स्मार्ट गुपित


 


स्मार्ट गुपित

रविला चांगलच खडसावलं पाहिजे किंवा त्याला बदडून काढलं पाहिजे असं आईस गेल्या काही दिवसांपासून वाटत होत. त्याचं कारण म्हणजे रविचं सतत मोबाईलमध्ये शिरलेलं डोकं. बाबांनी त्याला काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन घेऊन दिला. तेव्हापासून तो हातातून मोबाइल सोडेचना. आईनं बाबांना बजावलं होतं की, सध्या याला मोबाइल घेऊन देऊ नका. पण बाबांनी आईचं ऐकलं नाही.

अभ्यास सोडून, रवी केवळ मोबाइलच बघत बसतो असं जेव्हा आईला खूप तीव्रतेनं जाणवू लागलं, तेव्हा एकेदिवशी त्याच्या हातून तिने मोबाइल हिसकला आणि रागानं फेकणार तोच दाराची बेल वाजली. दार उघडायला आई गेली. त्यामुळे मोबाइल वाचला.

आईने दार उघडलं. बाबा ऑफिसमधून आले होते. ते सोफ्यावर बसल्याबसल्या, आईने रविच्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली. मुलगा वाया गेला असं, ती बोलून गेली.

 बाबा फक्त हसले.

अहो हसता काय, हा ठोंब्या परीक्षेत नापास झाला म्हणजे कळेल तुम्हास. तेव्हा वेळ निघून गेली असेल.

असं काही घडणार नाही. रवी नापास तर होणार नाहीच्च.

अहो, तुम्ही त्याला रागावायचं सोडून त्याची बाजू कां घेता. आई रागानं म्हणाली.

काय रे कसं रागावू तुला. बाबा रवीकडे बघत, किंचित हसत म्हणाले.

अहो, मी गमंत करत नाही की विनोद करत नाही. तुम्ही माझं ऐकलं नाही तर रविचा कधी ज्योक होऊन जाईल हे तुम्हास कळणार सुध्दा नाही.

आई रागाने म्हणाली.

०००

हे खरच होतं की, बाबांनी मोबाइल घेऊन दिल्यावर सुरुवातीला रवी वेड्यासारखा त्यात शिरला होता. स्मार्टफोनमध्ये नवीन गोष्टी कोणत्या आहेत, हे बघण्यात त्याचे बरेच दिवस गेले. आईला वाटायचं तो फक्त गेमच खेळतोय. पण तसं नव्हतं. एक, दोन गेम खेळल्यावर रविला कंटाळा आला. त्यामुळे त्याने नंतर स्मार्टफोन मध्ये काय दडलय, हे बघण्याचं ठरवलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की यात अशा गोष्टी आहेत की ज्या त्याला अभ्यासासाठी, भाषणाच्या तयारीसाठी, शब्दांच्या पाठांतरासाठी, सामान्यज्ञान मिळवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. त्याने अशा गोष्टींचे ॲप्स स्क्रीनवर आणून ठेवले. वेळ मिळाला की तो ते बघायचा. पण आईला वाटायचं की, हा फक्त गेमच खेळतो. एक दोनदा रवीने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिचं काही समाधान झालं नाही.

बाबांना मात्र तो काय करतोय हे चांगलं ठाऊक होतं. बाबांनी त्याला प्रारंभीच स्मार्टफोन मधलं काय आणि कसं बघायचं, हे समजावून सांगितलं. स्मार्टफोनमधलं सगळं  काही बघता येणार नाही याची काळजीही त्यांनी घेतली. तसं तो करणार नाही याची खात्री होतीच त्यांना. त्यामुळे आईच्या सांगण्याकडे ते फारसं लक्ष देत नसत.

पहिल्या सत्राचा निकाल लागला. त्यात रविला चांगले गुण मिळाले. इंग्रजित डिस्टिंक्शन मिळालं. आईला त्याने जेव्हा गुणपत्रिका दाखवली तेव्हा आई म्हणाली, तू कॉपी केली नाहीस ना रे?

तेव्हा रविला खूप वाईट वाटलं. आईचा रागही आला. सरांनाच जाऊन विचार, असं तो रागानं म्हणाला. त्या दिवशी नीट जेवलाही नाही.

