ताडोबातील महाल आणि उडणाऱ्या मगरी भाग दोन

 


ताडोबातील महाल आणि उडणाऱ्या मगरी

भाग दोन

(पूर्वसूत्र- काल वाचलं ताडोबातील गुप्त ठिकाणी असलेल्या महालाचं रहस्य आणि उडणाऱ्या मगरीबद्दल.पुढे काय झालं?)

इथून नागपूरला, नागपुरातून चंद्रपुरात, चंद्रपुरातून ताडोब्याला, ताडोब्यातून तलावा जवळ, तिथून अंधाऱ्या बोगद्याजवळ, बोगद्याजवळील दैत्याजवळ.. दैत्याकडून अंधारलेल्या बोगद्याला प्रकाशमान करण्याचे गुपित मिळवायचे. बोगद्यात प्रकाश, प्रकाशातून पुढे..

पुढे तर पन्नास हजार विहिरी आणि उडणाऱ्या मगरी, झाडाच्या टोकावर असणारे दशमुखी नाग आणि खाली वेटोळे घालून बसलेले नाग  म्हणजे आपला गेम खल्लास... काही गेम खल्लास होत नाही. नेहमी पॉझिटिव्ह विचार कर..

अरे, समज की तो दैत्य माझ्या बहादुरीवर भाळला तर तोच त्याच्या खांद्यावर बसवेल आणि घेऊन जाईल मला त्या राजवाडयात.

दैत्याच्या खांद्यावर मला बघून झाडाच्यावर असणारा दशमुखी नाग हिस्स नाही करणार की फिस्स नाही करणार. मगरींचा तर काही प्रश्नच नाही. तरीही त्या उडत उडत आल्यातर  आकाशातील नागांना त्यांच्याशी युध्द करायला सांगेन. त्यांचं युध्द सुरु असेपर्यंत राजवाडयात पोहचलेलं असेन.

तो भव्य राजवाडा बघून तुझे डोळे दीपून गेले तर...

मी स्वत:ला कणखर ठेवेल. राजवाड्यात अक्राळविक्राळ डायनोसार राहू शकतात. मला बघून ते आकाशाकडे झेपावू शकतात. किंवा प्रेमळ डायनोसारही राहू शकतात.. मला बघून ते आनंदाने उड्या मारु शकतात.

अरे पण, दोन्ही गोष्टी कशा शक्य आहे.

मग एकच शक्य आहे, असं समजू या ना. सोईची असणारी...

म्हणजे...

प्रेमळ डायनोसार बेभान होऊन नाचू लागतील. कारण त्यांनी मागील २५ हजार वर्षात एकमेकांशिवाय दुसरं काहीच बघितलं नाही ना...आपल्यापेक्षा कुणी वेगळा आहे, असे मला हे बघून त्यांना अत्यानंद होईल. माझं भव्य स्वागत करुन ते मला राजवाडयाच्या आत नेतील.

पण राजवाडा तर बंद आहे. गेली अनेक शतके. डायनोसार फक्त बाहेरच्या संरक्षणासाठी आहेत.

मग आतमध्ये कसं जाणार.

कसं जाणार.. हा सवाल तुलाही पडेल. डायनोसारानांही खजील वाटेल...

कारण काय?

कारण तुला राजवाडयातील रहस्य जाणून घेण्याची इच्छा झाली...

ते इतकी वर्षे इथे वास्तव्याला आहेत, पण त्यांना मात्र राजवाड्याच्या आत काय आहे, हे जाणून घेण्याची इच्छा झालेली नाही.

त्यांना तुझी हुषारी बघून कौतुक वाटेल.सोबत आलेल्या दैत्यासही कौतुक वाटेल. कारण त्यालाही कधी राजवाडयात यावे वाटले नाही. राजवाडयात काय रहस्य दडले आहे, हे जाणून घ्यावे वाटलं नाही. तोही तुझ्या हुषारीने प्रभावित होईल.

वॉव..

मग, सगळे डायनोसार आणि तो दैत्य तुला या, राजवाडयाचा राजपूत्र घोषित करतील. दैत्य म्हणेल, राजपुत्रा, तुम्ही काही काळजी करु नका...आता तूच शोध घे, या राजवाडयात काय दडलेय ते..

वा वा...

मग तो दैत्य तुझ्याभोवती संरक्षणासाठी अत्यंत हुषार आणि चपळ अशा डायनोसारची रचना करेल. समजा दगाफटका होण्याची शक्यता वाटली तर या संरक्षक भिंतीतील सर्वात वेगवान अशा डायनोसारवर तू बसायचे. तो एका क्षणात नागपूरच्या विमानतळावर आणून पोचवेल. तुझ्या जिवाला कोणताही धोका होणार नाही.

