गुरुकूल

 

गुरुकूल



भारत सरकारच्या नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग (एनसीइआरटी)या संस्थेने अजमेर, भोपाळ, म्हैसुरु, शिलाँग, भूवनेश्वर या पाच ठिकाणी अध्यापन क्षेत्रातच करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी दर्जेदार क्षेत्रीय शिक्षण संस्था सुरु केल्या आहेत.

या संस्थांमध्ये अध्यापन कौशल्य निर्मितीसाठी उपुयक्त असणारा अभ्यासक्रम अनुभवी शिक्षणतज्ज्ञांकडून शिकवला जातो. अध्यापन क्षेत्रातील संशोधन आणि विकासकार्यास या संस्थांमध्ये प्राधान्य दिले जाते. या संस्थांमधील विद्यार्थ्यांना शासकीय व नामवंत खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये प्राधान्याने नोकरीची संधी मिळते.

या संस्थांमध्ये संबंधित क्षेत्रात येणाऱ्या राज्यातीलच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र म्हैसुरु  आणि भोपाळ येथील संस्थांमधील काही अभ्यासक्रम यासाठी अपवाद आहेत. या अभ्यासक्रमांना कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.

 

विभागीय शिक्षण संस्था, म्हैसुरू-

या संस्थेत इंटिग्रेटेड (एम.एस्सी)मास्टर ऑफ सायंस-बी.एड(बॅचलर ऑफ एज्युकेशन) इन गणित, एम.एस्सी इन रसायनशास्त्र, एम.एस्सी इन भौतिकशास्त्र हे सहा वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम शिकता येतात. हे अभ्यासक्रम सत्र पध्दतीने म्हणजेच वर्षाला दोन सत्रे असे शिकवले जातात.

म्हैसुरु विदयापीठाच्या बी.एस्सी( भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित) आणि एम.एस्सी – गणित, या विषयाच्या अभ्यासक्रमांचे घटक संयुक्तरीत्या एम.एस्सी- एड, या इंटिग्रेट अभ्यासक्रमात सामील करण्यात आले आहेत. याच विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ एज्युकेशन या अभ्यासक्रमात उच्च माध्यमिक अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या विषय घटकांचा अंतर्भाव एम.एस्सी-एड, या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. ही पदवी म्हैसुरु विद्यापीठाच्या एम.एस्सी आणि बी.एड या पदवी अभ्यासक्रमांच्या समकक्ष आहे. ही पदवी घेतल्यावर विद्यार्थ्यांना संबंधित विषयात पीएचडीसाठी नोंदणी करता येते.

अर्हता- १२ वी विज्ञान शाखेची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषय गटासह ४५ टक्के सरासरीने उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.(अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सुट).

निवड प्रकिया-

१२ वीमध्ये मिळालेले गुण किंवा या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी परीक्षा किंवा दोन्ही घटकांचा विचार अंतिम निवडीसाठी केला जातो.

चाळणी परीक्षा ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीची असते. यामध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांवर प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न राज्य शिक्षण बोर्ड किंवा सीबीएसइ-सेंट्रल बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन बोर्डाच्या १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात.

()या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सत्र १ ते सत्र ८ मध्ये पुढील बाबी शिकणे अत्यावश्यक आहेत. ()हिंदी किंवा कन्नड किंवा तामीळ किंवा तेलुगू किंवा मल्याळम यापैकी एक भाषा ()इंग्रजी, ()पर्यावरणाचा अभ्यास / माहिती आणि जनसंप्रेषण(कम्युनिकेशन)तंत्रज्ञान/आरोग्य शारीरिक शिक्षण/ रंगमंच-कला-प्राचिन हस्तकलेच्या वारशाची परंपरा.

()सत्र ९ ते १२- गणित/ रसायनशात्र/ भौतिकशास्त्र यापैकी ज्या विषयामध्ये प्रवेश घेतला असेल, त्या विषयाचा पायाभूत अभ्यासक्रम, उच्च माध्यमिक अध्यापनाचा पायाभूत अभ्यासक्रम, उच्चमाध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमात अंतर्भूत गणित/ रसायनशात्र/ भौतिकशास्त्र या विषय घटकांच्या- शिकवण्याच्या पध्दती.