मनाचं समाधान करण्यासाठी आई दुसऱ्या दिवशी खरोखरच रविच्या शाळेत गेली. त्याच्या वर्गशिक्षकाला भेटली. तिने आपली शंका त्यांना बोलावून दाखवली. ही शंका ऐकून वर्गशिक्षकांना धक्काच बसला. आश्चर्यही वाटलं. आईच मुलावर संशय घेते म्हणजे, जरा चमत्कारिकच होतं. त्यांनी आईला समजावलं. रवी कसा चांगला मुलगा आहे, हे सांगितलं. अशा छान मुलावर संशय घेणं बरोबर नसल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.

रविने परीक्षेत कॉपी केली का, हे विचारायला आई शाळेत गेल्याचं कळल्यावर बाबांना राग आला. दोन दिवस रविच्या घरी तणाव होता. आईने तिसऱ्या दिवशी बाबांना सॉरी म्हंटल्यावर घरातील वातावरण निवळलं.

अगं, सगळीच मुलं वाया गेलेली नसतात. नवीन तंत्रज्ञान त्यांना कळलंच पाहिजे. त्यांना नीट समजावून सांगितलं तर बरोबर कळतं त्यांना. तुला वाटतं तसा काही रवी केवळ गेम खेळत बसत नाही. त्याने त्याच्या कामाचे वेगवेगळे ॲप्स डाऊनलोड केले आहेत. ते तो बघतो. इंग्रजी सुधारण्याचे ॲप बघून बघून त्याची शब्दसंपत्ती वाढली, व्याक्रण सुधारलं. त्याचा फायदा त्याला परीक्षेत झाला. आता झालं समाधान.

आई तेव्हढयापुरती हो म्हणाली. पण तिच्या मनातून रवीचं मोबाईलवर सतत असणं, हे वाईट्टच असल्याची भावना काही जाईना. तिच्या परिने पुन्हा चारपाचदा तिने रविला समजावण्याचा प्रयत्न केला. पण रविनं तिचं सांगणं हसण्यावरी नेलं.

मुलगा पूर्णपणे हातातून गेला. कामातून गेला असं सारखं आईला वाटू लागलं. तिचं हे वाटणं कसं दूर करायचं हा प्रश्न बाबा आणि रविलाही पडला. मात्र या प्रश्नाचं उत्तर दोघांनाही न मिळाल्यानं त्यांनी तिच्या या वाटण्याकडे दुर्लक्ष केलं.

०००

एके दिवशी दुपारी रविच्या शाळेतून घरी फोन आला.

काय झालं हो ? आईने फोन वरुन बोलणाऱ्या व्यक्तिस घाबरत विचारलं. ती व्यक्ती शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. शाळेत दुपारी चार वाजेपर्यंत पोहचण्याचा निरोप त्यांन आईस दिला. आईला नको नको त्या शंका येऊ लागल्या. तिने बाबांना फोन केला. त्यांनाही शाळेतून मुख्याध्यापिकांचा फोन आला होता.

मी पण चारवाजेपर्यंत पोहचतो शाळेत. तू टॅक्सी करुन नीघ, असं बाबांनी आईस सांगितलं.

आईला आता खूप काळजी वाटू लागली. रविचं काही बरंवाईट तर झालं नाही ना, अशासारखे विचित्र विचारही तिच्या मनात रुंजी घालायला लागले. ती घाईघाईत तयार झाली. टॅक्सी करुन शाळेत पोहचली. तेव्हढयात बाबाही पोहचले. त्यांना बघतातच, आई रडायला लागली.

अगं तू रडतेस कशाला.

रविचं काही बरं-वाईट तर झालं नसेल ना. ती हुंदका देत म्हणाली.

कुणी सांगितलं तुला हे, बाबा किंचितसे रागावत म्हणाले.

अहो, मग कशासाठी त्यांनी बोलावलं असेल दोघांना.

ते आपण  आत जाऊन मुख्याध्यापिकांनाच विचारु या ना. काहीही माहिती न घेता तू थेट निष्कर्षच काढून स्वत:ला त्रास करुन घेतेस. बाबा म्हणाले.

आई आणि बाबा दोघेही मुख्याध्यापिकांच्या दालनात पोहचले. आईचा रडवलेला चेहरा बघून मुख्याध्यापक बाईंना राहावलं नाही.

काय हो काय झालं, त्यांनी आईला विचारलं. तेव्हा आई रडूच लागली.

