दुष्टाला शिक्षा मिळतेच!


 

दुष्टाला शिक्षा मिळतेच!

जंगलामध्ये एक आई, मुलगा आणि मुलगी एका झोपडीत राहत. आईचं नाव बयाबाई, मुलीचं नाव बयो तर मुलाचं बारकू. बयो आणि बारकूला वडील नसल्याने बयाबाईस घरची आणि दारची सगळी कामं करावी लागायची. दोन्ही मुलं लहान असल्यानं त्यांना घरी ठेवून तिला कामावर जावं लागायचं.

एके दिवशी बयाबाईने कामावरुन परततना मुलांसाठी खाऊ आणला. आपल्याच धुंदित घराकडे निघालेल्या बयाबाईला वाटेत,  पंटू वाघाने अडवलं. बयाबाईने पंटूला खाऊ दिला. आपली दोन लहान मुलं घरी वाट बघत असल्याने घरी जाऊ देण्यासाठी गयावया करु लागली. पंटूने छद्मीपणे हसून तिच्या जवळचा सर्व खाऊ तर खाल्लाच आणि नंतर बयाबाईलाही मारुन टाकलं. त्याने मोठ्ठी ढेकर दिली.

पंटूचं समाधान अजूनही झालं नव्हतं. बयाबाईने त्याला आपल्या मुलांविषयी सांगितलं होतं. त्याच्या मनात हाव निर्माण झाली. त्या मुलांवरही ताव मारायची ही मस्त संधी असल्याचं वाटून तो बयो आणि बारकू राहत असलेल्या ठिकाणाकडे जाण्यासाठी वळला. शोध घेत घेत तो बयाबाईच्या घरापर्यंत पोहचला. त्याने दार खटखटकलं. अंधार पडला असल्याने, दरवाजा वाजला तेव्हा बयो आणि बारकूस , आईच घरी परतल्याचं वाटलं. त्यांनी दार उघडलं. ते आनंदाने घराबाहेर पळत आले. समोर अगडबंब पंटू वाघाला बघताच ते दोघेही जाम घाबरले. बारकूचे पाय लटपटू लागले. बयोच्या घशाला कोरड पडली. आता करावं तरी काय? दोघांना प्रश्न पडला. ते घाबरुन एकमेकांकडे बघू लागले. अशा कठीण प्रसंगी हातपाय गाळून बसण्याऐवजी थोडं डोकं शांत ठेऊन काही मार्ग निघतो का हे बघायचं असतं, अशी शिकवण बयाबाईने दोन्ही मुलांना दिली होती. या शिकवणुकीचं स्मरण बयोला झालं. तशीही ती थोडी धीट होतीच. ती भ्यालेली असली तरी ती पंटूच्या समोर जाऊन उभी राहिली नि त्याला म्हणाली,

वाघोबा, तू आम्हाला खाणार आहेसच, पण त्याआधी तुला आम्ही एक गुपित सांगतो, ते तू ऐकून घेशील का?

कोणतं गुपित? पंटूने आश्चर्याने विचारले.

तुला हरीण खूप आवडतं, असं आई आम्हाला सांगायची.

बरोबरच आहे. पण यात काय गुपित शेंबडे? पंटू रागाने म्हणाला आणि त्याने आपला पंजा बयोवर उगारला.

बयो त  त प प करु लागली....हे गुपित नाही त   त तर तिकडे झाडावर एक गुपित आहे.

ऐ डोमडे मुली, बडबड बंद कर तुझी...म्हणे गुपित...पंटू रागावून म्हणाला.

घाबरलेली बयो चटदिशी बोलून गेली, आमच्या आईने एका हरणीला त्या झाडावर लपवून ठेवलय.  तिच्यावर उगारलेला पंजा खाली आणत पंटू झाडाकडे बघू लागला.

त्याला मनातून आनंदही झाला. पण तसे न दाखवता तो बयोला म्हणाला, तिथे जर काहीच मिळालं नाही तर याद राखा...

नाही हो वाघोबा, तुम्हाला आम्ही खोटं कां सांगणार? आधी त्या हरणीची मेजवाणी घ्या. आणि मग आमची. आम्ही कुठेही पळून जाणार नाही. तुमच्या एवढया वेगाने आम्हाला पळताही येणार नाही. तुम्ही आम्हास खाल्लं की तुमच्या पोटात आम्हाला आमची आई भेटेल. त्यामुळे तुम्ही आम्हास खायलाच हवं असंच आम्हाला वाटतं.

बयो खरं बोलतेय हे पंटूला पटलं. शिवाय हरीणाचं नाव ऐकून त्याच्या तोंडाला पाणीही सुटलं होतं. बयोनं दाखवलेल्या झाडाकडे पंटू धावत सुटला आणि झाडावर चढू लागला. मोठया कष्टाने तो एका एका फांदीवर चढला. पण त्याला कुठेही हरीण दिसेना. त्यामुळे तो चिडला. सर्वात वरच्या फांदीच्या पाठिमागे हरीणाचं पिल्लू लपलं असल्याचं बयोनं ओरडून सांगितलं. पंटूने शेवटच्या फांदिवर चढण्यासाठी पंजा वर उचलला आणि त्यात त्याचा तोल गेला. उंचावरुन धाडदिशी पडल्याने त्याचे कंबरडे मोडले. त्यामुळे तो धाय मोकलून रडू लागला. जो जसा वागतो त्याला देव तशीच शिक्षा देतो, असं बयो पंटूसमोर येऊन म्हणाली...वाघाने कधीचेच डोळे मिटून घेतले होते. आता आपल्याला असेच इथे पडून राहावे लागेल याची त्याला जाणीव झाली होती....

००००

 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!