()मुख्य अभ्यासक्रम- यामध्ये अध्यापन कौशल्याचे पाच अभ्यासक्रम, शारीरिक शिक्षण या विषयघटकाचे अध्यापनशास्त्र, १ ते ८ सत्रांमधील भौतिकशास्त्र/ गणित/ रसायनशास्त्र या विषयांमधील विषयघटकांचे अध्यापनशास्त्र, सत्र ९ ते १२ मधील याच विषयांचे १६ अभ्यासक्रम. ७ आणि ९ व्या सत्रात प्रत्यक्ष शाळेमधील सर्वसमावेशक अध्यापन प्रशिक्षणाचा या मुख्य अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
()या टप्प्यामध्ये अध्यापनशास्त्राचे तीन आणि भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा रसायनशास्त्र यापैकी ज्या विषयाला प्रवेश घेतला असेल त्याविषयाचे सत्र १ ते ८ मधील दोन असे विषय ऐच्छिक म्हणून अभ्यासता येतात. यापैकी प्रत्येकी एक विषय विद्यार्थ्यांना स्वीकारता येतो. सत्र ९ ते १२ मधील याच विषयांमधील दोन ऐच्छिक विषय घटक अभ्यासता येतात. संवाद कौशल्य आणि सर्वसमावेशक अध्यापन या ऐच्छिक विषयांचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची वा न स्वीकारण्याची मुभा देण्यात येते. हा अभ्यासक्रम इंग्रजीमधून शिकवला जातो. विद्यार्थ्यांना आपली अध्यापनशाखा पहिले आठ सत्र पूर्ण केल्यानंतर बदलण्याची मुभा मिळू शकते.

या संस्थेत डिप्लोमा इन गायडंस ॲण्ड कौन्सेलिंग हा अभ्यासक्रमही करता येतो.

अर्हता- पदवी आणि अध्यापन पदवीसह अध्यापन क्षेत्रात असणारे शिक्षक किंवा दोन वर्षाचा शिकवण्याचा अनुभव असलेले पदवी व अध्यापन पदवीधारक किंवा मानसशास्त्र/ अध्यापन/ सामाजिक कार्य / बालविकास या विषयांमधील पदव्युत्तर पदवी. प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरु होते. कालावधी एक वर्षं.

इतर महत्वाचे

()या संस्थेच्या कॅम्पस प्लेसमेंटमधून १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. ()अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना एम.एस्सी-एड या अभ्यासक्रमाच्या १ ते ८ सत्रांसाठी दरमहा ८०० रुपये आणि ९ ते १२ सत्रांसाठी दरमहा १२ शे रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. २० टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्कातून सूट दिली जाते. ५० टक्के मुलांना मेरिट-कम-मिन्स(गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती) या योजनेंतर्गत अर्थसाहाय्य केले जाते.

संपर्क - प्राचार्य, क्षेत्रीय शिक्षण संस्था, मानसगंगोत्री म्हैसुरु - ५७०००६ , दूरध्वनी-०८२१-२५१४०९५, फॅक्स- २५१५६५,ईमेल- riemysore@redifmail.com,

संकेतस्थळ- www.riemysore.ac.in आणि

www.ncert.cee.kar.nic.in.

  

 

 

आज करिअर कंसेप्ट(https://www.facebook.com/Career-concept-100260352041907)मध्ये-

गुरुकूल

क्षेत्रीय शिक्षण संस्था, भोपाळ-

या संस्थेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. हा अभ्यासक्रम बरकतउल्लाह विद्यापीठाशी संलग्नित आहे. या संस्थेत बी.एस्सी- बी.एड भौतिकशास्त्र या गटासाठी ४० जागा, बी.एस्सी- बी.एड(जीवशास्त्र) या गटासाठी ४० जागा आहेत.

चाळणी परीक्षा

बी.एस्सी-बी.एड या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एनसीइआरटी मार्फत कॉमन एंट्रस एक्झामिनेशन घेण्यात येते.

चाळणी परीक्षेमध्ये इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व(२० प्रश्न) / अध्यापन कल(३० प्रश्न) आणि प्रवृ
त्ती, कार्यकारणभाव क्षमता
(३० प्रश्न)  यांची चाचपणी करणारे ८० प्रश्न विचारले जातात. प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदीमध्ये असते. कालावधी- दोन तास. अचूक उत्तरास दोन गुण दिले जातात. चुकलेल्या उत्तरासाठी अर्धा गुण कापला जातो. न सोडवलेल्या प्रश्नासाठी गुण दिले जात नाही. अंतिम प्रवेश यादी तयार करताना ४० टक्के वेटेज या परीक्षेतील गुणांना दिले जाते. परीक्षा केंद्र-  नागपूर आणि मुंबई.

