शेखचिल्लीची स्वप्नपूर्ती
शेखचिल्लीची स्वप्नपूर्ती
हे
ऐकून किंवा वाचून तुम्ही नक्कीच उडाल किंवा आँ तरी म्हणालच. त्याचं कारण आम्ही. तुम्हाला
ठाऊक नसेल म्हणून सांगतो की आमच्या प्रजातींची संख्या आहे चार लाख! तुमच्या आमच्या
किंवा आमच्या तुमच्या पृथ्वीचा ८० टक्के बायोमास किंवा जैविक भाग आमच्यामुळे बनलाय.
तुम्हाला फारसं न आवडणाऱ्या नि ज्यांच्यासाठी तुम्ही सतत नावबोटं ठेवत असता अशा
सूक्ष्म जीवाणू (बॅक्टेरिआ) यांचा वाटा
आहे १५ टक्क्यांचा आणि तुम्हा मानवांचा
वाटा आहे अवघा ०.०१ टक्के! निघाला ना तुमच्या तोंडून
भला मोठा आँ!
खरंतर
आम्ही या पृथ्वीचे अनभिषिक्त सम्राटच आहोत. हे आमचं साम्राज्य जवळपास ५०० मिलियन (लक्ष)
वर्षापासूनचं! आमच्यापुढे तुम्ही कुक्कुले बाळच. तुम्ही म्हणाल काहीतरी थापा
हाणतोस?
छे छे थापा कशाला? तुमचा जन्म झालाय ६ मिलियन
वर्षांपूर्वी म्हणजे आमच्यानंतर ४९६ मिलेनियम वर्षानंतर. याचं खरंखोट तुम्हाला
करुन घ्यायचच असेल तर गुगल महाराजांना विचारा की. ते तुम्हाला अमेरिकेतील नॅशनल
ॲकॅडेमी ऑफ सायंसचा रिपोर्ट म्हणजे त्यांचं संशोधनच तुमच्या पुढ्यात सादर करेल. हं,
पण ते तुम्ही वाचण्याचं कष्ट घेतलं पाहिजे. केवळ वरवर नजर टाकून व्हायचं नाही बरं
का?
आम्ही
या पृथ्वीचे अनभिषिक्त सम्राट आहोत. सम्राटाला आपल्या प्रजेच्या हिताची काळजी
घ्यावी लागते ना. तुम्ही आमचे प्रजानन. मग आम्ही ते काम सर्वात आवडीने, मन लावून
आणि कंटाळा न करतो. हे बघा तुम्हाला कंटाळ्याची जांभई आल्याचं आमच्या लक्षात आलय.
या
कंटाळ्या-बिंटाळयाला जरा बाजूला हटवा नि जरा लक्षात घ्या की ५०० मिलियन
वर्षापूर्वी आमचा म्हणजेच भूपृष्ठावरील वनस्पतींचा जन्म झाला. मग ३७० मिलियन वर्षांपूर्वी
वृक्षांचा जन्म झाला. आमची सतत वाढ होतच राहिली. तुम्ही म्हणाल यात काय मोठा
पराक्रम?
हेच तर तुमचं चुकतय. तुम्हाला तुमच्याशिवाय इतर सारेचजण बिनकामाचे
आणि तुच्छ वाटतात. अरे, आमची संख्या वेगाने वाढली नि त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणातील कार्बाल्म (कार्बन डॉयऑक्साइड) वायू मोकळा होऊ शकला. तेव्हा
पृथ्वी एक तत्प गोळा होता. पण आमच्या कामगिरीने ती वेगाने थंड होऊ लागली. आम्ही
अधिकाधिक प्राणवायू (ऑक्सिजन) सोडू
लागलो. त्यामुळे तुमच्यासारख्या सजिवांचं
पृथ्वीवरचं जीवन सुसह्य झालं. ही पृथ्वी सजिवांना राहण्यासाठीचं उत्तम
ठिकाण बनवण्याचं श्रेय असं आम्हाला जातं. या तथ्याकडे तुम्ही कितीही नाक मुरडलं
तरी, जो है सो है...ते कुणीही नाकारलं तर
सत्य मेव जयतेच असतं.नाही का?
तुम्हा
मानवांना आपल्या शास्त्रीय प्रयोगांचा भारी अभिमान! तसं त्यात काही
वावगं नाही म्हणा. पण तुमच्या आधीच आम्ही शास्त्राचं अस्त्र हस्तगत केलं. हे
अस्त्र म्हणजे फोटोसिनथेसीस (प्रकाशसंस्लेशन)! वनस्पतीशास्त्राचा
अभ्यास करताना तुमच्या सरांनी नक्कीच याबद्दल सांगितलं असणार! तर या शास्त्राचं अस्त्र आम्हाला गवसलं नि मग आम्ही जल,सूर्यप्रकाश आणि
कर्ब वायू यांच्यावर क्रिया प्रकिया करुन प्राणवायू आणि साखरेची निर्मिती करु
शकलो. याचा अर्थ आम्ही तुम्हाला अन्न आणि वायू या अत्यंत जीवनावश्यक बाबींची सर्वात
मोठी भेट दिली नि तुमचं आयुष्य सुकर आणि सुंदर सुध्दा केलं.
अहो,
आमचं हे साम्राज्यं तुम्हा मानवांना ८०
टक्के अन्न आणि ९८ टक्के प्राणवायू पुरवतो. ही आकडेवारी वाचून छाती दडपली ना
तुमची. पुन्हा एकदा तुमच्या मुखातून भला मोठा आँ निघाल्याचं आम्हास पक्कं ठाऊकाय.
पण आमच्या या सुंदर
गोष्टीच्या पाटीला आता तडे जाऊ लागले आहेत. तुमच्या जीवनाचा मुख्य आधार असूनही
तुम्ही आमच्या मुळावर उठला आहात. आम्ही जरी पृथ्वीवरचे अनभिषिक्त सम्राट असलो तरी
आम्ही तुमच्यातल्या चंगीझखान किंवा मग तो तुमचा अल्लाउद्दिन खिलजी किंवा
अलेक्झांडर द ग्रेट-ब्रिट सारखे आपल्याच
सगे सोयरे-मित्रमंडळी-शेजारी पाजारी यांना जिवनातूनच उठवणारे नाहीत की
कत्तल करणारे नाहीत. त्यामुळेच तुमच्याकडून
आमची प्रचंड कत्तल चाललीय, कधी रस्ते बांधणीच्या नावे तर कधी धरण
बांधण्याच्या नावे तर कधी कोणत्यातरी विकास कामाच्या नावे. त्यामुळे आमच्या चार
लाख प्रजांतीपैकी जवळपास ४० टक्के प्रजाती या नष्ट होण्याच्या पातळीपर्यंत कधीच्याच
पोहचल्या आहेत. यापैकी कित्येकांनी शेवटचा श्वासही घेतला असेल. वेगवेगळ्या विषारी
वायुंचं इतकं मोठं उत्सर्जन पृथ्वीच्या वातावरणात तुम्ही केलय की त्यामुळे हवामान
बदलाचा नवाच भस्मासूर उभा ठाकलाय. तो तुम्हाला दिसूनही तुम्ही तिकडे दुर्लक्ष करता
किंवा कधीकधी खूप काळजी वाटतं असं फक्त दाखवता. आता हे दाखवणं तुमच्याही मुळावर
उठलच ना. पण त्यामुळे आम्हाला कधी प्रचंड
मोठ्या महापुरांना तोंड द्यावे लागते. थोडी शांतता मिळते न मिळते तोच आम्ही भयावह
आगीच्या लपेटात सापडतो. कधी दुष्काळच दुष्काळ पडतो नि आम्ही पाण्याविना तडतफडत
तडफडत शेवटचे आचके घेतो. साथीच्या रोगाला बळी पडतो. तुम्ही इतके हुषार की
याचा अभ्यासबिभ्यास करता नि मग ओरडून सांगता की दरवर्षी ४० टक्के अन्नधान्य या
कारणांमुळे नष्ट होतं. म्हणजे मग याचा परिणाम लाखो लोकांना उपाशी राहावं लागतं. हजारो
लोक देशोधडीला लागतात नि शेकडो लोक प्राणास मुकतात. तुमचं असं, चित भी मेरी पट भी
मेरी असतं. हे तुम्हाला भूषणावह वाटतं. वाटू द्या. आम्ही काय बापूडे! आम्हाला असले छक्के-पंजे ठाऊक नाही. आम्ही जगतो आणि तुम्हालाही जगवतो. जीवो
जिवस्य जीवनम, का काय तरी नाही का तुम्हीच शोधून काढलेलं सुभाषित, त्याचे खरेखुरे
वाहक आम्हीच.
तुमच्याकडे म्हणे कोणे एकेकाळी
शेखचिल्ली नावाचा तुमच्या मते मूर्ख व्यक्ती होऊन गेला. तो ज्या झाडावरच्या
फांदीवर बसायचा तीच फांदी तोडण्याची त्याला उर्मी होत असे, असं आमच्या कानावर आलं
होतं. सध्या तुमच्या वागणुकीने, तुम्ही त्या तुमच्या शेखचिल्ली भावाच्या
स्वप्नपूर्तीसाठी झटून कामाला लागल्याचं दिसतय आम्हाला. सगळा आनंदच म्हणायचा!
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment