त्यात काय मोठसं?
त्यात
काय मोठसं?
तेजोमयीला
गेल्या काही दिवसांपासून पेपर वाचनाची चांगली सवय लागली होती. एखादे दिवशी तिने पेपर हाती घेतला नाही तर, अलेक्झांडर
(द डॉगी) तिला पेपर आणून देई.
तेजोमयी
पेपर वाचायला बसली की, अलेक्झांडर तिथेच बसून तेजोमयीस न्याहळत बसे. तेजोमयी, मनातल्या
मनात वाचायची. एके दिवशी तिला काय वाटलं कुणास ठाऊक, ती मोठ्याने पेपर वाचू लागली.
ते बघून बाजूलाच तिला न्याहळत बसलेल्या अलेक्झांडरने कान टवकारले नि आणखी काळजीपूर्वक
ऐकू लागला. संपली बातमी, असं तेजोमयीनं म्हंटल्यावर, बराय ठीक आहे, अशा आशयाची त्याने
मान डोलवली. याचा अर्थ अलेक्झांडरला बातमी ऐकायला आवडते, याची खात्री तेजोमयीस पटली.
नि मग ती पुढे काही बातम्या तरी जोरानेच वाचू लागली. त्यामुळे अलेक्झांडर स्वारी एकदम
खुष होऊन गेली.
दोघांचही
हे पेपर प्रेम आईबाबांच्या फार कौतुकाचं झालं . ज्याला त्याला या दोघांच्या या पेपर
प्रेमाबद्दल ते बोलून दाखवत.
आज
तेजोमयीने पेपर हाती घेतला नि एका बातमीच्या शीर्षकाने ती जरा दचकली. तिने ती बातमी
मनातल्या मनात एका दमात वाचून काढली. बातमी जोराने वाचली नाही म्हणून तिला ढुशी देऊन
अलेक्झांडरने नाराजी व्यक्त केली. पण तेजोमयीने तिकडे दुर्लक्ष केलं. तिच्या चेहरा
गंभीर झाला. ती शून्यात गेली. काहीच न बोलता तशीच बसून राहिली. अलेक्झांडरच्या ते लक्षात
आलं. तो आतल्या खोलित गेला नि त्याने आईस ओढत बाहेर आणून तेजोमयीसमोर उभं केलं.
शून्यात
गेलेली तेजोयमी बघून आईने तिला, काय झालं? म्हणून विचारलं.
तेजोयमीने
यावर काहीच उत्तर दिलं नाही. आजच्या पेपरमधील तिने वाचलेली बातमी आईला दाखवली.आईने
ती वाचून काढली.
त्यात
काय एव्हढं वाईट वाटून घेण्यासारखं ? असं आई
म्हणताच, तेजोमयी ताडकन उठली नि, मोठ्या स्वरात म्हणाली,असं कसं म्हणू शकतेस तू आई?
तिचा मोठा स्वर ऐकून बाबा दिवाणखान्यात आले. काय झालं? म्हणून त्यांनी हातवारे केले.
तेजोमयीने त्यांनाही ती बातमी दाखवली. त्यांनी ती वाचली. त्यावर त्यांची काहीच प्रतिक्रिया
उमटली नाही. उलट, आज नाश्ताचा काय मेनू, राणीसरकार असं तेजोमयीच्या आईकडे बघत ते म्हणाले.
बाबा
तुम्हीसुध्दा! तेजोमयी जोराने ओरडलीच.
अगं,
मीसुध्दा म्हणजे? मी काय केलं? बाबांनी आश्चर्यचकित होत विचारलं. तेजोमयीचं हे चाललय
तरी काय? हे न कळल्याने अलेक्झांडर,गोंधळून
आळीपाळीने तिघांकडेही बघू लागला.
अहो
बाबा, ही बातमी वाचून तुम्हास,काहीच वाटलं नाही का? आईलाही काही वाटलं नाही.
अगं
भवाने, बातमी सारखी बातमी. त्यात काय वाईटसाईट वाटून घ्यायचं. असं काही वाटायला लागलं
तर, आपलं जगणं अशक्य व्हायचं. आई तेजोमयीला म्हणाली नि स्वयंपाकखोलित निघून गेली.
चालायचच
गं...असं म्हणून तेजोमयीच्या डोक्यावर हात फिरवत बाबाही आत निघून गेले.
तेजोमयीच्या
डोळयात अश्रू तरळले. ही कां रडतेय हे न कळून अलेक्झांडर आणखीच गोंधळला. त्याने तिला
मिठी मारली आणि रडू नकोस गं, असं काहीसं त्याला म्हणावसं वाटलं. तेजोमयी खाली बसली.
तिने पेपर हाती घेतला,आणि ती बातमी अलेक्झांडरकडे बघत जोराने वाचू लागली...बातमित नमूद
होतं,मानसांच्या सततच्या वेगवेगळ्या हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षात पक्ष्यांच्या
प्रजातींमध्ये ६० टक्के घट झालीय. अनेक पक्षी नष्ट झाले. अनेक पक्षी नष्ट होण्याच्या
मार्गावर आहेत.
वाचता
वाचता तेजोमयी थांबली. पुन्हा तिच्या डोळयात अश्रू आले. आपल्यासारखेच जीव असणारे हे
पक्षी नष्ट होताहेत, त्याच्याबद्दल आपल्या आईबाबांना काहीच कसं वाटत नाही,हा प्रश्न
तिला पडला. प्रत्येक मुलाच्या आईबाबांनासुध्दा पक्ष्यांच्या या नष्ट होण्याबद्दल असंच
वाटत असणार का रे अलेक्झांडर? तिने रडवलेल्या चेहऱ्याने अलेक्झांडरला विचारलं.
काहीतरी
गंभीर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तेजोमयीच्या गालाजवळ आपलं तोंड नेऊन अलेक्झांडर
तिला स्वांतना देऊ लागला.
सुरेश
वांदिले

Comments
Post a Comment