मैत्रीचा आनंद




मैत्रीचा आनंद
एकदा चिमणीचं लहानसं बाळं घरट्यातून खाली पडलं. घरट्याच्या खाली एक मांजर निवांत बसली होती. ते बाळं तिच्या अंगावर पडलं. त्यामुळे ते वाचलं.ते इटुकलं बाळ बघून मांजरीस दया आली. तिने बाळाला आपल्या पंजाखाली घेतलं. त्याला आपल्या जिभेने चाटायला सुरुवात केली. मांजरीच्या उबदार स्पर्शाने ते बाळ लगेच मांजरीच्या कुशित झोपी गेलं. पुढे दोघांची छान मैत्री झाली.
मांजरीच्या पाठीवर बसून ते पिल्लू इकडे तिकडे फिरत असे. मांजर त्याच्यासाठी खाऊ आणायची. ते दोघेही मिळून आनंदाने खात असत. दोघेही एकत्र खेळत. बागडत. दोघांना एकमेकांशिवाय करमत नसे. त्यामुळे दोघेही सतत एकत्र असत. मांजर त्या पिल्लाला नरजेआड होऊ देत नसे.
हळूहळू ते पिल्लू उडायला लागलं. या फांदीवरुन त्या फांदीवर जाऊ लागलं. मांजरीसाठी आपल्या चोचित पकडून एखादं छोटसं फळं आणायला लागलं. याचा मांजरीला फार आनंद होत असे.
एकदा हे पिल्लू सकाळीच बाहेर गेलं असताना, मांजरीची मावशी तिच्याकडे आली. तिला बघून मांजरीला आनंद झाला. मांजरीने तिची ख्यालीखुशाली विचारली.
काय गं मावशे, कशी काय आठवण झाली माझी इतक्या वर्षांनी?
काही नाही गं, तुझ्या आणि चिमणीच्या पिल्लाची गोष्ट पोहचली बरं का माझ्या कानापर्यंत.
वा वा छान ...
छान काय?अजून काहीच छान झालेलं नाही.
म्हणजे?मांजरीने आश्चर्याने विचारलं.
अगं, तुला एक गुपित सांगायला आले.
कसलं गुपित मावशे?मांजरीनं अधिरतेनं विचारलं.
अगं, चिमणीचं मास खूप स्वादिष्ट असतं.ते तुला ठाऊक नसावं.
मला न ठाऊक असायला काय झालय?
हो का, मग आतापर्यंत का नाही मेजवाणी झोडलीस त्या पिल्लाचे मास खाऊन?
अगं, मावशी काहीतरी अभद्र कां बोलतेस?
अगं अभद्र नाही. खरं तेच बोलते.आता मी इतक्या वर्षांनी आलीय तुझ्याकडे.माझ्यासाठी कर त्या पिल्लाच्या मासाची मेजवाणी! मावशी बोलून गेली. याचा मांजरीला खूप राग आला. तिने मावशीला हाकलून लावले.
०००
इकडे पिल्लालाही दुसऱ्या चिमण्या असंच काहीबाही सांगत. मांजर कधीही तुला खाऊन टाकेल. तेव्हा आता तिच्याकडे जाऊ नकोस म्हणून.पण पिल्लाने त्यांचं काही ऐकलं नाही. आधी एखादी गोष्ट घडून गेली असेल, तसच पुन्हा घडेल असं नाही, तो इतर चिमण्यांना म्हणायाचा.
तुला, आता स्वत:हून आगितच जायचं असेल तर जा बापूडा, असं इतर चिमण्या त्याला म्हणत.
आजही तसच घडलं. पिल्लाने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन त्यांचा निरोप घेतला.
तो मांजरीकडे आला तेव्हा खूप दु:खी झाला होता. त्याचा चेहराही पडला होता. मावशीच्या वागणुकीने मांजर दु:खी झाली होती. दोघांनी एकमेकांना बघितलं तेव्हा, एकाच वेळी, त्यांनी कशाचं दु:ख होतयं असं एकमेकांना विचारलं. तेव्हा आधी मांजरीने आणि नंतर पिल्लाने दिवसभरात काय घडलं ते सांगितलं.
खरच मावशी, तू मला खाशील का गं?चिमणीने आर्त स्वरात विचारलं.
नाही... नाही...तुला खायचं असतं तर कधीच नसतं का खाल्लं? मला खाण्यासारखं खूप मिळतं, त्यांना खाईन.पण तुला खाऊन मला माझा मित्र आणि त्यामुळे मिळणारा आनंद नाही गमवायचाय.मांजर म्हणाली. चिमणीचे डोळे भरुन आले.दोघांची मैत्री आणखी घट्ट झाली.

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!