कौतुकाचा धनी


 कौतुकाचा धनी

रविवारचा दिवस. सकाळचे आठ वाजलेले. दिवाणखान्यातील सोफ्यावर ठेवलेला मोबाईल वाजू लागला. नंबर अनोळखी होता. त्यावेळी बाबा दिवाणखाण्यात होते नि समीर आंघोळीला गेला होता. त्यामुळे बाबाने मोबाईल कानाला लावला.
हॅलो, पलिकडून आवाज आला. हा कुणाचा मोबाईल आहे ?
समीर काळेचा.आपण कोण? बाबांनी विचारलं.
मी, महापालिका आयुकत आहे.
सर, तुम्ही, आश्चर्यचकित होऊन बाबांनी विचारलं. काय झालं सर? हा नंबर तुमच्याकडे कसा आला?
समीर, कोण बरं तुमचा ?
मुलगा आहे सर.
कोणत्या वर्गात शिकतो?
आठवित आहे. कां,काय झाल सर ?
अहो काही नाही. असं,घाबरु नका. समीरचे आभार माणायसाठी फोन केला होता.
आभार कशासाठी सर..बाबांनी विचारलं.
नंतर काही मिनिटे बाबा, हं हां ,हो का, अरे वा, वा छान, एव्हढेच शब्द मोबाइलवर बोलत होते. तीन- चार मिनिटांनी हे बोलणं थांबलं. बाबांनी थँक्यू म्हणून मोबाईल मेजावर ठेवला. एव्हाना समीर आंघोळ करुन दिवाणखाण्यात आला होता. त्याला बघताच बाबाने त्याला मिठीत घेऊन त्याची पप्पी घेतली. आई हे सारं बघत होती . बाबांचं हे असं वागणं बघून ती आश्चर्यचकित झाली. कारण कौतुक करण्याच्या बाबतीत समीरचे बाबा हात जरा आखुडतेच घ्यायचे. त्यामुळे त्यांच्याजवळ येऊन त्यांना चिमटा घेऊन ती म्हणाली,
बरे आहात ना तुम्ही. पुत्र प्रेम जरा जास्तच ओसंडून वाहतेय म्हंटल आज. काही पराक्रम- बिराक्रम गाजवला का लेकानं.
बाबांच्या प्रेमाच्या वर्षावानं समीरही जरा गोंधळूनच गेला होता. त्यानेही बाबांकडे प्रश्नार्थक चेहऱ्यानं बघितलं.
अहो, समीरच्या आई, या आपल्या लेकानं मोठ्ठाच पराक्रम गाजवलाय. त्याचं कौतुक करण्यासाठी खुद्द आयुक्तसाहेबांचा फोन आला होता, समीरच्या मोबाईलवर.
मोबाईलचं नाव घेताच आईचा चेहरा आक्रसला.
तरी, मी सांगत होते की याला आत्ताच मोबाईल देऊ नका म्हणून. साहेबरावांनी, काय बरं पराक्रम केला नि त्याचा नंबर आयुक्तांकडे कसा बुवा गेला. आईनं किंचित रागातच विचारलं.
०००
बाबांनी समीरला यंदाच्या वाढदिवसाला मोबाईल घेउुन दिला,याचा आईला फार राग आला होता. मुलं काय वाट्टेल ते बघत राहतात. गेम खेळण्यात वेळ दवडतात. मोबाईलमुळे चांगल्या सवयी लागत नाहीत. असं ती बाबांना गुस्स्यातच म्हणाली होती. एवढ्या लहान वयात मोबाईल देणं बरोबरच नाही, असं तिचं म्हणणं होतं. वाढदिवसाच्या दिवशी मोबाईल आणल्यानं बाबांशी व समीरशीही आई तुटक तुटकच बोलली. उपचारापुरता तिने त्या दिवशी वाढदिवस साजरा केला.
मोबाईलचा दुरुपयोग समीर करणार नाही, याची मला खात्री आहे, असं बाबांनी तिला सांगायचा प्रयत्न केला. पण ती त्या दिवशी काही ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हती..
०००
बाबांनी समीरला मोबाईलमधील अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. त्याचा वापर कसा करायचा हे सांगितलं. काय वापरु नये हे सांगितलं. तोटे सांगितले. फायदे सांगितलं. समीरला मोबाईल म्हणजे जादूची दुनियाच वाटली. तो त्यात चांगला रमून गेला. अधूनमधून आई त्याला रागावायची. बाबांना दूषणं द्यायची. पण दोघेही आता आपलं ऐकणार नाही, याची खात्री झाल्यावर तिने या विषयावर बोलणच थांबवलं.