केंद्र सरकारच्या नियमानुसार राखीव जागा भरण्यात येतात. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ५० टक्के विद्यार्थ्यांना,मेरिट-कम-मिन्स योजनेंतर्गत आर्थिक साहाय्य केले जाते. मुले आणि मुलींसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली आहे.

अर्हता-

()बी.एस्सी-बी.एड(जीवशास्त्र गट)- या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान या विषयांचा अभ्यास केलेला असावा.

()बी.एस्सी-बी.एड(भौतिकशास्त्र गट)- या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा सांख्यिकी या विषयांचा अभ्यास केलेला असावा. विद्यार्थ्यांना १२ वी आणि पदवी स्तरावर ५० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमाती आणि दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये ५ टक्के सूट दिली जाते. या अभ्यासक्रमात सैध्दांतिक अभ्यास आणि प्रात्यक्षिके यांचा समन्वय साधला जातो. प्रभावी, सक्षम आणि समर्थ अशा माध्यमिक शिक्षकाची पायाभरणी होण्यासाठी उपयुक्त ठरणारे विषय घटक या अभ्यासक्रमांमध्ये सामील करण्यात आले आहेत.

विज्ञान आणि गणित विषयातील उच्चप्रतिचे अध्यापन करु शकणाऱ्या शिक्षकांची निर्मिती होण्याच्या दृष्टिने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात आधुनिक अध्यापन पध्दती, या क्षेत्रातील संशोधन, प्रयोग यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य विकसित व्हावे यासाठी अभ्यासक्रमाच्या कालावधीत विशेष लक्ष पुरवले जाते.

प्लेसमेंट सेल-

बी.एस्सी- बी.एड आणि बी.एड ही अर्हता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांस केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये, दयानंद अँग्लो वेदिक स्कूल, ॲटोमिक एनर्जी बीएड सोसायटी आणि देशातील अशाच समकक्ष शाळांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे.

डिप्लोमा इन गायडंस ॲण्ड कौन्सेलिंग हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मार्गदर्शक म्हणून करिअर संधी मिळाली आहे.

एम.एड अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालये/ शैक्षणिक संस्थांमध्ये करिअर संधी मिळाली आहे.

डिप्लोमा इन गायडंस ॲण्ड कौन्सेलिंग - विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक बाबींसाठी मार्गदर्शन करण्यासाठी हा अभ्यासक्रम,सेवेत असलेले शिक्षक, शैक्षणिक प्रशासक, अप्रशिक्षित शैक्षणिक सल्लागार, शिक्षक- सल्लागार यांच्यासाठी सुरु करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम अधिकाधिक व्यक्तिंना करता यावा म्हणून आता ऑनलाइन आणि दूरस्थशिक्षण पध्दतीनेही करता येतो. या अभ्यासक्रमांतर्गत आठ आठवड्यांची इंटर्नशिप, नामांकित सल्लागार संस्था/ कंपनीमध्ये करण्याची संधी दिली जाते.

संपर्क-www.ncert-idgc.org

एम.एड-

अध्यापक प्रशिक्षण संस्थांच्या गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक संशोधन आणि क्षेत्रीय स्तरावरील शैक्षणिक अभ्यासाचे विषयघटक या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत.

अर्हता- बी.एडमध्ये लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेत ५५ टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी गुणांमध्ये ५ टक्के सूट.

बी.एड- हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. विज्ञान, गणित, समाजशास्त्रे आणि भाषा या विषयातील दर्जेदार माध्यमिक शिक्षकांची निर्मिती होण्यासाठी या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती यापैकी कोणतीही एक भाषा शिकावी लागते. यामुळे ते उत्तम भाषा शिक्षक बनू शकतात. भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांना एकत्रित करुन एकच विषय म्हणून शिकवला जातो. यामुळे ते सामाजिक शास्त्र हा विषय शिकवण्यासाठी पारंगत ठरतात. या अभ्यासक्रमांतर्गत पहिल्या वर्षी चार आठवडे आणि दुसऱ्या वर्षी आठ आठवडयांचा शाळा अनुभव कार्यक्रम, हा उपक्रम राबवला जातो. त्यामुळे अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. त्याचा उपयोग प्रत्यक्ष कार्यरत झाल्यावर होतो.

क्षेत्रीय स्तरावरील कार्यानुभव, शारीरिक शिक्षण याचेही धडे विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे समाजातील समस्या आणि प्रश्नांची त्यांना जाणीव होते. याचा उपयोग समुदायांसोबत सुसंवाद साधण्याचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी होतो.

