"सूपरहिरो"
"सूपरहिरो"
हॅलो,हाय,नमस्कार,रामराम
वगैरे वगैरे,मी अमूक-ढमूक-तमूक अशी आपण एकमेकांना ओळख करुन देतो ना! म्हंटलं मी सुध्दा
स्वत:ची ओळख करुन देण्यापूर्वी असं अभिवादन केललं बरं.याचा अर्थ मी किती सुसंस्कृत
आहे,हे तुमच्या लक्षात आलच असणार.
तर मी कोण? हे तुम्हाला सांगण्यापूर्वी,माझी एक गंमत गोष्ट
सांगतो.तर त्याचं असं झालं की,इस्त्रायल नावाचा जो देश आहे ना,त्यांनी काही वर्षापूर्वी
त्याचं बेरशीट नावाचं अवकाशयान चंद्रावर स्वारी करण्यासाठी पाठवलं.त्यात आम्हीसुध्दा
होतो. चंद्र जवळ आला. काही क्षणातच हे यान चंद्रावर उतरलं नि,त्याचा स्फोट झाला नि
मग पुढचं सारं फुस्स झालं.तुमच्या मनात प्रश्र निर्माण झाला असेल की आमचं काय झालं?आमचं
नक्कीच काहीतरी झालं,हे सांगणे न लगे.तुम्हाला असं अद्यापही वाटतं की आम्ही मात्र जिवंतच
आहोत.
आता हे असं तुम्हाला कां वाटतं?याचं उत्तर माझ्या गोष्टीच्या
पुढच्या भागात तुम्हाला मिळेल.तुम्ही मानव आम्हापेक्षा डोक्यानं म्हणजेच बुध्दीने लाखोपट
समोर ना.त्यामुळे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा दिसलो,तेव्हा ते म्हणजेच तुमच्यातले काही जण आमचाच अभ्यास एके
अभ्यास रात्रंदिवस करत बसले.आम्ही हिमालयातही तुम्हाला आढळलो ,खोल समुद्रात सल्फरयुक्त
गरम पाण्यातही आढळलो,विषुववृत्ताच्या अतिउष्ण ठिकाणी आम्ही मजा मजा करत असल्याचं तुमच्या
लक्षात आलं तर तिकडे ध्रुव प्रदेशातील मी म्हणणाऱ्या थंडितही आमची मजा जोरात चालली
होती.
आँ!ही तर जादू की भुताटकी.कारण अशा दोन टोकाच्या वातावरणात
एकच प्राणी राहणं अशक्यकोटीतलं.पण आम्हाला हे शक्य असल्याचं तुम्हाला अभ्यासात दिसलं
आणि, बंदे मे कुछ नही तो बहुत कुछ दम है,असं तुमच्या लक्षात आलं.मग काय, तुमचा अभ्यास
आणखी जोरात सुरु झाला.मग या शोधकार्यामुळे आम्ही मग तुम्हाला वाळंवटात दिसलो,दलदलित
साापडलो,तलावात आढळलो,नदित-डोंगर द-यात-दगडधोंडे इथेही आमचा मुक्काम होताच.सर्वात कमी
तापमान म्हणजे ॲबसोल्यूट झिरो किंवा उणे २८ सेल्सियस नि दीडशे अंश सेलियस जवळ आम्ही
आरामात राहू शकतो हे तुमच्या लक्षात आलं.
मग, तुम्ही हे खरं की खोटं हे बघण्यासाठी आमच्यावर प्रयोग
केले.खरं तर ते अमानवीच म्हणायचे.पण असे प्रयोग करताना तुम्हाला तसं काही वाटत नाही.तर,
मुद्दा असा की तुम्ही आम्हाला प्रखर किरणोत्सरात ठेवलं.आठवा बघू जपानमधील हिरोशिमा
नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकल्यावर त्यातून निघालेल्या किरणोत्सारामुळे किती हाहाकार
माजला होता ते! इतक्या वर्षात त्याचा खुणा अजूनही मिटल्या नाही.इतकी त्या किरणात्साराची
भयावहता असते. तर अशा या किरणोत्सराच्या तोंडी आम्हाला दिलं गेलं.तुम्ही श्वास रोखून
बघू लागलात.काय होणार आमचं? जे काही दिसलं ते बघून तुम्हाला धक्काच बसला. कारण आम्हाला
काही म्हणून काहीसुध्दा झालं नाही.मग आमच्यावर वातावरणीय दाबाच्या दोन हजार पट इतका
प्रचंड दाब टाकला गेला.अवकाशाच्या निर्वात पोकळीत ठेवलं गेलं. या सगळया ठिकाणी आम्ही जैसे थे! पुन्हा, जादू की करणी असं तुम्हास
वाटलं नाही हे आमचं सुदैव!
आता तुमच्या लक्षात आलं की हे प्रकरण खूपच वेगळंआहे. अवकाशात
प्रारणांचा मोठ्या प्रमाणावार मारा होतोा.पाच ते दहा ग्रे प्रारणाला तुमचा मृत्यू होऊ
शकतो. पण आम्ही ५ हजार ग्रे पावरणाचा मारा
सहज सहन करु शकतो.जगबुडी झाली.हे जग नष्ट झालं तरी आम्ही मात्र टिकून राहणार, हे आता तुमच्या लक्षात
आलय.