अहो, तुम्ही रडता कशाला? मुख्याध्यापक बाई पुन्हा म्हणाल्या.

बाबांनी आईच्या मनातील शंका त्यांना बोलून दाखवली. मुख्याध्यापकबाई हसायलाच लागल्या.

तुम्ही अशा चित्रविचित्र समजुती कां बरं करुन घेता बुवा. आम्ही बोलावलं याचा अर्थ काहीतरी वाईट्टच झालं असेल हे कशावरुन ? चांगलं पॉझिटिव्ह पण राहू शकतं ना....मुख्याध्यापकबाई आईकडे बघत म्हणाल्या.

हो राहू शकतं ना. आई कशीबशी म्हणाली. मुख्याध्यापकबाईंच्या बोलण्यानं तिला बरं वाटलं. तिच्या मनावरच दडपण कमी झालं.

पण मॅडम तुम्ही, आम्हा दोघांनाही कसं काय तातडीनं बोलावलं.

कसली तातडी ? आमचं आधीच ठरलं होतं. रविच्या बाबांना ठाऊक आहेच की. त्यांनी तुम्हाला सांगितलेलं दिसत नाही. मुख्याध्यापक बाईंनी बाबांकडे बघत विचारलं.

घाईघाईत सांगायचं राहून गेलं. बाबा दुसरीकडे बघत म्हणाले.

आता तुम्हीच सांगून टाका ना मॅडम, म्हणजे माझ्या डोक्यावरचा ताण तरी कमी होईल. आई म्हणाली.

०००

सारं काही सांगते. त्याआधी तुम्ही माझ्यासोबत चला. असे बोलून मुख्याध्यापक बाईंनी आई आणि बाबांना एका हॉलमध्ये नेले. तिथे शाळेतील सर्व शिक्षक आणि बरीचशी मुलं आधीच येऊन बसली होती. रवीही तिथेच होता. आईबाबांकडे बघून त्याने त्यांना हाय केले. आईबाबांना मुख्याध्यापकबाईंनी बसायला सांगितलं. त्या स्टेजवर चढल्या. त्यांनी निवेदन सुरु केलं. आजची सभा त्यांनी खास आयोजित केली होती. सभेचा विषय होता,स्मार्ट फोनचा स्मार्ट उपयोग. त्यांनी जेव्हा वक्त्याचं नाव घोषित केलं, तेव्हा आईला आपण स्वप्न तर बघत नाही ना, असं वाटायला लागलं. तिने कुणाच्या नकळत स्वत:स चिमटाही घेऊन बघितला. ते काही स्वप्न नव्हतं. सभेचा वक्ता होता रवी. तो स्मार्ट फोनचे स्मार्ट उपयोग, समजावून सांगणार होता.

रवी जागेवरुन उठला, तेव्हा टाळयांचा कडकडाट झाला. मुलांसोबतच शिक्षकांनीही टाळया वाजवल्या. रवी आत्मविश्वासाने स्टेजवर चढला. मुख्याध्यापकबाईंना  वाकून नमस्कार केला. आईबाबांकडे बघितलं. बाबांनी त्यास अंगठा दाखवून शुभेच्छा दिल्या. आईला मात्र अद्यापही विश्वास बसत नव्हता.

रवी बोलू लागला. त्याने स्मार्ट फोनचे विविध उपयोग सांगितले. स्वत:चं इंग्रजी कसं सुधारलं हे सांगितलं. त्या ठिकाणी शिक्षकांचा व्हाटॅसॲप ग्रुप तयार करुन दिला. या ग्रुपवर माहिती, फोटो कसे अपलोड करायचे, इतरांकडे कसे पाठवायचे हे सांगितलं. गणित, विज्ञान, भाषेविषयीचे ॲप्स डाऊनलोड कसे करायचे, याचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं.

त्याचं भाषण संपलं, तेव्हा मुलांसोबत शिक्षकांनीही पुन्हा टाळ्या वाजवल्या. बाबांनीही टाळया वाजवल्या. आई मात्र एकटक रविकडे बघत होती. तिला टाळया वाजवण्याचं भान राहिले नाही.

स्टेजवरुन खाली उतरल्यावर रवी थेट आई बाबांकडे धावला. आईला त्याने मिठी मारली. आईला हुंदका आला. पण तिने तो कसाबसा थांबवला.

