शोधण्याचा आनंद


 शोधण्याचा आनंद

तेजोमयीच्या बाबांनी परवा "विश्वस्त", नावाचं पुस्तक आणलं. सहज म्हणून तिने वाचायला घेतलं. काही क्षणातच ती या पुस्तकात इतकी रमून गेली की तिच्याच्याने पुस्तक सोडवेना.
खवळलेल्या समुद्रात व्दारकानगरी बुडत असतानाच श्रीकृष्णाने व्दारकेतील अलोट संपत्ती सात जहाजांमध्ये वेगवेगळया दिशने पाठवली. त्यातील एक जहाज भारताकडे निघालं. ही संपत्ती कुठे ना कुठे खऱ्या वारसदाराकडे सुरक्षितपणे पोहचेल हा त्यामागचा हेतू.
ही संपत्ती घेऊन भारताकडे निघालेलं जहाज प्रचंड वादळात सापडतं. त्यात ते बुडतं. त्याचं पुढं काय होतं? कुणाच्या हाती ते लागतं? या जहाजातील संपत्ती कुठे जाते? याचा शोध घेण्यासाठी इतिहासात रस असणाऱ्या आणि रममाण होणाऱ्या पुण्यातील मुलांनी केलेल्या प्रयत्नांची रहस्यमय कथा या पुस्तकात आहे. या पुस्तकातील चित्तथरारक घटना, प्रसंग आणि रहस्याने तेजोमयीस खिळवून ठेवलं.
एखाद्या पुस्तकात इतका वेळ तेजोमयी डोके खुपसून बसल्याचं अलेक्झांडर(द डॉगी)ने कधी बघितलं नव्हतं. सगळया गोष्टींबद्दल त्याला फार उत्सुकता वाटत असे. त्यातून त्याचं निरक्षण सुरु असायचं.
या निरिक्षणातूनच त्याला कळलं होतं की, तेजोमयी इतका वेळ पुस्तकात रमणारी नाही. त्यामुळे कधी तेजोमयीकडे तर कधी पुस्तकात, त्याने सात-आठ वेळा डोकावून बघितलं, पण तेजोमयीने त्याच्याकडे अजिबातच लक्ष दिलं नाही. अखेर याचा नाद सोडला आणि तिला खेटून त्याने सोफ्यावरच ताणून दिली.
अगं, आज जेवायचं नाही का? अशी जेव्हा आईची हाक आली तेव्हा तेजोमयी भानावर आली.
काय गं, काय वाचतेस एवढं मन लावून आणि गुंग होऊन? बाबांनी विचारलं.त्यांचं लक्ष तेजोमयीच्या हातातील पुस्तकाकडे गेलं. तेव्हा त्यांच्या लक्षात सारं काही आलं.
आहे की नाही तुझ्या हॅरी पॉटरपेक्षाही रहस्यमय, चित्तथरारक आणि जागीच खिळवून ठेवणारं!बाबा म्हणाले.
अहो बाबा, अशी तुलना बिलना करु नका. हॅरी पॉटर त्याच्या जागी, हे पुस्तक त्याच्या जागी. तेजोमयी उर्त्स्फुतपणे बोलून गेली.
तेव्हा बाबांच्या लक्षात त्यांची चूक आली. जसं मुलां-मुलांमध्ये तुलना करायची नसते तशी पुस्तकांपुस्तकांमध्ये तुलना करणं अयोग्य असतं. आपली चूक लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांनी तेजोमयीला थँक्यू म्हंटलं.
०००
एकाग्रचित्तानं तेजोमयीचं हे पुस्तक वाचन सुरु असतानाच बाबांच्या लक्षात आलं की, वाचता वाचता तेजोमयी तिच्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसते. गुगलमध्ये जाऊन शोधाशोध करते. त्याची नोंद करते.
ही काय करत असेल, अधूनमधून लॅपटॉपमध्ये डोकावून? त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली. या उत्सुकतेपोटी न राहवून त्यांनी अखेर लॅपटॉपवर नजर टाकलीच.
तेजामयी वाचत असलेल्या या पुस्तकातील तिच्यासमोर असणाऱ्या पृष्ठावरील एका संदर्भाची माहिती ती गुगलवरुन शोधत होती.
अरे वा, हे भन्नाटच आहे की, बाबा म्हणाले..
बाबा, वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की हे पुस्तक काल्पनिक असलं तरी त्यातली ठिकाणं, व्यक्तीरेखा कधी प्रत्यक्षात तर कधी कथा काव्यांमध्ये अस्तित्वात होत्या. मला सहज वाटलं की त्यांच्याविषयी अधिकची माहिती मिळवून बघूया. म्हणून गुगलबाबांच्या सहाय्यानं त्यांच्याविषयी माहिती मिळवली. तेव्हा ती सुध्दा मजेदार आणि ज्ञानात भर टाकणारी वाटली.
अगं, पण असं वाचतावाचता मध्येच संदर्भाचा शोध घेतल्याने वाचनाची गंमत आणि गोडी कमी नाही का होत?
ते बरोबरय हो बाबा. पण कुछ पाने के लिय कुछ खोना पडता है ना. बाबांकडे बघत तेजोमयी म्हणाली
बघा बघा, लेक किती शहाणी आणि सुज्ञ झाली ते.नाही तर तुम्ही? आई या संभाषणात सहभागी होत म्हणाली.
अलेक्झू, बघ गड्या, तुझी आई मला शहाणा आणि सुज्ञ समजत नाही. बाबा, अलेक्झांडरकडे बघत गमतीने म्हणाले.
त्यानेही एकदा बाबांकडे आणि एकदा आईकडे बघत, हो का? असा भाव आणत मान आणि शेपूट हलवली..
त्यावर तिघेही मनमुराद हसले.
सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!