०००
अगं, ज्या मोबाईलमुळे तुला समीर आणि माझाही राग आला होता, त्या मोबाईलनेच त्याला आज कौतुकाचा धनी बनवलंय. बाबा म्हणाले.
म्हणजे कोणता पराक्रम गाजवला याने, ते सांगा ना आधी...
०००
समीर ज्या कॉलनीत राहायचा. त्या कॉलनीतील एक गल्ली मुख्य रस्त्याकडे जात असे. या अरुंद गल्लीच्या रस्त्याखालून गटार वाहायचं. दोन ठिकाणी या गटारावर झाकणं होती. पण त्याला मोठी भगदाडं पडली होती. त्यामुळे या अरुंद रस्त्यावरुन जाणाऱ्यांसाठी धोका निर्माण झाला होता. या अरुंद गल्लीकडे कॉलनितल्या ज्येष्ठ मंडळींना लक्ष द्यायला वेळ नव्हता. समीरला याच रस्त्यावरुन पलिकडे स्कूल बस पकडायला जावं लागत असे. त्यामुळे या खड्डयांची त्याला भीती वाटायला लागली. हे खड्डे बुजवण्यासाठी कुणीच काही करत नाही, याचं त्याला वाईट वाटायचं.
एके दिवशी त्याने पेपरमध्ये, आयुक्ताच्या नावाने आलेलं आवाहन वाचलं. त्यात असं नमूद होतं की, ज्या नागरिकांना असे खड्डे, कचऱ्याचे ढिग दिसतील त्यांनी त्याचे फोटो काढून ते त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर टाकावे. समीरने भीतभीतच या खड्डयांचे फोटो आयुक्तांना पाठवले. पुढे काही दिवसांनी दोन्ही खड्डयांवर नवे झाकणं टाकण्यात आली. हे आपल्यामुळे तर घडलं नसेल ना, असं समीरला सहज वाटून गेलं. पण खात्री वाटत नव्हती.
तो मग, ज्या परिसरात राहत होता. त्या परिसरातील कचऱ्याचे ढिग, तुंबलेल्या नाल्या, नाल्यांवरील तुटलेली झाकणं, असे फोटो आयुक्तांच्या व्हॉटसॲपवर पाठवू लागला. सुटीच्या दिवशी तो जेव्हा परिसरात फेरफटका मारायचा तेव्हा, त्याला बदल घडलेला दिसू लागला. आपल्या फोटोचांच हा परिणाम असल्याचं त्याच्या लक्षात आलं. पण, याला काहीच पुरावा नसल्यानं त्याने घरी किंवा शाळेत हे सांगितलं नव्हतं. आणि आज खुद्द आयुक्तांनी त्याच्या पराक्रमावर शिक्कामोर्तब केलं होतं.
००००
एकाच क्रमांकावरुन येणाऱ्या फोटोंमुळे आयुक्तांना या क्रमांकाच्या नागरिकाची सजगता चांगलीच लक्षात राहिली. सजग नागरिकांमुळे प्रशासनालाही कशी मदत होते हे सांगण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी त्यांनी फोन केला होता.
०००
एव्हढा मोठा पराक्रम केला आपल्या लेकराने.
तू मात्र उगाच मोबाईला शिव्याशाप देत बसलीस. तुला किंवा मलासुध्दा मोबाईलचा असा वापर करावा असं सुचलं का? मी असतो माझ्या व्हॉट्सग्रुपवरील मित्रांशी चिटचॅट करत आणि तू असते तुझ्या ग्रुपला हाय हॅलो करत.
खरचं की हो.
अगं मुलांवर विश्वास ठेवला, त्यांन नीट समजावून सांगितलं ना तर ते भरकट नाहीत. मोबाईलचा किती सुंदर वापर करता येतो हे सिध्द केलं की नाही समीरनं. येत्या प्रजासत्ताक दिनी आयुक्तसाहेब समीरचा, जागरुक नागरिक म्हणून सत्कार करणार आहेत. त्यासाठीच त्यांचा मघा फोन होता.
म्हणून तुमचा कौतुकाच वर्षाव चालला होता वाटतं. आई हसत म्हणाली.
मोबाईलवरचा आईचा राग गेल्याचं बघून समीरला हायसं वाटलं.
सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!