भाग एक नेपी मनिषा परब


 

भाग एक

नेपी मनिषा परब

नेपोलियन, हा आमचा डॉगी. आमच्या घरचा सदस्य. आई त्याला नेपी म्हणते. मी नेपो. तर बाबा नेप्या पासून नेपाटल्या पर्यंत त्या क्षणाला जे त्यांना नाव सुचेल ते म्हणतात. मात्र नेपोलियनला आईनं ठेवलेलं नेपी हेच नाव खूप आवडतं. इतकं की, एखाद्या अनोळखी माणसानं त्याला नेपी असं म्हंटल तरी स्वारी त्याच्याकडे बघून भुंकनं बंद करते आणि त्याच्याकडे प्रेमानं बघायला लागते. पण हे गुपित आम्हा तिघांनाच माहीत आहे. हा प्रयोग आम्ही अगदी खूप खूप जवळची माणंस पहिल्यांदा आमच्याकडे आली तेव्हा त्यांच्यामार्फत करुन बघितलाय. नेपिचं रहस्य मात्र आम्ही त्यानांही सांगितलं नाही.

०००

नेपिला आपलं आडनाव लावू या का, असं एकदा आईनं बाबांना विचारलं. यावर बाबा हो किंवा नाही असं काहीच बोललं नाही. त्यामुळे त्यांना आईचं म्हणनं पटलं किंवा नाही हे काही समजलं नाही. या विषयावर आईला बोलायचं होतं. पण बाबांनी ही चर्चाच होऊ दिली नाही. त्यामुळे आईच्या लक्षात आलं की, बाबांना आपलं आडनाव लावण्याची कल्पना काही आवडलेली नाही. तेव्हा आईनं हा विषय बाजूला ठेवला. पण नेपी हा आमच्या घरचा एक सदस्यच नसून तो या कुटुंबाचा अविभाज्य भागच आहे, हे इतरांच्या मनात पक्क ठरवण्यासाठी मग आईनं त्याला स्वत:चं नाव दिलं.

सध्या त्याचं नाव नेपी मनिषा असं झालय. प्रारंभी हे नाव काय आहे हे काही नेपिला कळेना. त्याच्याकडे बघून  नेपी मनिषा म्हंटलं की तो इकडेतिकडे बघायला लागायचा. आता काय करावं हा आईला प्रश्न पडला. इतके लाड कशाला करतेस असा सवाल बाबांनी केला. नेपीला स्वत:चं नाव चिटकवायचा आग्रह आई कां करतेय हा प्रश्न माझ्या मनात पडला. आम्हा दोघांच्याही प्रश्नांकडे आईनं दुर्लक्ष केलं, आणि नेपीला, तू नेपी मनिषा आहेस असं तिने समजावून सांगण्याचा निश्चयच केला.

०००

एके रविवारी सकाळी फिरुन आल्यावर आपल्यासमोर बसवून आईने नेपीची शिकवणीच घेतली. मी ते आश्चर्यानं आणि कौतुकानं बघत होतो.

नेपी हा आईच्या गळयातला ताईतच असल्यानं तो आई सांगेल तसं करायचा. आईनं त्याला आपल्या समोर बसण्यास सांगितलं. आज्ञाधारकपणे तो आईसमोर बसला. कोणतीही खळखळ केली नाही.

आई सोफ्यावर बसली. तेव्हा नेपी तिच्याकडे मान वर करुन लक्षपूर्वक बघू लागला.

आईनं त्याच्या नावाची कथा त्याला कथन केली. नेपोलियन- नेपी- नेप्या ते नेपी मनिषा पर्यंत. नेपीने सारं काही मन लावून ऐकलं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मी काळजीपूर्वक बघत होतो. आईनं जेव्हा बाबांनी आमचं आडनाव लावण्याविषयी काहीच उत्साह दाखवला नाही असं सांगितलं तेव्हा त्याने रागाने मान वळवून मागे बघितलं. मागे बाबा होते.

त्याच्या डोळ्यातला राग बाबांना बरोबर कळला. त्यांनी लगेच सॉरी म्हणून टाकलं. आईला हसू आलं. ती कां हसली असावी असा प्रश्न नेपीच्या चेहऱ्यावर उमटला आणि तो पुन्हा आईकडे वळला. आडनाव नाही लावायला मिळालं म्हणून माझं नाव मी तुला दिलय. माझं नाव मनिषा. असं ती तीन चार वेळेला त्याला म्हणाली. मग त्याच्या कानातही म्हणाली.

