स्मार्ट वाढदिवस!


 स्मार्ट वाढदिवस!

कैवल्याचा दहावा वाढदिवस जोरात साजरा झाला. त्याच्या आईबाबांनी हा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरीच छान पार्टी ठेवली. सगळं घर फुग्यांनी आणि फुलांनी सकाळी सकाळीच सजवलं. कैवल्याच्या सर्व मित्रांना त्याने वाढदिवस पार्टीसाठी बोलावलं.
पार्टी दणक्यात झाली. दोन प्रकारचे केक, दोन प्रकारचे आईसक्रिम आणि गरम गरम समोसे, अहाहा! असा सारा थाट. कैवल्य, कधी केक कापतो नि आपल्याला कधी या पदार्थावर ताव मारायला मिळते याची वाटच मुलं बघत होती. एकदाचं हॅप्पी बर्थ डे झालं. कैवल्यने त्याच्या नावासह असलेलं एक गाणं युट्यूबर शोधून ठेवलं होतं. ते वाजवलं. याला बुवा हे फार मस्त जमतं, असं कौतुक जमलेल्या सर्वांनी केलं. कैवल्यच्या आईबाबांच्या डोळ्यातून कौतुक ओसंडून वाहू लागलं. आजीने त्याची लगेच नरज काढली. आजोबा म्हणाले, असा हुषार मुलगा मी बघितलाच नाही आमच्या नात्यांमध्ये. या कौतुकाने कैवल्यची छाती फुगली.
खाणंपिणं दणक्यात झालं. मुलं खेळण्यात दंग झाली. ज्याला हवं ते ती खेळू लागली. त्यांच्या खेळाच्या भाषेत बोलू लागली. मुलं त्यांच्या राज्यात रममाण झाल्यावर त्याचे आईबाबा कैवल्याच्या आईबाबांशी गप्पा टप्पा करण्यात गुंग झाली. बघता बघता दोन तास कसे निघून गेलं हे कळलं नाही.
रात्रीचे दहा वाजले तरी मुलं काही खेळ आटोपण्याचं नाव घेईनात. उलट त्यांचा दंगा आणि त्यांचं ओरडण वाढलच होतं. कैवल्यसह सगळे जण अजूनही जोमातच होते. हा गोंगाट नंतर इतका वाढला की कैवल्यचे आजोबा मुलांना रागावलेच, बस झालं, पुरे झालं आता. असं नाराजी व्यक्त करत म्हणाले.
पण आजोबा...कैवल्य त्यांच्याकडे बघत म्हणाला. आज माझा वाढदिवस आहे ना. मग मला मनासारखं करुन द्या, खेळू द्या की...
अरे, दोन तासापासून तू तुझ्यामनासारखं करत आहेस ना... आजी त्याला समजावत म्हणाली. कैवल्यचे आईबाबाही त्याला म्हणाले, पुरे झालं आता. उद्या खेळा. आजी आजोबा आणि आईबाबांच्या समजवण्याचा कैवल्याला राग आला. वाढदिवसासाठी खास आलेल्या शेजारच्या काका कांकूकडे बघत म्हणाला, हे काका काकू इतका वेळ बसलेतच की इथे. असं वाटतय, त्यांचाच वाढदिवस आहे की काय?
एखादी वस्तू डोक्यावर आदळावी, तसं हे कैवल्यचे बोल ऐकून बाजूचे काका-काकूंना वाटलं. ते चकित सुध्दा झाले.
कैवल्यच्या आईबाबांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. आजीआजोबांना काय बोलावं ते कळेना. काही क्षण शांततेच गेले.
फारच स्मार्ट असतात हो आजची मुलं, बाजूचे काका हसत म्हणाले.
कसं सुचत त्यांना असं तत्काळ प्रतिक्रिया देणं,कोण जाणे? काकू म्हणाल्या.
आहेच हो आमचा कैवल्य स्मार्ट, हुषार, चुणचुणित त्याचे आईबाबा पुन्हा त्याच्या कौतुकाचं गाणं गायला लागले.
मोठ्यांशी कसं बोलायचं, वागायचं हे न सांगता, कैवल्याच्या स्मार्ट वागण्याचं हे कौतुक बघून बाजूचे काका-काकू थक्कच झाले. आता फार काही इथे बसण्यात अर्थ नाही हे त्यांच्या लक्षात आलं. ते जाऊ लागताच, कैवल्यच्या आईबाबांनी त्यांना बसण्याचा आग्रह केला .
काकू हसत हसत म्हणाल्या, अगं नको, पुरे झालं नाही तर हा कैवल्य म्हणायचा, पुढच्या वर्षीच्या माझ्या वाढदिवसापर्यंत थांबता की काय?
कैवल्यचे आजी आजोबा, आईबाबा हसले. आपल्या स्मार्ट मुलाचं हे कौतुकं त्यांना सुखावून गेल्याचं त्याच्या नजरेतून दिसू लागलं.
सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!