मारकेश्वराला धडा !
मारकेश्वराला धडा !
एका तलावात राहणाऱ्या शुभ्रकांती बदक आणि निलावती
मासोळीची मैत्री झाली होती. निलावतीच्या मुला-मुलींना पाठीवर बसवून बदक शुभ्रकांती
इकडेतिकडे घेऊन जात असे. पाण्यात पोहताना काही मासे या शुभ्रकांतीच्या पाठीवर बसत
असत. निलावती आणि शुभ्रकांतीची पिल्लं एकमेकांसोबत छान खेळत. मस्त एकत्र राहत.
एकदा मारकेश्वर मुंगूस तलावाजवळून जात असताना
त्याने बदकाची पिल्लं आणि मासोळीचं पिल्लं पाण्याबाहेर येताना बघितली. त्याच्या
तोंडाला पाणी सुटलं. तो तलावाला लागून असलेल्या झाडाच्या पाठीमागे लपून बसला. पिल्लं
झाडाजवळ येताच त्याने त्यांच्यावर झडप घातली. त्यात शुभ्रकांतीचे एक आणि निलावतीचे
एक पिल्लं सापडली. इतर पिल्लं घाबरुन पाण्यात पळाली. त्यांनी घडलेला प्रसंग आपल्या
आयांना सांगितला.
दोन पिल्लं गेल्याचं खूप दु:ख शुभ्रकांती आणि
निलावतीला झालं होतं. काहीतरी उपाय योजला नाही तर हे असंच चालू राहील आणि मारकेश्वर
मुंगूस आपली पिल्लं खात राहील याची त्या दोघींना खात्री होती. त्या दोघांनी खूप
विचार केला. त्यांना काहीच सुचेना. त्यांची ही काळजी बघून पाण्यातील मिठीबाई मगरीने
काय झालं म्हणून विचारलं. तेव्हा शुभ्रकांती आणि निलावतीने आजची घटना मिठीबाईस सांगितली.
त्या दुष्ट मारेकश्वराला धडा शिकवायलाच हवा,असं ती म्हणाली.
पण कसा? निलावतीने
विचारलं.
मिठीबाई विचार करु लागली. विचार करताकरता ती
म्हणाली,
तुम्ही जर त्या मारकेश्वरास पाण्यापर्यंत आणू
शकला तर, मी त्याचा नायनाट करते.
शुभ्रकांती आणि निलावतीने हा प्रयत्न करुन
बघण्याचे ठरवलं. यात धोका होता. पण संकट टाळण्यासाठी धोका स्वीकारावाच लागतो. त्या
दोघीनी ठरवलं की आपण मारकेश्वराच्या जवळ जायचं. गोड गोड बालून शिताफीने त्याला इथे
पाण्यापर्यंत आणायचं.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शुभ्रकांतीच्या पाठीवर
निलकांती बसली. दोघेही हळूच पाण्याबाहेर आले. मोठे बदक आणि मोठा मासोळी बघून मारकेश्वराच्या
तोंडाला पाण्याची धार लागली. आज मोठी मेजवाणी मिळणार असल्याची खात्री पटून मारकेश्वर
आनंदाने नाचू लागला.
पाठीवर बसलेल्या निलकांतीसोबत शुभ्रकांती हळूहळू मारकेश्वराच्या
दिशेने येऊ लागले. पण मध्येच शुभ्रकांती
मागे वळली. ते बघून मारकेश्वर झाडाच्या पाठिमागून बाहेर आला. वेगाने त्या
दोघांच्या पाठीमागे येऊ लागला. निलकांती बरोबर लक्ष ठेऊन होता. शुभ्रकांतीने
मिठीबाईला इशारा केला. मिठीबाई पाण्याजवळ धानस्थासारखी स्थिर झाली.
पाण्याकडे जात असणारी शुभ्रकांती पुन्हा झरदिशी
वळली. तिची आणि मारकेश्वराची नजरानजर झाली.
अरे वा, इकडे कुठे मारकेश्वरराव तिने विचारले.
कुठे काय, सहजच...मारकेश्वराने उत्तर दिलं.
अरे वा...सहजच आला आहात तर आमच्याकडे या भोजनाला...निलकांती
म्हणाली.
वा वा,
अरे, ही तर जादूच झाली म्हणायची. स्वत:हून मेजवाणी आपल्याकडे चालत आली...खुष
होत, मनातल्या मनात मारकेश्वर पुटपुटला.
मारकेश्वरराव काल तुम्ही आमची पिल्लं खाल्लित ना.
आज जरा वेगळं काहीतरी खा...
काय आहे हे वेगळं...
मारकेश्वराव, एक सापाचं पिल्लू आलंय कालपासून. तुम्हास
फार आवडत असल्याचं, आम्ही ऐकून आहोत...निलकांती म्हणाली.
वा वा,
कां नाही. असं मारकेश्वर म्हणाला. त्याला बोलण्यात गुंतवून ठेवत शुभ्रकांतीने पाण्यापर्यंत
आणले. पाण्याजवळ येताच धानस्थ मिठीबाईने आपला जबडा उघडून त्याला गपदिशी तोंडात
टाकले. मारकेश्वराचा बंदोबस्त झाला. तुम्ही भ्याला असता तर हे शक्य झालं नसतं. न
भीता संकटाचा सामना केला की संकट दूर होऊ शकतं. मिठीबाई म्हणाली .
पण मारकेश्वराने आपल्यावरच हल्ला केला असता तर? निलकांतीने भीती व्यक्त केली.
अगं, मला थोडफार उडता येतं. ते आपल्यापैकी
अनेकांना ठाऊक नाही. मी झरदिशी उडून पुन्हा पाण्यात आले असते. शुभ्रकांती म्हणाली.
शक्ती आणि युक्तीचा वापर प्रसंगानुसार केला की
संकटं दूर होतात, मिठीबाई हसत म्हणाली. शुभ्रकांती आणि निलकांती या दोघीनांही तिचं
म्हणणं पटलं.
.jpg)
Comments
Post a Comment