जादूचा ब्रश
जादूचा ब्रश
सूर्यनारायण नावाचा मुलगा, अमिरचंद या श्रीमंत
शेतकऱ्याकडे कामास होता. अमिरचंदाच्या गायींना तो चरायला न्यायचा. चारा कापून
आणायचा. घरातलं प्रत्येक काम करायचा. पण अमिरचंद त्याला मजुरी देत नसे.
सूर्यनारायणास तो फक्त कोरडी भाकरी द्यायचा. पण तो यातही आनंदी असायचा. कधी तक्रार
करत नसे. कामात कधी कुचराई करत नसे.
एके दिवशी कामावरुन घरी परत जात असताना
सूर्यनारायणाला, रस्त्याच्या कडेला गोमाजी नावाचा गरीब म्हातारा बेशुध्द पडलेला
दिसला. सूर्यनारायण ताबडतोब त्याच्याकडे धावला. त्याने गोमाजीला पाणी पाजले.
त्याचे डोके मांडीवर घेतले. त्याला तो थोपटू लागला. आपल्या जवळील पंचाने त्याला
हवा देऊ लागला. काही वेळाने गोमाजी शुध्दीवर आला. सूर्यनारायणाने त्याला काय घडलं,
ते सारं काही सांगितलं. गोमाजीला खूप भूक लागली होती. त्याने सूर्यनारायणास भाकरी
मागितली. त्याच्याकडे एकच भाकरी होती. रात्रीच्या जेवणासाठी ती त्याने राखून ठेवली
होती. पण गोमाजीने भाकरी मागताच लगेच त्याने त्याला दिली. गोमाजीने आनंदाने भाकरी
खाल्ली. सूर्यनारायणाने दिललं पाणी पिलं. समानाधानाची ढेकर दिली.
मुलाच्या सेवेने गोमाजी प्रसन्न झाला.
त्याने सूर्यनारायणास एक ब्रश दिला. हा जादूचा ब्रश होता. या ब्रशने जे काही काढशील
ते खरं होईल, पाण्याचं चित्र काढशील तर पाणी तयार होईल, फळांचं चित्र काढशील तर फळ
तयार होईलं असं गोमाजी म्हणाला. सूर्यनारायणास आनंद झाला. त्याने गोमाजीच्या
पायावर डोके ठेऊन आशीर्वाद घेतले. त्याचे आभार मानले. सूर्यनारायणाला आशीर्वाद
देऊन गोमाजी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. सूर्यनारायणही आपल्या घराच्या
दिशेने निघाला .
या जादूच्या ब्रशची ख्याती काही
दिवसांनी अमिरचंदापर्यंत पोहचली. त्याने हा ब्रश एकदा सूर्यनारायणाकडून जबरदस्तीने
हिसकावून घेतला. अमिरचंदाने स्वत:च्या लोभीस्वभावानुसार या ब्रशने सोन्याचा पर्वत
काढला. पण प्रत्यक्षात काहीच तयार झाले नाही.
याचा अमिरचंदाला राग आला. रागाच्या
भरात त्याने तो ब्रश फेकून दिला आणि सूर्यनारायणास अव्दातव्दा बोलू लागला. त्याला
त्याने कामावरुनही काढून टाकले. आपला ब्रश घेऊन सूर्यनारायण तिथून बाहेर पडला.
अमिरचंद हा लोभी व दुष्ट प्रवृत्तीचा होता. तो
गावातील प्रत्येकाला त्रास देई. गरीब शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेई. त्याच्यापुढे
कुणाचच काही चालत नसे. आपलं कुणीच वाकडं करु शकत नाही, अशी आता अमिरचंदची खात्री
पटली. तो स्वत:ला गावाचा राजा समजू लागला. त्याच्याकडून लोकांवर अधिक अन्याय होऊ
लागला.
आपल्या लोकांना अमिरचंदाच्या जाचातून
मुक्त करण्याचा निर्धार सूर्यनारायणानं केला. पण त्याला काही सूचत नव्हतं. एके
दिवशी गावातील हनुमानाच्या मंदिरात याचाच विचार करत असताना त्याला गोमाजीने
दिलेल्या ब्रशची आठवण झाली. हा ब्रश आपल्या नक्कीच काम येईल असे त्याला वाटलं. तो
मनात काहीतरी विचार करुन अमिरचंदाकडे जातो.
त्याला बघून अमिरचंद त्याच्यावर ओरडतो,
त्याला शिविगाळ करतो. पुन्हा नोकरीवर ठेवणार नाही असं सांगतो.