मला हे ठाऊक होतं की डॉगीची ऐकण्याची शक्ती ही मानसाच्या ऐकण्याच्या आठपट अधिक असते. त्यामुळे कोणताही आवाज त्यांना लगेच ओळखू येतो. वेगवेगळे आवाजही त्यास चांगले ओळखता येतात. आई त्याच्या कानात पुटपुटताच नेपी ताडकन उठला आणि आईच्या कुशितच शिरला.

एखादं लहान मूल जसं आवेगानं आईच्या कुशित शिरतं ना तसं. मीसुध्दा लहानपणी असाच आईच्या कुशित शिरत असे. आईनं त्याच्या कानात जे सांगितलं ते त्याला पक्क कळलं, याची ती खात्रीच होती. आईच्या डोळयात अश्रू आले. बाबांनी हुंदका दिला.

माझ्यासाठी सारचं चमत्कारिक होतं. मी नेपीकडे बघितलं तर त्याच्याही डोळयातून अश्रू येत होते असं मला जाणवलं. बाबा आपल्या जागेवरुन उठून आईकडे आले. त्यांनी नेपीला जवळ घेतलं. प्रेमानं कुरवाळलं. आईला सॉरी म्हंटलं. चुकलं माझं असही म्हणाले.

आई फक्त हसली. आई हसल्यानंतर, नेपिने शेपटी हलवून आपणास आईस जे म्हणायचं आहे ते कळलय असं निदर्शनास आणलं. नेपिला आता नेपी मनिषाच म्हणायचं असा दंडक आईनं घातला. यस्स मॅडम म्हणून आम्ही दोघांनी आईचा आदेश मान्य केला.

००००

त्या दिवशी आम्ही तिघेही नेपीस, नेपी मनिषा असच बोलावत राहिलो. त्या दिवशी एक दोन जवळची लोकं आमच्याकडे आलीत त्यांच्यासमोरही एक दोनदा नेपी मनिषा असंच उच्चारल्यावर , हे काय नवं खूळ असं त्यांनी विचारलं. पण आम्ही काही आमचं सिक्रेट काही उघड केलं नाही.

००००

दुसऱ्या दिवशी बाबा ऑफिसमधून आले आणि त्यांनी आम्हाला आश्चर्य चकितच केलं.

त्यांनी सुंदर अशी पत्रिका छापून आणली होती. ती पत्रिका होती नेपिच्या नामकरणाची.

बाबांनी नेपिच्या नामकरणाचा मोठा कार्यक्रमच आयोजित केला. ती पत्रिका जेव्हा आई आणि मी वाचली तेव्हा आमच्या डोळयावर विश्चासच बसेना.

बाबांनी नामकरण समारंभ हा नेपी मनिषा या नावासाठी आयोजित केला नव्हता, तर नेपी मनिषा परब या नावासाठी केला होता. परब हे आमचं आडनाव.

वाव मी जोरानं ओरडलो. आईनं बाबांना मिठीच मारली. हे काय चाललय हे न कळून नेपिनेही या सोफ्यावरुन त्या सोफ्यावर उडी मारली. आईनं त्याला जवळ घेतलं. ती पत्रिका वाचून दाखवली. त्याचा पंजा हातात घेउुन त्याला काँग्रॅट्स म्हणाली. मीही तसचं केलं. बाबांनीही त्याला काँग्रॅट्स केलं. आम्ही तिघांनाही एकच गोष्ट केल्यानं, आपल्यासाठी काही तरी खास घडत नेपिस कळलं. त्यामुळे तो आनंदला. असा आनंदला की तो आमचे गाल चाटून आपल्या भावना व्यक्त करायचा....नेपिनं त्याची कृतज्ञता म्हणा भावना किंवा आनंद म्हणा असा व्यक्त केला. हा दिवस आमच्यासाठी खूप संस्मरणीय ठरला.

०००

आम्ही आमच्या कॉलनीतल्या सर्वांना नामकरण समारंभाची पत्रिका पाठवली. कार्यक्रमाची तयारी सुरु केली. नातेवाईकांनाही पत्रिका पाठवल्या. पत्रिका मिळताच आमच्या काकांनी बाबांना फोन करुन विचारलं, हे काय भलतचं. काहींना हा आमचा विक्षिप्तपणा वाटला. काहींना मूर्खपणा. काहींना वेडेपणा. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणाताच. त्याच धर्तीवर व्यक्ती तितक्या प्रतिक्रिया आम्हास मिळाल्या. त्या बहुतेक जवळजवळ समानच होत्या. त्या सर्व आमचा आगावूपणा- अतिशहाणपणा-मूर्खपणा याच्या विशेषणांच्या अवतीभवती फिरणाऱ्या होत्या. (पूर्वार्ध)

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!