महाराज रागावले
महाराज रागावले
सरस्वती ही विद्येची देवता. या देवतेची पूजा म्हणजे केवळ फोटोला नमस्कार करणं वा मूर्तिला नमस्कार करणं नव्हे. विद्यार्थ्यांसाठी विद्देची देवता म्हणजे त्यांची पुस्तकं. त्याची पूजा करायची म्हणजे त्यांना वर्षभर नीट सांभाळायचं, पुस्तकांची पान फाटू द्यायची नाहीत. पुस्तकांवर घाण करायची नाही. उगाच रेषा ओढायच्या नाहीत. पेनाचा तर अजिबात उपयोग करायचा नाही. वर्षाच्या सुरुवातीला पुस्तक जसं छान असतं दिसतं तसच ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तरच धडा वाचताना प्रसन्न वाटतं. लक्षात ठेवायला सुध्दा सोपं जातं. शिवाय असं चांगल्या स्थितीतलं पुस्तक पुढच्या वर्षी एखाद्या गरजू विद्यार्थ्याला सुध्दा वापरता येऊ शकतं. असं शाळा सुरु झाली तेव्हाच तेजोमयीच्या पप्पांनी तिला हा उपदेश केला होता.
गेल्या वर्षी ज्याप्रकारे तिने पुस्तक रंगवले होते ते बघून त्यांनी प्रांरभीच सांगितलं होतं की यंदा टेक्स्ट बुकांवर पेन्सिल वा पेनने लिहायचं नाही,रेषा ओढायच्या नाहीत. तेजोमयीने ते कबूल केलं. पप्पांनी तिला शाबासकी दिली. शाळा नियमित सुरु झाली. एके दिवशी तेजोमयी अभ्यास करत असताना पप्पांनी डोकावून बघितलं. इतिहासाचा धडा ती वाचत होती. पप्पा जवळ आल्याबरोबर तेजोमयीनं पुस्तक बंद केले. पप्पांना संशय आला. त्यांनी ते पुस्तक उघडलं. बघतात तर काय,सर्व वाक्यांखाली पेन्सिलनं रेषा ओढलेल्या. काही ठिकाणी बॉलपेन सुध्दा वापरलेली दिसत होती. पेन्सिलच्या टोकामुळे काही पृष्ठ फाटले होते. तर शाई पसरल्यामुळे काही शब्दच दिसेनासे झाले होते. या रेषांमुळे आणि पेनच्या शाईमुळे पुस्तकाचा उकिरडा झाल्यासारखा वाटत होता. पप्पांना खूप राग आला. तेजोमयीच्या थोबाडित एक ठेऊन द्यावी असं त्यांना वाटलं. पण त्यांनी तसं काही केलं नाही. त्यांनी ते पुस्तक तिच्याकडे परत केलं आणि काहीही न बोलता ते बैठकिच्या खोलित निघून गेले.
0000
पप्पा रागावले नाहीत हा तेजोमयीसाठी धक्का होता. याची तिला भीती वाटली. पप्पांनी सॉरी सुध्दा म्हणण्याची संधी दिली नाही. त्यांच्या गळयात हात घालून लाडिकपणे सॉरी म्हंटल की त्यांचा राग जातो. हे तिला माहीत होतं. ते रागावलेच नाही तर आता सॉरी कसं म्हणणार. सॉरी म्हणायला जायचो नि स्फोट व्हायचा.
पप्पा त्या दिवशी तिच्याशी काहीच बोलेले नाहीत. तेजोमयीनेही त्यांच्या डोळयाला डोळा भिडविण्याची हिंमत केली नाही. खाली मान घालूनच ती जेवली. त्यांना गूडनाईट न करताच झोपी गेली. पप्पा कां रागवले नसावेत हाच विचार तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. या विचारात असतानाच तिला झोप कधी लागली हे कळलं नाही. कसल्या तरी आवाजाने तिला जाग आली. समोर बघते तो काय साक्षात शिवाजी महाराज..
000
तेजोमयी घाईघाईने उठली आणि तिने महाराजांना कुर्निसात केला. महाराज फार रागावलेले दिसत होते. त्यांनी तेजोमयीला ताठ उभे राहायला सांगितलं. तेजोमयीनं वर बघितलं. महाराजांच्या हातात तलावरीच्या ऐवजी छडी होती. त्या अवघडलेल्या स्थितितही तिला थोडं बरं वाटलं. तलवार कुठं गेली असं महाराजांना विचारावं असं तिला वाटलं.. पण महाराज आधीच रागावले दिसत होते,आणखी रागावले तर..असं तेजोमयीला वाटलं नि तिने आपला प्रश्न ओठापर्यंत येऊ दिला नाही.
काय विचारणार होतीस तू..महाराजांनीच तिच्या चेहऱ्यवारचे भाव बघून विचारलं..
क क काय काहीच नाही हो महाराज.. ती उत्तरली.
मनात आलेले प्रश्न न विचारणं म्हणजे मूर्खपणा ठरतो..तुला तुझे शिक्षक हे सांगत नाहीत का..
सांगतात ना..तेजोमयी कशीबशी बोलली.म्हणाली.. ़
मग तुझ्या मनात आलेला प्रश्न कां लपवून ठेवतेस..
मला भी भीती वाटते महाराज..
कशाची भीती..चल विचार प्रश्न..
त त म्हणजे तुमच्या हाती तलवार कां नाही असं माझ्या मनात आलं होत.
सध्या तलावरीची नाही छडीची गरज असल्यानं तलावर महाली ठेऊन आलो. समजलं.
समजल..तेजोमयी त त प प करत म्हणाली..
तर मग चल आपला हात समोर कर. महाराज करडया आवाजात म्हणाले. महाराज आता आपल्याला छडीचा मार देणार हे तेजोमयीने ताडलं. पण कशासाठी..हा प्रश्न तिचा मनाला पडला. मात्र हा प्रश्न विचाराण्याची हिंमत तिला होईना.
तिने भीत भीत हात समोर केला. डोळे मिटून घेतले. महाराजांनी छडी उगारली आणि हवेत फिरवली. त्या छडीचं रुपांतर पुस्तकात झालं. महाराजांनी तिला डोळे उघडण्यास सांगितलं. अद्यापपावेतो महाराजांनी छडी कां लगावली नाही,याविचारात असतानाच महाराजांचा आवाज ऐकून तिने डोळे उघडले. महाराजांच्या हातात छडी नसल्याचं बघून तेजोमयीला हायसं वाटलं. तिने भीत भीत महाराजांकडे बघितलं. महाराजांनी तिच्या हातात पुस्तक ठेवलं आणि म्हणाले,
उघड आता. तेजोमयीने पहिलं पान उघडलं. त्यावर सुवाच्च अक्षरात लिहिलं होतं श्रीमंत शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. वर्ग एक.
पुढे बघ. महाराज म्हणाले. तेजोमयीने सगळं पुस्तक बघितलं. पुस्तक चकचकित होतं.
चारशे वर्ष झालीत हे पुस्तक जशाच्या तसं आहे.
चारशे वर्ष? तेजोमयीने आश्चर्यानं तोंड फाकलं.
आणि तुझे हे पुस्तक बघ. तेजोमयीच्या इतिहासाच्या पुस्तकाकडे बोट दाखवत महाराज म्हणाले. शाळा सुरु झाल्यानंतर चाळीस दिवसात पुस्तकाची वाट लावलीस. जिजाऊ माँसाहेबांनी शाळेच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं की पुस्तक म्हणजे गुरु. त्याचा आदर ठेवा. तरच गुरु प्रसन्न होईल, नाहीतर आयुष्यभर रडत बसाल. ते मी ध्यानात ठेवलं.मात्र तुझे पप्पा सांगतात ते तुला पकावगिरी वाटते..काय..
न ना नाही महाराज चुकलं माझं...
असं खोटं आश्वासन देऊ नकोस. खोटं बोललेलं जरा सुध्दा खपत नाही. सकाळी पप्पांची क्षमा माग नि यापुढे पुस्तकांचा उकिरडा केलास तर शाहिस्तेखानाला इकडे पाठवून देईन..तो कसा दुष्ट आहे हे तुझ्या इतिहासाच्या धडयात आलच आहे..समजल.. मी छडी घेऊन आलो होतो.तो थेट तलवारच घेऊन येईल.
स..म..ज..लं असं कसंबस त त प प करत तेजोमयी म्हणाली. एवढया वेळात महाराज इतिहासाच्या पुस्तकात निघून गेले होते. तेजोमयीनं डोळे उघडले. महाराज स्वप्नात आल्याचं तिने ओळखलं. पण पहाटेची स्वप्न खरी ठरतात असं कुठेतरी वाचल्याचं तिला आठवलं. महाराज म्हणाले त्याप्रमाणे शाहिस्तेखान खरोखरच तलावार घेऊन आला तर..या विचाराने तिला दरदरुन घाम फुटला. आता सकाळी उठल्याबरोबर इतिहासाच्या पुस्तकात जेवढं शक्य असेल तितक खोडरबरनं काळजीपूर्वक मिटवायचं नि यापुढे कोणतच पुस्तक रंगवायच नाही असा मनोमन निर्धार करुन ती झोपी गेली..
.jpg)
Comments
Post a Comment