मालक मला नोकरी नकोय...सूर्यनारायण
त्याला म्हणाला.
मग कशाला आालास इथे मरायला,
सूर्यनारायणावर अमिरचंद खेकसला.
मालक, तुम्ही गावाचे राजे तर झाला
आहातच, पण तुम्ही आता जगाचे राजे व्हा...सूर्यनारायण अमिरचंकडे बघून मला.
मूर्खा, तुझा बाप बनवणार का मला जगाचा
राजा? त्याच्यावर
पुन्हा ओरडत अमिरचंद म्हणाला.
मालक, माझा बाप नाही पण हा ब्रश नक्कीच
तुम्हाला जगाचा राजा बनवेल...
आता अमिरचंद आणखीनच भडकला. तो आपल्याला
हाकलून देण्याआधी सूर्यनारायणाने ब्रशने, चटदिशी कागदावर सोन्याचे अंडे काढले. ते
प्रत्यक्षात तयार झाले. सूर्यनारायणाने हे अंडे अमिरचंदला दिले.
हे बघून अमिरचंद थक्कच झाला.
याचा अर्थ हा ब्रश तुझंच ऐकतो
म्हणायचा. तो गोड बोलत म्हणाला. मग तुझा ब्रश मला जगाचा राजा बनवेल असं म्हणतोस
तू...
होय मालक...
ते कसं?
तुम्ही माझ्यासमोर गावाच्या बाहेर
चला...सूर्यनारायण म्हणाला.
हा काहीतरी बनवाबनवी करतो असं अमिरचंदला
वाटलं. पण सूर्यनारायणाने त्याच्यासमोर सोन्याचे अंडे तयार केल्याचं त्याने बघितलं
होतं. त्याचा हावरटपणा आणखी जागृत झाला. हे भाव लपवत तो सूर्यनारायणास म्हणाला,
तुझं म्हणणं खोटं ठरलं तर मी तुला डोंगरावरुन ढकलून देईल.
अहो मालक, तशी वेळच येणार नाही.
तुम्हाला जगाचा राजा व्हायचा असेल तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन गावाच्या बाहेर
चला.
हावरट आणि लोभी सूर्यचंद गावाच्या
बाहेर येण्यासाठी तयार झाला. गावाच्या बाहेर मैलोनमैल जमीन होती. सूर्यनारायणाने
ब्रशने कागदावर समुद्र काढला. तिथे प्रत्यक्ष समुद्र तयार झाला. त्याने लगेच एक
जहाजाचे चित्र काढले. समुद्रात जहाज तरंगू लागले. हे बघून अमिरचंद आनंदाने बेभान
झाला.
आपण आता, जगाचे राजे झालोच असं स्वप्नं
त्याला पडू लागलं.
सूर्यनारायण त्याला म्हणाला, मालक या
जहाजात बसा नि निघा जग जिंकायला. आनंदाने बेभान झालेला अमिरचंद जहाजावर चढला. चढता
चढता सूर्यनारायणाला म्हणाला तू इथेच थांब, मी जंग जिंकून आलो की मी तुला माझ्या
राज्याचा प्रधानजी बनवेल...
सूर्यनारायणाने हसत हसत मान डोलावली.
अमिरचंदाचे जहाज जहाज पुढे निघाले... जहाजाने काही अंतर कापल्यावर सूर्यनारायणाने
समुद्रातील वादळाचे चित्र काढले. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचंड वेगाचे वादळ घोंघावू
लागले. या वादळाच्या लपेटित ते जहाज आले. बघता बघता या वादळाने जहाजाला समुद्रात
बुडवून टाकले. लोभी आणि हावरट अमिरचंदाचा शेवट झाला. त्याच्या कर्माचे फळं त्याला
मिळाले.
सर्व गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
सूर्यनारायणाचे आभार मानले. त्याला त्यांनी आपल्या गावाचा प्रमुख केले. हावरटपणा
आणि लोभीपणा या दुर्गुणामुळे कुणाचाही नायनाट होऊ शकतो, हे सूर्यनारायणाच्या
चांगलच लक्षात आलं होतं. त्यामुळे आपल्या जवळील ब्रशचा उपयोग केवळ लोकांच्या
हितासाठीच करण्याचं त्याने मनोमन ठरवलं. तो तसाच वागत राहिला त्यामुळे ब्रशची जादू
कधीच संपली नाही.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment