पांढरेश्वराची युक्ती !


 

पांढरेश्वराची युक्ती !

जंगलात एका टोकाला कावळ्यांचं राज्य आणि दुसऱ्या टोकाला घुबडांचं राज्य होतं. घुबडाच्या राज्याचा कावळयांच्या राज्यावर डोळा होता. सर्व कावळयांना मारुन आपण त्यांचं राज्य आपल्या राज्यात मिळवलं पाहिजे, असं एकदा घुबडेश्वर राजाने दरबाऱ्यांना सांगितलं. सर्व दरबाऱ्यांनी यास होकार दिला.

पण, समस्त कावळ्यांना मारुन टाकण्याऐवजी आपण त्यांना या जंगलातून हाकलून लावलेलं बरं. त्यामुळे त्यांच्या हत्येचं पाप आपल्याला लागणार नाही आणि त्यांचं राज्यही आपल्याला मिळेल. सर्वात ज्येष्ठ दरबारी सोमपंत घुबड, घुबडेश्वरांना म्हणाला. त्यांना हे म्हणणं पटलं.

जंगल खाली करुन देण्याचा निरोप आधी पाठवू आणि कावळ्यांनी हे मान्य नाही केलं तर मग युध्द करुन त्यांना हाकलून लावू असं घुबडेश्वरांनी घोषित केलं. त्यांचा निरोप कावळयांचे राजे कावळेश्वर यांच्यापर्यंत पोहचवण्यात आला. हा निरोप आल्यावर कावळेश्वरांनी विशेष दरबार  बोलवला. त्यांनी घुबड राजाचा निरोप दरबाराला सांगितला. आता काय करायला हवं असा सल्ला दरबाऱ्यांना विचारला.

घुबडांपुढे आपला निघाव लागणार नाही याची दरबाऱ्यांना जाणीव होती. त्यामुळे जंगल सोडून जावं असं सगळ्या दरबाऱ्यांचं म्हणनं पडलं. पण  दरबारातील पांढरेश्वर कावळयाने यास विरोध केला.

तो म्हणाला, असं सहजासहजी आपण शरणागती पत्करु नये. त्यांच्याकडे शक्ती असेल तर आपण युक्ती वापरुया. महाराज मला एक संधी द्या. मी घुबडेश्वराकडे जाऊन त्यांचा खतमा कसा करता येईल, याचा अदमास घेतो. पांढरेश्वराने परवानगी मागितली. पांढरेश्वर वेडा झाल्याची खात्री इतरांना पटली.

पण कावळेश्वर महाराज म्हणाले, याला आपण संधी देऊ या. हा जे काही बोलला ते त्याने खरे करुन दाखवलं तर मी, त्याला राजाचा मुख्य प्रधान करीन आणि आपली मुलगीही त्यास देईन.

पण महाराज माझी एक अट आहे.. पांढरेश्वर म्हणाला.

कोणती अट ? तुम्ही खोटं खोटं आपलं जंगल खाली करुन काही दिवसांसाठी बाहेर कुठे तरी राहा. बाकीचं मी बघून घेतो.

कावळेश्वर महाराजांनी पांढरेश्वरांचं म्हणनं मान्य केलं. ते आणि इतर प्रजाजन काही दिवसासाठी जंगल सोडून निघून गेले.

पांढरेश्वर, मग घुबडेश्वर महाराजांकडे गेला आणि आपण कसं सर्व कावळयांना जंगल सोडून जायला भाग पाडलं, हे तिखटमीठ लावून सांगितलं. पांढरेश्वर खरं बोलतो की खोटं बोलतो हे तपासण्यासाठी घुबडेश्वर महाराजांनी एक खास दूत कावळयांच्या राज्यात पाठवला. कावळयाच्या राज्यात एकही कावळा नसल्याचे दुताने माहिती आणली. पांढरेश्वर कावळा हा फार चतुर आणि बुध्दीमान असल्याचं वाटून घुबडेश्वर महाराजांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यांनी, पांढरेश्वराला मुख्य प्रधान केला. शत्रुपक्षातील व्यक्तिला असं मोठं पद देऊ नका असं काही वयस्क दरबाऱ्यांनी घुबडेश्वर महाराजांना समजावलं. पण त्यांनी कुणाचंही ऐकले नाही.