वा व ..

अरे, सारखा वाव वाव काय करतोस...

त्याशिवाय तू काही बोलायला शिल्लकच ठेवले नाही ना.

आता पुढे काय...

पुढे दैत्य आणि २५ डायनोसॉर चहुबाजूनी राजवाडयात शिरतील.

पुढे काय...

पुढे काहीतरी निश्चित घडेल

काय घडेल....

काही तरी जबरदस्त घडेल..

ते घडण्यासाठी काही काळही जाऊ शकतो..

म्हणजे काय...

याचा अर्थ, असा की राजवाडयातील रहस्य उलगडायला एक दिवसापासून ते एक वर्षंही लागू शकतं..

मग तोपर्यंत तू काय करणार..

माशा मारणार...

इथे तर त्या दिसतच नाही.

मच्छरं मारणार..

तेही दिसत नाही..

चिलट मारायचं...

तेही दिसत नाही...

मग स्वत:लाच मारणार...

तेच सध्या एकमेव शक्य दिसतय मला.. हा हा हा...

समजा रहस्याचा शोधच लागला नाही तर, असं कसं शक्य आहे...

दैत्य आणि डायनोसॉर परतच आले नाही तर..

ते परत कां येणार नाही...

फार तर अपयशी होऊन येतील...

तरी सुध्दा आलेच नाही तर काय..

तर समजायचं की राजवाडयातील रहस्य हे काळे रहस्य आहे. असले रहस्य हे कुणालाच कळत नाही म्हणे.

मग इतक्या उचापती करायच्या तरी कशाला...

उचापती आपण नाही करणार तर हे डायनोसॉर करणार की काय... त्यांना तेव्हढी अक्कल असती तर त्यांनी आतापर्यंत आपल्या जड शेपट्या हलक्या करुन राजवाड्यावर धडका नसत्या कां दिल्या.

त्यामुळे हे रहस्य उलगडण्याचं कार्य करण्याची जबाबदारी नियतिने तुझ्यावरच सोपवली आहे असं समजायचं.

कोण ही नियती.

अरे आहे ही एक अदृष्य शक्ती. आपण म्हणतो की नाही स्वराज्याची स्थापना करण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर नियतीनेच सोपवली होती, तसचं हे.

म्हणजे भारी आहे की रे हे प्रकरण.

वा वा वा, आता मीच शोध लावणार ताडोबातल्या जंगलाच्या आत असलेल्या घनदाट जंगलातील राजवडयातील रहस्याचं आणि अजरामर होणार, असं जोरजोरानं म्हणत रवी बेडच्या खाली पडला. त्या धडाडधूम आवाजाने आई बाबा त्याच्या खोलित धावत आले.

डोळे चोळत रवी इकडे तिकडे बघत होता...

काय झाले रे...बाबांनी विचारलं..

ताडोबा...आईकडे बघत रवी कसाबसा बोलला.

कोण आणि काय आहे हा ताडोबा... आईनं आश्चर्यानं विचारलं.

मला समजलं, त्याला काय म्हणायचय ते. बाबा आईकडे बघत म्हणाले

रवी महाराज, पुन्हा एकदा स्वप्नात गुंग झालेले दिसतात. काल ॲमेझानच्या जंगलात फिरुन आले. आज ताडोबाच्या जंगलाची सैर केलेली दिसते...बाबांनी फिरकी घेतली.

काय रे काय दिसलं तुला तिथे.. आईनं विचारलं.

रवीच्या, आता सारं काही ध्यानात आलं होतं. स्वप्नात तो तोडाबाच्या आत घनदाट जंगलात असणाऱ्या अतिविशाल राजमहालापर्यंत पोहचला होता. यातल्या रहस्याची गुंतागुंत सोडवण्यासाठी तो प्रयत्न करत असतानाच तो बेडच्या खाली पडला. याचा अर्थ तो स्वप्नातच सारं काही बघत होता..

या स्वप्नाविषयी बाबांना काही सांगावं की नाही, या पेचात रवी तो पडला असताना बाबांनी त्याचे कान पकडले. जरा स्वप्न बघणं कमी कर आणि पहाटे उठून धावायला जा, असा सल्ला त्यांनी दिला..

०००

आता दररोज धावायला जायचं की पहाटे स्वप्नातच रमायचं याचा निर्णय अद्याप रवीने घेतलेला नाही, बर का मित्रांनो,

 

सुरेश वांदिले


Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!