०००

या कार्यक्रमानंतर तिघांनाही घेऊन मुख्याध्यापकबाई त्यांच्या दालनात आल्या. त्यांनी आईबाबांना बसायाला सांगितलं. रवीही बसला. आईबाबांसाठी त्यांनी चहा बोलावला. चहा येईपर्यंत त्या रविचं कौतुक करत होता. स्मार्ट फोनचा वापर करुन कशी प्रगती करता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवी असल्याचं, त्यांनी आईला सांगितलं. रविच्या शरिरावर मुठभर मांस चढलं. येत्या गॅदरिंगमध्ये रविला टॅब देणार असल्याचं त्यांनी आईबाबांना सांगितलं.

पण, रविला स्मार्टफोनमधलं खूप कळतं हे कसं कळलं मॅडम तुम्हास, आईने किंचित भीत भीत विचारलं.

मुख्याध्यापक बाई हसल्या.

अहो, रविने परीक्षेत कॉपी तर केली नाही ना, असं विचारायला तुम्ही येऊन गेल्याचं मला त्याच्या वर्गशिक्षकानं सांगितलं. रवीसारख्या चांगल्या मुलावर आई संशय घेते म्हंटल्यावर एकेदिवशी रविला माझ्याकडे बोलावून घेतलं. त्याला खरं काय ते विचारलं. तेव्हा स्मार्ट फोनचं कारण कळलं. मग आम्ही याला खरोखरच किती स्मार्टफोन मधलं कळत हे समजून घेतलं. चांगली अर्धा-एक तास उलटतपासणी चालली. आमच्या असं लक्षात आलं की, रविला यातली खूप माहिती आहे. आमच्यापैकी अनेकांना साध्यासाध्या गोष्टीही माहीत नव्हत्या. म्हणून मग आम्ही, स्मार्टफोनचे स्मार्ट उपयोग याविषयावर रविचच भाषण ठेवलं. तुम्ही प्रत्यक्ष बघितलच की आज, त्याचा स्मार्टफोनचा अभ्यास किती दांडगा झालाय ते.

मुख्याध्यापकबाईंच्या सांगण्यानं आईचं समाधान झाल्यासारखं वाटलं. आईने त्यांना थँक्यू म्हंटलं. मुख्याधापकबाईंचा निरोप घेऊन तिघेही घरी आले.

०००

म्हणजे हे आधीच सर्वकाही ठरलं होतं तर, बाबांकडे बघत आई त्राग्यानं म्हणाली.

काही ठरलं नव्हतं. मात्र मुख्याध्यापक बाईंनी मला जेव्हा रविच्या भाषणाबद्दल कळवलं, तेव्हा, मोबाइलमुळे रविची तू निष्कारणच कशी काळजी करतेस हे त्यांना सांगितलं. तू शाळेत जाऊन रवीबद्दल संशय व्यक्त केला तेव्हापासून तू त्यांना माहीत होतीस. तू कशी काळजीत पडली आहेस. त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण कसं तणावात आहे हेही सांगितलं. तुझ्या मनातील गैरसमज दूर करण्याचा ही संधी असल्याचं माझ्या लक्षात आलं. बाबांनी विस्तृतपणे सारंकाही समजावलं.

आईचा राग कधीचाच गेला होता. या स्पष्टिकरणानंतर तिने रविला आवेगानं आपल्या कुशित घेतलं. आतापर्यंत दाबून ठेवलेल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली.

०००

यंदा आईच्या वाढदिवसाला बाबांकडून हट्टाने रविने आईला स्मार्टफोन घेऊन दिला. त्यातील बऱ्याच छोट्याछोट्या गोष्टी रविने आईस समजावून सांगितल्या. रवीची आईही आता स्मार्ट झाली आहे. बरेच व्यवहार ती स्मार्टफोनने करतेय. त्यामुळे तिचा वेळ आणि श्रमही वाचतोय. या वाचलेल्या वेळेचा उपयोग ती वाचनासाठी करायला लागलीय.

 आईला आता रवीचा अभिमान तर  वाटतोच शिवाय कॉलनीतील आयांना मुलांवर अविश्वास दाखवू नका, असंही ती त्यांना समजावून सांगायला लागली आहे.

सुरेश वांदिले

००००

 


Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!