपल्याजवळ बसायला सांगितलं. हातात तिने एक काठीही घेतली होती.

आईचं हे वेगळं रुप त्यांनी बघितलं नव्हतं. मुकाट्यानं न्यूटनराव आईजवळ बसले. आईनं त्यांची डिश समोर केली. आईच्या भीतिनं त्यांनी भोजन उरकवलं. ते भोजन करत असताना आई त्यांना झाडावरचं फळांचं खाली पडणं आणि आकाशातून एखादी वस्तू किंवा तारा पडणं याविषयी सांगत बसली. हे सारच काही न्यूटनराव गंभीरपणे ऐकत होते. आईनं सांगण्यात कंटाळा केला नाही. त्यांना काय कळतय यातलं असही तिला वाटलं नाही. कित्येक शास्त्रीय शब्द तिच्या सांगण्यात येत होते. काही इंग्रजी शब्द होते. पण हे सारं काही न्यूटनराव काळजीपूर्वक दोन्ही कान वर करुन लहान मुलाच्या उत्सुकेतनं ऐकत होते. ऐकता ऐकता त्यांना झोप लागली. तेव्हाच आईचं हे ज्ञानामृत पाजणं संपलं. या दिवशी आईनं न्यूटनरावांचं नामकरण केलं, गॅलिलोओ असं.

जेव्हा कधी कधी आईस वेळ मिळतो तेव्हा सकाळच्या न्यूटनला भौतिकशास्त्र आणि रात्रीच्या गॅलिओलला आई खगोलशास्त्र न कंटाळता सांगते. यासाठी तिने आता माझी जुनी पुस्तकं बाहेर काढली आहेत. मी जेव्हढे या दोन्ही विषयांबाबत वाचले नसेल तेव्हढे आईने वाचले आहे. जेव्हढे हे दोन्ही विषय माझ्या कानावरुन गेले नसेल तेव्हढे या आमच्या न्यूटनराव आणि गॅलिलिओच्या कानावरुन गेले आहे.

हा पठ्याही मोठ्या उत्सुकतेनं सारं काही ऐकत बसतो. आम्हा तिघांनाही आता असं वाटायला लागलंय की देवाघरी गेलेले ते दोन्ही थोर शास्त्रज्ञ आकाशातून या आमच्या घरच्या न्यूटनराव आणि गॅलिलिओकडे कौतुकानं बघत असतील.

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!