बरोबरी


 बरोबरी

देशपांडे काकूंनी तेजोमयीच्या घरचं दृष्य बघितलच नि त्या थक्क झाल्या. बऱ्याच दिवसांनी त्या तेजोमयीच्या घरी आल्या होत्या. त्यांनी दाराची बेल वाजवली. तेजोमयीच्या आईने दरवाजा उघडला. दारात पाऊल टाकताच त्यांचं लक्षं अलेक्झांडरसोबत खेळत असलेल्या त्याच्या चार पायांच्या दोस्तमंडळीं (डॉगीज) कडे गेली. दोन नवे दोस्त अलेक्झांडरसोबत दंगामस्ती करत होते. त्यातील एकाचं लक्षं काकूंकडे गेलं. तो त्यांच्यावर भुंकू लागला. अलेक्झांडरने त्याच्याकडे डोळे वटारुन बघितले नि, नाही नाही, अशा आशयाची मान हलवली.
याचा अर्थ काकूंवर भुंकू नकोस असा होता. अलेक्झांडरला देशपांडे काकू परिचित होत्या. त्या त्याला अजिबात आवडत नसूनही आईने, त्यांच्यावर भुंकायचं नाही, त्या आपल्या शेजारी आहेत असं समजावून सांगितलं होतं. त्यामुळे तो देशपांडे काकू आल्या की त्यांच्या भवती एक फेरा मारुन शेपूट हलवून निघून जायचा. अलेक्झांडर शहाणा असल्याने तो आपल्यावर भुंकणार नाही याची खात्री काकूंना झाल्याने त्यांची भीती हळूहळू कमी झाली. कधीकधी त्या अलेक्झांडरच्या लाडही करायच्या.
त्यामुळे आता एका दोस्ताने काकूंवर भुकंताच अलेक्झांडरने त्याच्या पध्दतीने दटावलं.
अगं बाई, आणखी नवे कुत्रे आणलेत की काय? काकूंनी आश्चर्याने विचारलं. कुत्रा शब्द कानावर पडताच अलेक्झांडर गुरगुरायला लागला. आईने त्याला शांत केलं.
अहो ते कुत्रे नाहीत, ते अलेक्झांडरचे मित्र आहेत. तेजोमयी काकूंना म्हणाली.
मित्र? हे तर कॉलनीतले भटके कुत्रे दिसतात .काकूंनी काहीशा तुच्छतेनं विचारलं. पुन्हा कुत्रा शब्द कानावर पडताच, अलेक्झांडर स्वारी खवळलीच. त्याने काकूंवर उडी घेण्याचा पवित्रा घेतल्याचे लक्षात येताच आईने त्याला आवरलं.
अहो, ते अलेक्झांडरचे मित्र आहेत. सारखं त्यांना कुत्रे म्हणू नका.आई काकूंना म्हणाली.
सॉरी बाबा सॉरी...अलेक्झांडरचं सारचं काही वेगळं असत बाँ. कानाला खडा लावत काकू म्हणाल्या.
यात कसलं आलय वेगळेपण काकू, तेजोमयीनं विचारलं.
अगं मित्र-बित्र म्हणजे...म्हणजे...
म्हणजे, अलेक्झांडरला मित्र राहू शकत नाहीत का? आईने विचारलं.
पण असले भटके मित्र?
कां? ते काय परग्रहावरचे आहेत की त्यांना जीव नाही. आई किंचित नाराज होत म्हणाली.
तसं नाही म्हणायचय मला, पण मैत्री जरा बरोबरींच्याशी करायला नको का? देशपांडे काकू म्हणाल्या.
म्हणजे अंबाणी साहेबांच्या चार पायाच्या दोस्तासोबत का? तेजोमयी म्हणाली.
काहीतरीच काय? कुठे ते आणि कुठे आपण.
मग अलेक्झांडरच्या बरोबरीचे कोण?
अहो, आपल्या कॉलनीतल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या शेजाऱ्यांकडे असलेले ते चार पायाचे की काय दोस्त...देशपांडे काकू उपहासाने म्हणाले.
अहो काकू, आमच्या शेजाऱ्यांचे चार पायांचे दोस्त हे त्यांच्यासारखेच घरकोंबडे झाले आहेत. त्यांच्या घरची मंडळी कडकोट बंदोबस्तात आणि हे चार पायाचे दोस्तही बंदोबस्तात. आई म्हणाली.