आम्ही असे कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत टिकून राहू शकतो,कारण
आमच्याकडे एक अफलातून शक्ती आहे.जेव्हा आमच्या लक्षात येतं की कुछ तो गडबड है,तेव्हा
आम्ही आमच्या शरीरातल्या क्रियांचा वेग कमी करुन टाकतो.एक शतांश टक्के कमी इतका कमी
वेग असतो,तेव्हा. शरीरातलं पाणी एक टक्क्यावर आणतो.त्यामुळे आम्ही एकदम कोरडे होतो.मग
आमच्या इवल्याशा देहाची होते मुटकुळी.त्यावर चढतं काचेचं आवरण.हे सगळं घडत असताना आमच्या
शरीरातल्या पेशिंमधील प्रथिनं आडव्या तिडव्या-वाकड्या तिकड्या तंतूच्या स्वरुपात बदलतात.त्यातून
या तंतूचं जाळीसारखं कवच तयार होतं नि हे कवच पेशिंभोवती ढालीसारख म्हणजेच कवच म्हणून
उभं राहतं.
त्यांचं एक जनूक एक खास प्रथिनाची निर्मिती करतं.ते त्यांच्या
डीएनएला चिटकतं.ते त्यांना तुटू देत नाही की नष्ट होऊ देत नाही.
ही मांत्रिक नव्हे तर तांत्रिक करामत आमचं शरीर करतं.हे तुम्हाला
कळताच तुम्ही काय केलं माहिताय का? तर तुम्ही ते खास प्रथिनयुक्त जनुक आमच्या शरीरातून
काढलं,नि मानवी म्हणजे तुमच्या पेशित घातलं.मग तुम्ही तुमच्यावरच प्रयोग केला,त्यात
असं दिसलं की घातक रसायनं आणि एक्सरेच्या माऱ्यामध्ये त्या पेशी टिकून राहिल्या.तंबाखूच्या
रोपातही हे जनुक घालून त्यावर घातक रसायनाचा मारा केला.इथे तर गंमतच झाली.तंबाखूच्या
रोपांना काहीच झालं नाही,उलट ते आणखी वेगाने वाढले.या प्रयोगातून तुम्हाला आनंदाच्या
उकळ्या फुटू लागल्या. कारण तुम्हाला आता मानसावरच आमच्या शरीरासारखी गोठवणारी प्रक्रिया
साध्य करता येईल,असं वाटू लागलेय.
यामुळे तुम्ही स्वत:ला गोठवून घ्याल नि खूप लांब अंतरावरच्या
म्हणजेच मंगळासारख्या ग्रहावर जाण्यासाठी लागणारा दीर्घ प्रवास सहज शक्य करु शकाल.
चांगलच आहे हे.उत्तम सुध्दा आहे.पण हे साध्य करण्यासाठी प्रयोगाच्या
नावाखाली आमचा कमित कमी नाश म्हणजे वापर करा,एव्हढीच नम्र विनंती आहे.
ओह मॉयगॉड,ओह माय गॉड....इतकं मोठं पुराण मी सांगितलं पण
माझी ओळखच नाही करुन दिली ना...सॉरी हं.
अहो मी आहे टार्डिग्रेड . आम्ही अस्वलासारखं दिसतो असं तुमच्यापैकी
कुणाला तरी वाटलं म्हणून त्यांनी आमचं नामकरण समुद्री अस्वल असं केलं.जगामध्ये आमच्या
१२शे प्रजाती आहे राव. आम्हाला आठ पाय असतात.आम्ही लाखो वर्षापासून या पृथ्वीचे रहिवासी
आहोत.पण तुमच्या नजरेस आम्ही १७७३ साली पाहिल्यांदा पडलो.आम्ही कित्येक वर्षे अन्न
आणि पाण्याविना जिवंत राहू शकतो.
आमच्याकडे असलेली अदभूत शक्ती तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही
आम्हास चंद्रावर पाठवलं.२००७ साली युरोपिअन स्पेस एजन्सीने ३००० टार्डिग्रेड्सना फोटॉन
या लहानशा अवकाशात कुपितून अवकाशात धाडलं. या फोटोनने १२ दिवस पृथ्वी प्रदिक्षणा केली
नि ते पृथ्वीवर परतले.३ हजार पैकी २ हजार माझे बांधव ठणठणित जिवंत असल्याचं तुम्हाला
दिसलं.तुमच्यासाठी आम्ही सुपरहिरोच ठरलो.२०२१ मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ५
हजार माझे बांधव पाठवण्यात आले आहे.त्यांच्यावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि अवकाशातील
कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीचा अभ्यास केला जात आहे.
अर्थातच हे आमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठीच बरं का?दुसऱ्यांसाठी
आपण उपयोगी पडू शकतो,याचा आम्हाला आनंदच आहे.पण कधीतरी असा आनंद तुम्ही मानवांनीसुध्दा
घ्यायला काही हरकत नाही.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment