टिल्लू रागावला

 

टिल्लू रागावला

आई ग,दारात पाऊल ठेवताच टिल्लू ओरडला.

काय रे काय झालं?आइने विचारलं.

अगं मी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन येतो. टिल्लू म्हणाला.

एकटाच? असं काय अर्जंट काम आलय रे.आईनं विचारलं.

मी आल्यावर सांगेन.एव्हढं बोलून टिल्लू पळालासुध्दा. त्याने दफ्तर तसंच टाकलं.शाळेचा गणवेश सुध्दा बदलला नाही.टिल्लू वांद्रेच्या शासकीय वसाहतीत राहायचा.त्याच्या घरासमोरच हनुमानजींच मंदिर होतं.कधी कधी पप्पांसोबत तो मंदिरात जाई. पण असं स्वत:हून जायचं म्हंटल्यावर आईस आश्चर्य वाटलं.

टिल्लू काय करतो म्हणून आई दारातून बघू लागली.टिल्लू मंदिरात गेला,त्यावेळेस तिथे कुणीच नव्हतं. पुजारीही यायचा होता.टिल्लूने भक्तिभावाने हात जोडले.नंतर तो हनुमानजींना काहीतरी समजावून सांगण्यासाठी हातवारे करु लागला. आईला गंमत वाटली. पाच मिनिटांनी टिल्लू घरी परत आला.

काय मिस्टर टिल्लू, हनुमानजींशी एवढं काय महत्वाचं काम होतं?

त्याला विनंती करायला गेला होतो

कशाची रे?

रितेश सरंगीबद्दल.

कोण हा रितेश? तुझा मित्र आहे का?त्याच्याबद्दल काय सांगायचय तुला?

अगं मला कपडे तर काढू देशील ना. भूक पण लागलीय.माझं दूध तयार आहे ना.टिल्लू म्हणाला.

आईने त्याचं दूध तयार केलं.तोपर्यंत त्याने कपडे बदलले.हातपाय स्वच्छ धुतले.सोफ्यावर बसून दूध पिऊ लागला.दूध पिऊन झालवर आईने त्याला पुन्हा रितेश बद्दल विचारलं.

अगं आई हा रितेश हा आमच्या वर्गात नुकताच आला आहे.

मग?त्याच्यासाठी कां बरं प्रार्थना केला तू हनुमानजीकडे.

अगं हा रितेश गणितात जाम हुषार आहे.कोणतही गणित तो चटदिशी सोडवतो.बोटांच्याच साहाय्याने कितीही मोठ्या  आकड्यांचा गुणाकार भागाकार करु शकतो.
वा छान आहे की?ग्रेटच म्हणायचा हा रितेश.

अगं तो खरच ग्रेट आहे.पण या इतक्या हुशार मुलाच्या ह्रदयात एक छिद्र असल्याचं परवाच त्याला कळलं.त्याचे बाबा गरिब आहेत.त्यांच्याकडे रितेशच्या ऑपरेशनसाठी पैसे नाहीत.बिच्चारा! म्हणून मी हनुमानजींकडे गेला होतो, विनंती करायला.एकतर रितेशला बरं कर किंवा त्यांच्या बाबांना पैसे मिळवून दे.खरंतर, मी हनुमानजींना रागावलोच.त्यानेच रितेशला इतका बुध्दीमान केलाय नि त्यानेच त्याच्या ह्रदयात छिद्रही निर्माण केलं.असं कां करतात ही देव मंडळी?टिल्लू वैतागून म्हणाला.

बाळाच्या जन्माच्या वेळेस कधीकधी असे दोष राहून जातात.यात ना देवाचा काही दोष असतो ना त्या बाळाचा.पण आता तू रितेशचं जे काही सांगितलय ते ऐकून वाईट वाटलं मला.आई म्हणाली.

काय होणार गं आता त्याचं?

बाळ तू मनापासून हनुमानजींना सांगितलस ना, त्याला बरं कर म्हणून! आपण निर्मळ मनाने अशी प्रार्थना केली तर चमत्कार घडू शकतो.रितेशसुध्दा नक्कीच बरा होईल.

अगं,वर्गात जेव्हा आम्हाला रितेशच्या ह्रदयातील छिद्राबद्दल कळलं तेव्हाच आम्ही सर्वांनी देवाला साकडं घालायचं ठरवलं.

आम्ही म्हणजे?

माझे सारचे मित्र गं. आज घरी गेल्याबरोबर प्रत्येक जण त्याच्या घराजवळच्या  मंदिरात जाऊन, रितेशला बरं करण्याची विनंती देवाला करणार आहेत.टिल्लूने सांगितलं.आईला टिल्लूचं कौतुक आणि अभिमानही वाटला.कार्टूनच्या जगात रममाण होणारा टिल्लू आणि त्याच्या मित्रांना कधीकधी आपण वाया गेलेली मुलं म्हणतो.याचं आईला वाईट वाटलं.रितेशसाठी आपणही मनोभावे देवाजवळ प्रार्थना करायची आणि त्याच्या ऑपरेशनसाठी काही रक्कमही त्याच्या बाबांना द्यायची असं आईन मनात ठरवलं.

सुरेश वांदिले.


Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!