कदाचित त्यांना अलेक्झांडर त्यांच्या बरोबरीचा वाटत नसावा. तेजोमयी म्हणाली.
म्हणून काय अशा भटक्यासोंबत मैत्री..काकूंनी परत तेच तुणतुणं वाजवायला सुरुवात केली. तेजोमयीला खरंतर राग येऊ लागला. आपल्याबद्दल देशपांडे काकू फारसं चांगलं बोलत नाहीत हे अलेक्झांडरच्या लक्षात आल्याने त्याने त्यांच्याकडे रागाने बघायला सुरुवात केली. हा कधीही त्यांच्यावर आपल्याला न जुमानता तुटून पडू शकतो हे आईच्या लक्षात आल्याने तिने तेजोमयीस इशारा करुन त्याला आणि त्याच्या मित्रांना आतल्या खोलित न्यायला सांगितलं. तेजोमयी तिघांनांही आत घेऊन गेली.
काकूंनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्या सोफ्यावर मोकळेपणे रेलल्या.
पण मला अजूनही हे काही पटतच नाही हो तेजोमयीची आई. अलेक्झांडरला मित्र आणि तेही...
त्यांना मध्येच थांबवत आई म्हणाली,
अहो देशपांडे वहिनी, मुक्या जिवांचाही आदर सन्मान करायला शिका की. तेजोमयीला मित्रमैत्रिणी आहेतच ना. तेही येतात आमच्या घरी खेळायला. जशी ती, तसाच आमच्यासाठी अलेक्झांडर.
अहो पण वहिनी, तेजोमयीचे मित्र मैत्रिणी...
तिच्या बरोबरीचे आहेत असच म्हणायचना तुम्हाला. अहो, तुम्ही कोणत्या जगात राहता. तेजोमयीने मित्रमैत्रिणी केले तेव्हा तिने काही, बरोबरीचं वगैरे बघितलं नाही. तिला तर ते हे बरोबरीच असणं म्हणजे काय तेही कळत नाही. हा किडा आपल्यासारख्या मोठ्यांच्याच डोक्यात वळवळतो. तिचं ज्यांच्याशी पटतं, जुळतं ते तिचे मित्र झाले. एकमेकांशी खेळण्यात, भांडण्यात, गप्पा करण्यात ती छान वाढतेय ना. बरोबरी बघून तिनं मैत्री केली असती तर त्या बरोबरीच्यांना सांभाळण्यात तिचा सगळा वेळ खर्ची पडला असता.
पण वहिनी अलेक्झांडरला...
देशपांडे वहिनी, अलेक्झांडरने त्याचे मित्र निवडले आहेत. त्याला त्यांच्यासोबत खेळण्यात आनंद मिळतो. हे आमच्यासाठी महत्वाचं. बाकी "बरोबरीचं" काय असतं ते घरकोबंडे जाणोत बुवा... देशपांडे काकूंकडे तिरपा कटाक्ष टाकत आई म्हणाली.
आई आणि देशपांडे काकूंच्या चर्चा सुरु असताना कधीतरी अलेक्झांडर आणि त्याची मित्रमंडळी दिवाणखान्यात येऊन बसली होती. तेजोमीयने त्यांना खायला दिलं होतं. या खाऊवर ताव मारत असतानाच अलेक्झांडरचं लक्ष आईच्या बोलण्याकडेही होतं. आईचं बोलण संपताच आणि तिचा तिरका कटाक्ष लक्षात येताच, अलेक्झांडरने आनंदाने उडी मारली आणि तो आईला बिलगला. या प्रकाराने घाबरलेल्या देशपांडे काकू चटदिशी उभ्याच राहिल्या.
काकू घाबरु नका, अलेक्झू "बरोबरी"च्यांनाच अशी मिठी मारतो. बरं का? इतरांकडे बघतही नाही. तेजोमयी हसत म्हणाली. यातली खोच लक्षात आल्याने आई खुदकन हसली. देशपांडे काकुंनी जळजळीत कटाक्ष टाकून निरोप घेतला.
सुरेश वांदिले

All reactions:
You, Latika Salvi and 2 others

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!