परोपकराची शक्ती
परोपकराची शक्ती
एकदा वननगरीत खूप दुष्काळ पडला. त्यामुळे पाण्याची प्रचंड टंचाई जाणवू लागली. पशू-पक्षी-झाडं-झुडपं यांचे प्रचंड हाल होऊ लागले. हे हाल कोमल ह्रदयाच्या सुमंत सशाला पाहवत नव्हते. आपण आपल्या वनासाठी काहीतरी केलं पाहिजं असं त्याला सारखं वाटू लागलं. पण काय करायचं, हे मात्र त्याला सूचत नव्हतं.
एके दिवशी याच विचारात गढून गेलेला दु:खीकष्टी सुमंत
ससा आपल्या घरी चालला असताना त्याच्या समोर ईशसेन देवदूत
येऊन उभा ठाकला. त्याने सुमंत सशाला, तो कशामुळे इतका दु:खीकष्टी असल्याचं
विचारलं. सुमंतने अश्रू ढाळत आपल्या वनातल्या दुष्काळाबद्दल ईशसेनला सांगितलं.
सुमंतचं दु:खं ऐकून ईशसेनला
दया आली. त्याने सुमंतला एक जादूची करंडी दिली. त्यात खूप सारी फळं होती. या करंडीतील फळांचा तू
योग्य उपयोग केलास तरच तुझ्या वनावरचं संकट दूर होऊ शकतं, असं ईशसेनाने सुमंतला सांगितलं
आणि तो तिथेच अदृष्य झाला.
सुमंतला तेव्हा खूप भूक
लागली होती. ईशसेनाने दिलेल्या करंडीतील ताजी फळं बघून त्याची भूक आणखीनच वाढली.
करंडीतील सर्व फळं तिथेच खाऊन टाकावी अशी सुमंतला इच्छा झाली पण त्याने इच्छा
आवरली. आपल्यापेक्षा कुणीतरी अधिक भुकेला असू शकतो, त्याला आपण ही फळं देऊ असा
विचार करुन तो घराकडे जाऊ लागला.
वाटेत त्याला सखुबाई ही
जख्ख म्हातारी शेळी भेटली. म्हातारपणामुळे तिला व्यवस्थित चालता येत नव्हतं. तिचं
लक्षं सुमंतकडे असलेल्या करंडीकडे गेलं. ती भुकेने व्याकूळ झाली होती. करंडीतील फळं
बघून सखुबाईने ,सुमंतला फळं देण्याची विनवणी केली. चांगल्या कामासाठी या फळांचा
उपयोग करु, असं स्वत:च्या मनाशी ठरवलेल्या सुमंतने त्याक्षणी कां कोण जाणे, पण
सखुबाईला फळं देण्यास नकार दिला. इवलसं तोंड करुन सखुबाई जाऊ लागली, तोच सुमंतला
स्वत:ची चूक लक्षात आली. आपल्यापेक्षा ही म्हातारी शेळी अधिक भुकेली दिसते. तिला
खायला दिलं नाही तर ती मरुन जाईल, त्यामुळे तिला फळं दयायला हवं असं सुमंत स्वत:लाच
म्हणाला. त्याने परत निघालेल्या सखुबाईला थांबवलं.तिच्या पाया पडला. तिची क्षमा
मागितली. त्याने मोठया प्रेमाने करंडीतील फळं सखुबाईला दिली. तिने सुमंतला आशीर्वाद
दिला.
सुमंत पुढे चालू लागला. वाटेत
त्याला लंगडा काळू गाढव आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे अपंगत्व आलेले प्राणी
दिसले. सुमंतची भूक सारखी वाढत असूनही त्याने प्रत्येकाला करंडीतील फळं दिले. त्यामुळे
शेवटी करंडीत एकच फळ उरले.
ते एक फळ घेऊन तो घरी आला. रस्त्यात
काय घडलं हे त्याने त्याच्या आईबाबांना सांगितलं. दोघांनांही सुमंतचा अभिमान
वाटला. परोपकार करण्याइतका दुसरा चांगला गुण नाही असं त्यांनी त्याला सांगितलं. सुंमतला
आता त्याची भूक अनावर झाली होती. पोटातल्या कावळ्यांची कावकाव खूपच वाढली होती.
त्याच्या आईबाबांनासुध्दा खूप भूक लागली होती. पण करंडीत एकच फळ होते. ते फळ तूच
खा, असं त्याचे आईबाबा त्याला म्हणाले. तो ते खाणार तोच बंटू कुत्रा रडतरडत तिथे
आला. तोही भुकेला होता. त्याला बघून सुमंतच्या ह्रदयाला पाझर फुटून त्याने ते
एकमेव फळ बंटूला दिलं. ते बघून आईबाबा आनंदित झाले. तेवढयात एक चमत्कार घडला. बंटूचं
रुपांतर ईशसेनात झालं. त्याने सुमंतची पाठ थोपटली. स्वत:चा स्वार्थ न बघता तू
इतरांच्या मदतीला धावून गेलास हे बघून खूप खूप आनंद झाला असं त्याने सांगितलं तसेच
कोणताही वर मागण्यास सुचवलं. तेव्हा सुमंतने वनातला दुष्काळ मिटवून टाक,पाणी टंचाई
कमी कर असा वर मागितला. हे ऐकून ईशसेन आनंदी झाला.त्याने वनातला दुष्काळ दूर तर
केलाच शिवाय सुमंतला त्या वनाचा राजाही केला. या वनात कधीही दुष्काळ पडणार नाही
असा वर ईशसेनाने दिला. परोपरकाराची शक्ती किती मोठी असते हे सुमंतने सिध्द केले.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment