बगळ्याचे रहस्य?


 

बगळ्याचे रहस्य?

एका तलावाच्या काठी असलेल्या झाडाच्या आडोशाला अनेक पक्षी येत.दिवसभर त्यांची दंगामस्ती चाले.इकडून तिकडे उड्या मारायला या पक्षांना खूप आवडायचं. एकही पक्षी फार काळ एखाद्या ठिकाणी स्वस्थ बसत नसे.एका फांदीवरुन दुसऱ्या आणि दुसरीवरुन तिसऱ्या आणि मग लगेच पंख फैलावून आकाशात सूर मारणार!सभोवताली चक्कर मारली की पुन्हा झाडांच्या फांद्यावर येऊन बसणार.पुन्हा काही वेळाने हाच खेळ नव्याने सुरु.

अशा या तलावाच्या ठिकाणी काही बगळेही येत.ते उडत उडत येत  आणि तलावातली बसण्यासारखी एखादी जागा ते बघत. त्यावर तासनतास बसून राहत. क्वचितच ते या जागेवरुन त्या जागेवर जात किंवा काही अंतर उडून पुन्हा येऊन बसत.

इतर पक्षांसारखं मात्र सारखं उडणे -बसणे - पुन्हा उडणे असे काही ते करत नसत.

इतर पक्षांना याचं फार आश्चर्य वाटायचं.

एकदा पक्षांची सभा भरली .त्यात कावळा,पोपट,चिमणी,टिटवी,कोकीळ,कोकिळा,कबुतर,निळकंठ इत्यादी पक्षी होते.ते सर्वजण तलावतील एका जागेवर बसनाऱ्या बगळयाबद्दल चर्चा करु लागले.

हा बगळा असा तासनतास एकाच ठिकाणी कसा काय बसू शकतो रे? पोपट कावळ्यास म्हणाला.

अरे, पण कुणी काय करावं,हे आपण कसं काय ठरवू शकतो? चिमणी पोपटाकडे बघत म्हणाली.

ते खरं असलं तरी,एकाच ठिकाणी असं बसून राहणं हे जरा मला संशयास्पद वाटतं.पोपट पुन्हा म्हणाला.

म्हणजे काय?कबुतराने डोळे गरगर फिरवत विचारलं.

हा कुणीतरी रुप बदलवून आलेला राक्षस असला पाहिजे.

आँ!

हाँ! असा एका जागी बसून तो आपलं निरीक्षण करत असून,एके दिवशी त्याच्या मूळ रुपात येऊन आपणा सर्वांना खाऊन टाकेल,अशी मला भीती वाटते.पोपट म्हणाला.

पोपटाच्या या बोलण्यावर सर्व पक्ष्यांना खूप भीती वाटली.काही पक्षी या भीतिने फांद्‌यावरुन खाली पडले.खाली एक मांजर झोपली होती.तिच्या अंगावर पक्षी पडल्याने ती खडबडून जागी झाली.तिला पक्षाचा राग आला.तिने त्याला पकडण्यासाठी त्याच्यावर उडी घेतली.ती पक्षावर उडी घेणार हे लक्षात येताच घार झर्रदिशी खाली आली आणि तिने मांजरीची शेपटी चोचीत पकडून तिला झाडीत सोडून दिलं.आता तर पक्षी फारच घाबरले.मांजरसुध्दा बगळ्यारुपी राक्षसास मिळाली असल्याचा संशय कबुतराने बोलून दाखवला.सर्वांचे अंग शहारले.काहींनी पंख फडफडवून आपली भीती कमी करण्याचा प्रयत्न केला.

पण असं फांद्यांवर पाय ठेऊन किती दिवस भीत भीत काढणार?चिमणी म्हणाली.

आपणास काहीतरी उपाय शोधावाच लागेल? निळकंठ म्हणाला.

अरे,आपण त्या अजस्त्र राक्षसाच्या तावडीतून कसं वाचणार?कावळ्याने प्रश्न विचारला.

मला एक कल्पना सुचलीय?कोतवाल म्हणाला.

सांग बघू, सांग बघू...सगळे पक्षी त्याच्याकडे बघत म्हणाले.

मित्रांनो,या बगळ्याचं राक्षसात जेव्हा रुपांतर व्हायचं असेल तेव्हा होईल.सध्या तर तो आपल्याएवढ्याच आहे ना.

हो मग..

आता आपण सर्व मिळून त्याच्यावर हल्ला करु नि त्याला पाण्यात ढकलून देऊ.

अरे, पण हे काही बरोबर नाही.त्याने आपल्याला अजून त्रास दिला नाही.मग त्याला कां शिक्षा द्यायची? कावळ्याने विचारले.

पण तो तर राक्षस आहे ना.

ही आपली कल्पना झाली.या कल्पनेतल्या राक्षसाला‍ भिऊन आपण आगावूपणा करायला गेलो तर बगळा हकनाक मारला जायचा.असं कुणाचा बळी घेणं हे आपल्या पक्षांच्या नियमात बसत नाही.कोकीळ समजुतीच्या भाषेत बोलला.

अरे,नियमबियम नंतर. आपला जीव आधी वाचला पाहिजे.पोपट ठासून म्हणाला.त्याचे म्हणणे काही जणांना पटले.

कोकिळेच्या समजावण्याकडे लक्ष न देता पाचसहा पक्षी, डोळे मिटून ओंडक्यावर बसलेल्या बगळ्यावर तुटून पडले.अचानक झालेल्या या हल्ल्याने बगळा घाबरला.ओंडक्यावरचं त्याचं संतुलन बिघडलं.तो पाण्यात पडला.त्याच वेळी पाण्यातून जात असलेल्या एका पाणसर्पाचे लक्ष बगळयाकडे गेलं.चांगलीच मेजवाणी मिळाली म्हणून तो आनंदला.त्याने आपल्या शेपटीने बगळ्याला गुंडाळायला सुरुवात केली.बगळा भीतिने गुदमरुन गेला.वाचवा वाचवा, मला वाचवा, अशी आरडा ओरड करु लागला. इतर पक्षी घाबरले. बगळा जर राक्षस असता तर त्याच्यावर अशी परिस्थिती उदभवली नसती,हे इतर पक्षी आणि त्यातही घारीच्या पटकन लक्षात आले.ती आकाशात उंच उडाली आणि प्रचंड वेगाने खाली येऊन तिने पाण सापाचे तोंड चोचित पकडले.त्याला श्वास घेणं अशक्य झाले.त्यामुळे त्याच्या शेपटीची बगळयावरची पकड ढिली झाली.बगळा त्याच्या तावडीतून कसाबसा निसटला.पाण्यातून जात असलेल्या बदकाचे त्याच्याकडे लक्ष गेले.पटदिशी माझ्या पाठीवर चढ, असे तिने सांगितले.बगळा कसाबसा तिच्या पाठीवर चढला.बदकाने बगळ्याला किनाऱ्यावर आणून सोडले.घारीने सापाला उचलले नि त्याला भिरकावून दिले.रस्त्यावरुन जात असलेल्या गजराजाच्या पायाखाली साप आला.त्याचे धड त्या पायाखाली चेंदले गेले.

इकडे सर्व पक्षी बगळ्याजवळ जमा झाले.बगळा बेशूध्द पडला होता.कोतवालाने एक औषधी वनस्पती शोधून आणली आणि त्याने बगळयाच्या नाकाशी धरली.कबुतराने त्याच्या चोचित पाणी टाकले.चिमणीने खायचे दाने टाकले.काही पक्षी पंख फडकावून त्याला हवा घालू लागले.थोड्या वेळाने बगळा शुध्दीवर आला.आपले प्राण वाचवल्याबद्दल त्याने सर्व पक्षांचे आभार माणले.

पक्षांच्या माना खाली गेल्या.

अरे तुम्हाला काय झालं?

बगळेदादा,अरे आम्ही आभाराच्या पात्रतेचे नाहीत.आमच्यामुळे तुझ्यावर हे संकट कोसळले.चिमणी म्हणाली.

ते कसं काय?

अरे,तू तासनतास असा डोळे मिटून एका ठिकाणी बसतोसच कसा?याचं आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटत होतं.तू बगळ्याच्या रुपातला एखादा राक्षस असून आमच्यावर हल्ला करशील अशी भीती वाटल्याने, आम्हीच तुझ्यावर हल्ला केला नि नंतर हे सगळं रामायण घडलं.

बगळा कसाबसा हसला.

मित्रांनो, अशा काल्पनिक भीतिला मनात येऊ देऊ नका.त्यामुळे किती घोटाळा होऊ शकतो.नुकसान होऊ शकतो,हे तुमच्या आता लक्षात आलय ना.

हो हो हो पक्षी म्हणाले. राक्षसाची कल्पना सर्वात आधी सूचलेल्या पोपटाकडे सगळे पक्षी बघू लागले.तो तिथून कधीचाच पळाला होता.यापुढे अशा बोलक्या पोपटांपासूनही सावध राहायला हवं हा धडा सर्व पक्षांना मिळाला होता.

सुरेश वांदिले

 

 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!