गणिताची गोडी

गणिताची गोडी

एकेदिवशी तेजोमयीच्या बाबांनी तिला कशा कशाची भीती वाटते, याची यादी तयार करायला सांगितली. बिनचूक यादीसाठी तिच्या आवडीचं चोको आईसक्रीम त्यांनी कबूल केलं. ही यादी यूंव तयार करु आणि आईसक्रीम मिळवू असं वाटून तेजोमयी यादी करायला बसली. आठवून आठवून, भीती वाटणाऱ्या बाबींची तिने नोंद केली. तो कागद बाबांकडे दिला. बाबांनी त्यावर नजर टाकली. तेजोमयीला भीती वाटणारी सर्वात महत्वाचीच गोष्ट राहून गेल्याचं त्यांनी सांगितलं. तेजोमयीनं डोकं कराकरा खाजवलं. अलेक्झांडरकडे बघितलं. तुझं तूच बघ बाई, अशा आशयाची मान हलवत तो बाबांच्या कडेला जिभ लांब करुन बसला.

तेजोमयीने मग, आईला विचारलं. तिचीच भीती तेजोमयीला सर्वाधिक असल्याचं  आईचं म्हणणं पडलं. म्हणूनच बाईसाहेबांना चांगल्या सवयी लागल्याचं सांगायला, ती विसरली नाही.  

बाबांनी, आईचं म्हणणं फेटाळलं. याचा अर्थ आईपेक्षाही भीतीदायक दुसरी गोष्ट आहे तर, तेजोयमी मनात म्हणाली. पण तिला काही आठवेना. शेवटी कंटाळून तिने बाबांनाच विचारलं.

तुझा सर्वात नावडता विषय गणित. बाबा उत्तरले.

अय्या खरचं की, तेजोमयी म्हणाली. ते एकून आईला हसू आलं. आई अशी अवचित कां हसली असावी, हे न कळल्याने अलेक्झांडरने चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणून आईकडे बघितलं. आईने अलेक्झांडरला कुरवाळलं आणि ती आतल्या खोलित निघून गेली.

आई, नुसतीच कां हसली हो  बाबा.

मला  अद्याप न सुटलेलं कोडचं आहे बुवा ते, बाबा स्मित करत हलक्या आवाजात उद्गारले.

 म्हणून तुम्हाला तिची भीती वाटते की काय, तेजोयमी बारीक आवाज करुन मिचक्या डोळ्यांनी म्हणाली. विषय भरकटायला लागल्याचं लक्षात येताच बाबांनी सावध होऊन, गणिताची भीती, या मूळपदावर चर्चा आणली.

पण बाबा, ही भीती घालवायची कशी?

तेजो, असं म्हणतात की, ज्या गोष्टीची आपणास सर्वाधिक भीती वाटते, त्याच्याशी सर्वात आधी भिडायचं.

म्हणजे हो काय..

तुला भीती वाटते म्हणून तू गणिताचा होमवर्क, अभ्यास सर्वात शेवटी करतेस. ते सुध्दा खूप कष्टानं.. तसं न करता, गणिताचा होमवर्क सर्वात आधी करायचा.

त्याने काय होईल.

प्रारंभी खूप कंटाळा येईल, काहीच लक्षात येत नाही म्हणून वैताग येईल. गणित जमत नाही म्हणून नैराश्य येईल. पण वैताग, कंटाळा किंवा नैराश्याला बाजुला सारलं तर हळूहळू गणितातल्या काही बाबी कळू लागतील. त्याचा वेग कमी राहील. सुरुवातीला खूप चुका होतील. पण हळूहळू, आपण समजतो तेव्हढं काही गणित कठीण नाही, सूत्रांमध्ये टाकून आकडेमोड करण्यातही मजा येते, मोठमोठी आकडेवारी करता येते असं लक्षात आलं की मग कंटाळा पळेल. एकदा तो गेला की गणिताचे सिध्दांत, कूट प्रश्न, आकृत्या, पाढे, यात दडलेली गंमत लक्षात येईल.

बाबा, गणिताचं पुस्तक दफ्तरातून काढायचं म्हटलं की काटाच उभा राहतो बघा.

या काट्याचा नायनाट करुन टाकू या ना. म्हणूनच दरवर्षी एप्रिल महिना हा गणिताची गोडी लागावी, गणिताची भीती पळावी यासाठी 1986 सालापासून साजरा होतो.

वाs

वाsव नाही. आता साध डाव. सुट्यांमध्ये एक तास गणिताच्या पुस्तकात घालं डोकं. त्याला सांग, तुला नाही बसू देणार माझ्या डोक्यावर, मीच टाकेन माझ्या डोक्यात तुला.... खेळ म्हणून बघ.. खेळता खेळता गणिताचं कोड असं सुटेल की तू आनंदानं नाचू लागशील...

सुरेश वांदिले

०००

 

z


 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!