दर्जेदार शिक्षणाची हमी

 

     दर्जेदार शिक्षणाची हमी

ग्रामीण आणि शहरी भागातील प्रज्ञावंत मुलांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाच्या संधी सुलभतेने व जवळपास नि:शुल्क उपलब्ध होण्यासाठी जवाहार नवोदय विद्यालयाची स्थापना केंद्र सरकारने केली आहे. सहअस्तित्वाची जाणीव करुन देणारी शिक्षणप्रणाली नयोदय विद्यालयांचे प्रमुख वैशिष्ट्य ! प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय आहे. मुला - मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था केलेली असते. संपूर्ण शिक्षण, निवास आणि भोजन नि:शुल्क आहे. गणवेश, पाठ्यपुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य (पेन, पेन्सिल, खोडरबर, नोटबूक, शाळेची बॅग, स्केल पट्टी) दैनंदिन गरजेच्या वस्तू (आंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण, दंतमंजन/ पेस्ट, ब्रश, केसाला लावण्याचे तेल, कपड्यांची इस्त्री, कपड्यांची स्वच्छता, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स) यांचा खर्च संस्थेमार्फतच दिला जातो. इतर सुविधांमध्ये रेल्वेच्या तिसऱ्या श्रेणीतील वातानुकूलीन प्रवास भाडे /एसी बस मधून प्रवास, वैद्यकीय सुविधा यांचा समावेश आहे. सीबीएसईचे (केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ), शुल्क संस्थेमार्फतच भरले जाते. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांकडून नवोदय विद्यालय विकास निधीसाठी ९ वी आणि १० वी मध्ये दरमहा ६०० रुपये शुल्क आकारले जाते. मात्र मुली, अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थी आणि दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांकडून हे शुल्क आकारले जात नाही.

क्रीडा विकासावर भर दिला जातो. सांस्कृतिक देवाणघेवाण अंतर्गत ९ व्या वर्गात, एका वर्षासाठी ३० टक्के विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यातील शाळांमध्ये पाठवले जाते. एनसीसी, स्काऊट आणि गाईड, एनएसएस (नॅशनल सर्व्हिस स्किम-राष्ट्रीय सेवा योजना) या उपक्रमांवर विशेष भर दिला जातो.

गेल्या वर्षीची काही वैशिष्ट्ये

() आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉईंट एन्ट्रस एक्झामिनेशन (जेईई) २०२२ मध्ये नवोदय विद्यालयांमधील ७५८५ विद्यार्थ्यांपैकी ५६.६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ३३.७ टक्के विद्यार्थी जेईई ॲडव्हास्नड परीक्षेत उत्तीर्ण झाले.

() वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) २०२२ मध्ये नवोदय विद्यालयांमधील २४८०७ विद्यार्थ्यांपैकी ७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

() दहावीचा निकाल ९९.१४ तर बारावीचा निकाल ९७.५१ टक्के लागला.

प्रवेश प्रकिया

() विद्यार्थी संबंधित जिल्ह्याचा रहिवाशी आणि त्याच जिल्ह्यातील शासकीय किंवा शासनमान्य शिक्षण संस्थेत/शाळेत ५ व्या वर्गात शिकणारा असावा. या विद्यार्थ्याने पहिली ते चौथी पर्यंतचा अभ्यासक्रम हा शासकीय किंवा शासनमान्य शिक्षण संस्थेतूनच केलेला असावा. त्याचे वय १० ते १२ वर्षे या दरम्याने असावे. (ही अट राखीव संवर्गाना सुध्दा लागू आहे.) यंदाच्या प्रवेशासाठी त्याचा जन्म  १ मे २०१२ ते ३१ जुलै २०१४ या दोन तारखांमध्ये व्हायला हवा. यामध्ये या दोन्ही तारखांचा समावेश आहे.

() या विद्यालयातील ७५ टक्के जागा या संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात. उर्वरित २५ टक्के जागा गुणवत्तेनुसार संबंधित जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून राखीव जागांच्या नियमानुसार भरल्या जातात.

() ग्रामीण भागाच्या संवर्गातून विद्यार्थ्याची निवड होण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने  तिसरी, चौथी आणि पाचव्या वर्गाचे संपूर्ण शिक्षण शासन अथवा शासन अनुदानित किंवा शासन मान्य शाळेमधून पूर्ण केलेले असावे. संबंधित विद्यार्थ्याने नवोदय विद्यालय असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पाचव्या वर्गाचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.  

() एक तृतीयांश जागा या मुलींसाठी राखीव ठेवल्या जातात.

() शहरी भागाच्या कोट्यामधून अर्ज भरु इच्छिणारा विद्यार्थ्याने तिसरी, चौथी आणि पाचवी मध्ये किमान एक दिवस तरी या भागातील शाळेतून अभ्यास केलेला असावा.

() अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नॉनक्रिमीलेअर इतर मागास वर्ग आणि दिव्यांगासाठी शासनाच्या नियमानुसार जागा राखीव असतात.

() या संस्थेतील प्रवेशासाठी, जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट (जेएनव्हीएसटी), केंद्रिय माध्यमिक शिक्षण (सीबीएसई) मंडळामार्फत घेतली जाते. ग्रामीण भागातील प्रज्ञावंत मुलांना ही परीक्षा सुलभतेने देता यावी या अनुषंगाने या परीक्षेची संरचना केली जाते. (ही परीक्षा कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांदा देता येत नाही.) महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी, उर्दू, तेलगू, गुजराती आणि बेंगाली भाषेत देता येते. या परीक्षेव्दारे देशभरातून २ लाख ९३ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० ऑगस्ट २०२३

संपर्क-www.navodaya.gov.in

०००

बीएस्सी एव्हिएशन

पवन हंस लिमिटेड ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक महत्वाची संस्था आहे. या संस्थेने पवन हंस हेलिकॉप्टर ट्रेनिंग इंस्टिट्यूटची स्थापना केली असून त्यामार्फत एअर क्राफ्ट मेंटनन्स इंजिनीअरिंग कोर्स आणि बी.एस्स-ॲरोनॉटिक्स हा संयुक्त अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी ३ वर्षाचा आहे.

एअर क्राफ्ट मेंटनंन्स इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमला भारत सरकारने मान्यता प्रदान केली आहे. बीएस्सी एव्हिशन हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहे. १२ वी विद्यान शाखेत भौतिकशास्त्र, गणित  आणि रसायनशास्त्र आणि इंग्रजी या विषयात सरासरीने ४५ टक्के गुण मिळवणारे खुल्या संवर्गातील विद्यार्थी अर्ज करु शकतात. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सुट किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, एरोनॉटिकल या विषयात पदविका धारकही या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करु शकतात.

संपर्क- ट्रेनिंग मॅनेजर ऑफिस, पीएचटीआय, पवन हंस हेलिकॉप्टर ट्रेनिंग इंस्टिट्यूट ,जुहू एअरपोर्ट, एस.वी.रोड, विले पार्ले पश्चिम, मुंबई, ईमेल- phti@pawanhans.co.in, दूरध्वनी-०२२-२६२६१७५३, संकेतस्थळ- www.pawanhans.co.in.

मुला-मुलींसाठी स्वतंत्ररित्या वसतिगृहाची व्यवस्था केली जाते. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२३ ही आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर उमेदवारांना () इन फ्लाईट सर्व्हिस, () ग्राऊंड सपोर्ट, () ग्राऊंड हँडलिंग, () लॉजिस्टिक्स ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, () मेंटेनंस कंट्रेाल सेंटर, () कंटिन्युईंग एअरवर्थनेस मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन, () क्वालिटी मॅनेजमेंट, () टेक्निकल ऑफिसर अशा सारख्या पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते.

०००

डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महापालिका नेत्र रुग्णालय, स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री येथे डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री हा दाने वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालविला जातो. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बृहनमुंबई महानगरपालिका/महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ - नाशिक यांच्यामार्फत प्रमाणपत्र प्रदान केले जाते. डोळ्यांच्या डॉक्टरांचे साहाय्यक म्हणून रोजगाराची संधी मिळू शकते.सध्या मोठमोठ्या कंपन्यांचे चष्म्यांची दुकानं निघाली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अशा पदविकाधारकांना संधी दिली जाते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑगस्ट २०२३ आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची १२ वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यानुसार प्रवेश दिला जातो. ही १४ ऑगस्ट रोजी प्रकाशित केली जाईल.

संपर्क- स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री, मुरली देवरा महापालिका नेत्र रुग्णालय, मौलाना शौकत अली रोड, दुर्गादेवी उद्यानासमोर, मुंबई-४००००८

०००

बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स ॲण्ड ऑर्थोटिक्स

अखिल भारतीय भौतिकोपचार आणि पुनवर्सन संस्थेत, १२ वीनंतरचा साडे चार वर्षे कालावधीचा बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स ॲण्ड ऑर्थोटिक्स हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाला "नीट" परीक्षेतील गुणांवर आधारित केला जातो. दिव्यांगाच्या पूनर्वसन कार्यात करिअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना हा अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देऊ शकतो.

संपर्क- हाजी अली पार्क, के. खाडये मार्ग, महालक्ष्मी, मुंबई- ४०००३४, संकेतस्थळ- www.aiipmr.gov.in] अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट आहे.

सुरेश वांदिले


Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!