काही दिवसाताच पांढरेश्वराने घुबडेश्वरांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या सल्ल्यानुसार घुबडेश्वर राज्यकारभार करु लागला.

एकदा पांढरेश्वराने, वाघ राहत असलेल्या जंगलातील ठिकाणी घुबडेश्वर महाराजांना नेलं आणि त्यांना सांगितलं की इथे हा वाघ एकटाच राहतो. त्यामुळे तो जमिनीवरचा राजा. तो झाडावर काही चढू शकत नाही. त्यामुळे या जंगलातील झाडं आणि त्यावरील आकाशाचे आपणच राजे. घुबडेश्वर महाराजांना पांढरेश्वराचं म्हणणं पटलं. आता तो वाघाच्या जंगलातील झाडांवर राहू लागला.

वाघाला झाडावर चढता येत नाही. हे खोटंच पांढरेश्वराने  घुबडेश्वरास सांगितलं होतं. प्रत्यक्षात वाघ त्याच्या तीक्ष्ण नखांच्या मदतीनं झाडावर चढू शकतो. एके दिवशी शिकार करुन आल्यावर वाघाला झाडावर जाऊन झोपण्याची हुक्की आली. तो झाडावर चढू लागला. तेव्हा त्याला झाडाच्या ढोलीत झोपलेला घुबडेश्वर दिसला. वाघाने ढोलीत पंजा काढून त्याला बाहेर काढलं. वाघाच्या तीक्ष्ण नखांनी घुबडेश्वर अर्धमेलाच झाला. त्या अर्धमेल्या घुबडासह वाघाने खाली उडी मारली आणि घुबडाची मुंडकी पिरगळली. मिटक्या मारत खाल्ली. वाघाने घुबेडेश्वर महाराजाला ठार केल्याची बातमी घुबडांमध्ये पसरली आणि ते घाबरुन त्यांचं राज्य सोडून इकडेतिकडे पळून गेले.

पांढरेश्वर, मग कावळेश्वराकडे गेला आणि त्याने आपला पराक्रम त्याच्या कानावर टाकला. कावळेश्वरांनी खूष होऊन आपल्या कन्येसोबत त्याचं लग्न लावून दिलं. घुबडाचं राज्यही त्याला दिलं. पण पांढरेश्वरानं ते राज्य घेण्यास नकार दिला. तो घुबड राणीसरकारांकडे गेला आणि त्याने ते राज्य त्यांना परत केलं. त्यांना तो म्हणाला,

महाराणी, महाराजांनी उगाचच आमचं राज्य ताब्यात घेण्याचा अट्टाहास केला. तुम्ही तुमच्या राज्यात खुष होतात, आम्ही आमच्या राज्यात खुष होतो. त्यांनी दुष्टपणा केला नसता तर ही वेळ आली नसती. आम्हाला तुमचं राज्य नको. तुम्हीच आनंदाने राज्य करा आणि आमच्या राज्याकडे दुष्टबुध्दीनं बघू नका म्हणजे दोन्ही राज्यातील प्रजाजन नेहमीच सुखी आणि आनंदी राहतील. महाराणींना पांढेश्वराचे म्हणणं पटलं. त्यांनी आपल्या प्रजाजनांकडून यापुढे कावळे व इतर पक्ष्यांच्या राज्यात ढवळाढवळ करायची नाही अशी शपथ घेतली. ही शपथ आजतागायत पाळली जात आहे. कावळे त्यांच्या राज्यात आणि घुबड त्यांच्या  राज्यात खुष आहेत...

 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!