अर्हता- सरासरी ५० टक्के गुणांसह बी.ए/बी.एस्सी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये ५ टक्के सूट दिली जाते. बी.एस्सी पदवी घेतलेल्या उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र ,प्राणीशास्त्र या विषयांपैकी कोणत्याही दोन विषयांचा अभ्यास केलेला असावा किंवा बी.ए पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी पदवीस्तरावर हिंदी, गुजराती, मराठी, उर्दू आणि इंग्रजी या पैकी कोणत्याही एका भाषेचा आणि इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयाचा अभ्यास केलेला असावा.

चार वर्षे कालावधीचा बी.ए-बी.एड - या अभ्यासक्रमामध्ये समाजशास्त्र आणि मानव्यशास्त्रे या विषयाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांतर्गत हिंदी, इंग्रजी, उर्दू, मराठी, गुजराती यापैकी कोणतीही एक भाषा आणि इतिहास/ भूगोल आणि अर्थशास्त्र/ राज्यशास्त्र या सामाजिक शास्त्रातील विषयापैकी एक विषय पर्याय म्हणून स्वीकारता येतो. यामुळे सामाजिक शास्त्रे आणि भाषा या विषयातील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून कार्य करण्यास ते सक्षम होतात. हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि हिंदी भाषेत शिकवला जात असल्याने हे विद्यार्थी या दोन भाषांमध्ये उत्तमरीत्या शिकवू शकतात.

चार वर्षे कालावधीचा बी.एस्सी-बी.एड हा देशातील पहिला अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमांतर्गत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र आणि रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या दोन विषयगटातील प्रशिक्षित पदवीधर, दर्जेदार शिक्षक किंवा अध्यापक होण्याची पात्रता प्राप्त करतात. हा अभ्यासक्रम शिकण्याची भाषा इंग्रजी असली तरी विद्यार्थी इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत उत्तमरीत्या शिकवू शकतात.

या अभ्यासक्रमांतर्गत चौथ्या वर्षी आठ आठवडयांचा शाळा अनुभव कार्यक्रम(स्कूल एक्सपिरिअंस प्रोग्रॅम) हा उपक्रम राबवला जातो. त्यामुळे अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. त्याचा उपयोग प्रत्यक्ष कार्यरत झाल्यावर होतो. क्षेत्रीय स्तरावरील कार्यानुभव, शारीरिक शिक्षण याचेही धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. त्यामुळे समाजातील समस्या आणि प्रश्नांची त्यांना जाणीव होते.

या संस्थेत बी.एड-एम.एड हा इंटिग्रेट अभ्यासक्रमही करता येतो. अर्हता- विज्ञान / समाज शास्त्र या विषयातील ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये ५ टक्के सूट.

संपर्क-

रिजनल इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, शामला हिल्स, भोपाळ- ४६२०१३, दूरध्वनी- ० ०७५५- २६६१४६३, फॅक्स-२६६१६६८, ईमेल—principal.riebpl@gmail.com, संकेतस्थळ- www.riebhopal.nic.  

वैशिष्ट्ये

या संस्थेत विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण बौध्दिक, शारीरिक आणि भावनिक विकासास सातत्याने साहाय्य केले जाते. सतत शिक्षणाची ओढ निर्माण केली जाते. ज्ञानप्राप्ती, कौशल्यप्राप्ती आणि प्रगतीच्या क्षमतांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक करिअरसाठी सामर्थ्य प्रदान केले जाते. त्यामुळे हे विद्यार्थी सतत बदलत असलेल्या स्पर्धात्मक युगात सक्षमरीत्या कार्यरत राहू शकतात.

 

प्रारंभ(स्कूल ऑफ टिचर एज्युकेशन)-

या स्वायत्त संस्थेची स्थापन हरयाणा सरकारने केली आहे. ही संस्था झाज्जर येथे वसली आहे. या संस्थेतील बी.ए-बी.एड आणि बी.एस्सी-बी.एड या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना भारतातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना एनसीइआरटीमार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशनद्वारे प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, रोहतकशी संलग्नित आहे.

संपर्क- शासकीय, पी.जी नेहरु कॉलेजच्या विरुध्द दिशेला, बाहादूरगढ रोड-झाज्जर- १२४१०४ हरयाणा, दूरध्वनी-०१२५१-२५२५४५, ईमेल- prarambh.jjr@gmail.com,

 संकेतस्थळ-www.prarambh.org.in आणि www.schooleducationharyana.gov.in

०००

 


Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!