प्रश्नांच्या उत्तरात टोळी (भाग एक)


 


प्रश्नांच्या उत्तरात टोळी (भाग एक)

तेजोमयी, कल्याणी, बंटी , अरुण बबलू, सोनू, सुरेश, विनय, श्रीकांत या टोळीला नेहमी खूप प्रश्न पडत असत. प्रश्न पडायलाच हवेत, असं एकदा त्यांना, विज्ञानाच्या सरांनी सांगितलं होतं. प्रश्न जेव्हा पडतात, तेव्हा त्याची उत्तरं शोधण्याची प्रेरणा मिळते, उर्जा मिळते, असंही ते म्हणाले.

विज्ञानसरांचे लाडके विद्यार्थी असल्याने या सर्वांनी, ठरवलं की यापुढे आपणास, हा प्रश्न नाही तर तो प्रश्न असे, सतत प्रश्न पडू द्यायचे. ज्या दिवशी प्रश्न पडला नाही, त्यादिवशी समजायचं की, कुछ तो गडबड है.

असं काहीसं तेजोमयी कल्याणीला म्हणाली.

अगं, पण दररोज प्रश्न पडायला आपण काही सफरचंदाचं झाड नाही ना. की हलवलं नि पडला सफरचंद खाली. कल्याणी म्हणाली.

सफरचंद जर पडला नसता तर, न्युटन सरांना प्रश्न पडला असता का ? सफरचंद झाडावरुन पडला, पण तो वर नाही गेला, तो खाली आला. तो तसा कां आला ? यावर न्युटन सर डोके खाजवत बसले. म्हणून त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तेजोमयी, रवीकडे बघत म्हणाली.

याचा अर्थ असा की, जसं तुम्ही हसायलाच पाहिजे, तसच तुम्हाला प्रश्न सुध्दा पडायला पाहिजे. बंटी म्हणाला.

सतत प्रश्न पडण्याच्या आणि पाडण्याच्या कल्पनेनं भारावून गेलेल्या या टोळीने मग आई-बाबा, शेजारचे काका-काकू, दादा-ताई, आजी-आजोबा, शाळेतील सर-मॅडम यांना प्रश्न विचारण्याचा सपाटाच लावला.

या टोळीच्या प्रश्नप्रेमाने प्रारंभी प्रारंभी भारावून गेलेले आईबाबा ते विज्ञानाचे सर, नंतरच्या काळात भांबावून गेले. या टोळीचे प्रश्न थांबले नाही तर आपणास नक्कीच वेड लागेल, असं विज्ञानाच्या सरांना एके दिवशी, वाटता वाटता राहिलं. त्यांना तसं पूर्ण वाटलं नाही, कारण त्यावेळी ते प्रयोगशाळेत होते. या टोळीच्या प्रश्नांचा मार्ग वेडेपणाकडे नेणारा असल्याचं त्यांना वाटत असताना प्रयोगशाळेच्या भिंतीवर टांगलेल्या न्यूटन, गॅलिलिओ, एडिसन आणि बहुतेक जगदिशचंद्र बोस (कारण या प्रतिमेचे रंग उडून गेले होते.) यांच्या प्रतिमेतून, हे चारही शास्त्रज्ञ बाहेर येतील आणि आपला मेंदू पळवून नेतील अशी भीती त्यांना वाटली. या भीतिने ते थिजून गेले. इकडे आड आणि तिकडे विहीर, या म्हणीचा खरा- नेमका अर्थ त्यांना इतक्या वर्षात पहिल्यांदाच कळला होता.

आई- बाबा, शेजारी पाजारी यांना तर या टोळींचे प्रश्न समोर येताच एखादे अग्निबाण किंवा क्षेपणास्त्र अंगावर आदळल्यासारखे वाटत असे. टोळीतील एका पालकाने तर सिक्सरच मारला. टोळीतील एकाने त्याच्या बाबांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी, आधी उत्तर तुम्हीच सांगा आणि नंतर प्रश्न विचारा असा सल्ला दिला तेव्हा हसावं, रडावं की प्रश्नच पाडणं सोडावं असं त्याला आणि टोळीतील इतर सर्वांना वाटून गेलं. पण काहीही झालं तरी म्हणजेच सूर्याने पश्चिम दिशेकडून उगवायला सुरुवात केली किंवा कोकिळेऐवजी कावळ्याने गायला सुरुवात केली तरी प्रश्न विचारायचं सोडायचच नाही, असा निर्धार टोळीने केला होता.

या निर्धारामुळे ही टोळी कॉलनीतील सर्वांना आणि शाळेत शिक्षकांना एखाद्या टेररिस्ट म्हणजेच दहशतवाद्यांसारखी भासू लागू लागली. ही टोळी दिसली की सर मंडळी आणि कॉलनीत वडीलधारी ते दादा-ताई श्रेणीतील मंडळींपैकी कुणी तोंड फिरवायला लागली तर कुणी तोंड वाकडं करायला लागली. तर काही जणांनी, चला इथून तोंड काळं करा, एवढच म्हणण्याचं शिल्लक ठेवलं

असं कां बरं करतात रे ही मंडळी, रवीनं अरुणला विचारलं.

अरे, यांना प्रश्नांची भीती वाटत असली पाहिजे. अरुण म्हणाला.

अरे, प्रश्न म्हणजे काही भूत किंवा राक्षस किंवा मग दैत्य नव्हे ना..

अरे, यांना आपल्या प्रश्नात नक्कीच भूत दिसत असावा म्हणूनच आपण दिसलो की भागो भूत आया, अशी त्यांची अवस्था होत असावी..

हा...हा...हा

यात हसण्यासारखं काय आहे, बुवा...

अरे, यांना खरोखरच भूत दिसला तर..

तर काय...

जाऊ दे पुढचं बोलू नकोस, समझदारोंके लिए इशाराही काफी है..

मला हे कळत नाही की यांना जर प्रश्नांची इतकी भीती वाटत असेल तर यांनी परीक्षा कशा उत्तीर्ण केल्या असतील ?

ही सर्व मंडळी कॉपीबहाद्दर असली पाहिजेत...

काहीतरीच काय हे भलतं सलतं, आपले पालक आणि आपले सर, हे सज्जन आहेत. ते कॉफीप्रेमी आहेत. मात्र कॉपी म्हणजे काय हे त्यांना नक्कीच माहीत नसावं. तेजोमयी कल्याणीला म्हणाली. कॉपीचा मुद्दा हा सर्वांसाठी घातक असल्याचं टोळीच्या लक्षात आलं. तेव्हा विनय म्हणाला,

ही मंडळी परीक्षा पास झाली कारण, त्यांनी फक्त पाठांतर केलं, असावं...

म्हणजे घोकनपट्टीच ना...

अगदी बरोबर....

जी मंडळी घोकनपट्टी करतात त्यांना केवळ उत्तरं दिसतात. दिसलेली उत्तरं या मंडळींनी पेपरमध्ये उतरवली असावीत.

बर झालं बुवा, आपण कुणीच पाठ करत नाही ते. विनय म्हणाला..

आईनस्टाइन कुठे पाठ करत होते. तेजामयीनं माहिती पुरवली.

त्यामुळेच तर ते वर्गात मागे पडत. त्यांना गुणही फार मिळत नसे, असं मी कुठेतरी परवाच वाचलं, प्रदीपने सांगितलं.

एडिसन सुध्दा शाळेत असे-तसेच होते. पण त्यांना खूप प्रश्न पडायचे. या प्रश्न पडण्यापाडण्यातून त्यांनी शंभर शोध लावले. पिंकूनेही त्याच्या जवळची माहिती शेअर केली.

या सर्वांचा अर्थ असा की, आपण आईनस्टाईन आणि एडिसनसारखे पाठांतर करत नाही, शिवाय आपणास प्रश्नही पडतात, म्हणजेच आपणसुध्दा असंख्य शोध लावू शकतो....तेजोमयीनं तर्क मांडला..

शोध लावण्यासाठी बुध्दी लागते, मॅडम, ती आहे का तुमच्याकडे. कल्याणीने तेजोमयीला टोमणा मारत विचारलं.

शोध लावण्यासाठी लागते रे, पण प्रश्न विचारायला कुठे बुध्दी लागते. रवी हा हा हा करत बोलता झाला.

असं आपण आपसातच कशासाठी, तू तू मै मै करायला लागलो. थांबा आता. आपल्या प्रश्नांपासून दूर पळणाऱ्यांना आपण धडा शिकवला पाहिजे.

काय धडा शिकवणार रे ठोंब्या. अरे सरांना धडा शिकवायला गेलो तर ते शाळेतून हाकलून लावतील. घरच्यांना धडा शिकवायला गेलो तर आपली कोरी पाटी काळी करतील.

मग आता काय करायचं ? प्रश्न तर पडलेच पाहिजेत, प्रश्न तर विचारलेच पाहिजेत. ते थांबवून कसं चालेल.

आपण गुगल बाबांना शरण गेलो तर.. त्याला म्हणे सगळया प्रश्नांची उत्तरं ठाऊक असतात.

पण त्याने चुकीची उत्तरं दिली तर...

तो कशाला चुकीची उत्तर देईल...

कुणी सांगावं ? गुगलबाबा एक आहे का दोन आहे का तीन आहे, हे कुणाला माहिताय. गुगलत जाणं म्हणजे माहीत नसलेल्या पण आभासी रस्त्यावर धावणं नाही कां ?

ऐ भोंगाडया, असं फालतू, न समजणारं आणि डोक्यात न शिरणारं काही बोलू नकोस. असं बोललं की आपण तिस्मारखान होत नाही. कल्याणी विनयला म्हणाली.

कोण हा तिस्मारखान ? तेजोयमीनं प्रश्न विचारला.

चला म्हणजे, तेजूला प्रश्न पडून आपण पुन्हा मूळ मार्गावर आलो तर...बंटी म्हणाला,

प्रश्न असेच हवेत की त्यात अर्थ असेल. प्रश्नात अर्थ नसेल तर मग मजाच येणार नाही..

अरे, तू असं कोड्यात आणि आडवळणारं जाणारं बोलू नकोस ना यार, स्पष्ट स्पष्ट सांग. विनयनं विचारलं.

म्हणजे असं की, आपण विचारलेल्या प्रश्नासाठी, मिळणाऱ्या उत्तरानं आपलं ज्ञान वाढलं पाहिजे. नवं काहीतरी ऐकायला मिळालं पाहिजे. आपला वेळही फुकट गेला नाही पाहिजे. मेंदू तरतरीत झाला पाहिजे.

आपले प्रश्न तर असेच असतात ना. तरी सुध्दा सर-मंडळी आणि आपले आई-बाबा कां बरं त्यापासून पळ काढतात ?

आला का तोच प्रश्न पुन्हा..

आपण की नाही, या सर्व ज्येष्ठ मंडळींची यासाठी शिकवणीच घेतली पाहिजे. त्यांना प्रश्नांचं महत्व समजावून दिलं पाहिजे.

अरे, असं काहीबाही बोलू नकोस. म्हणे ज्येष्ठांची शिकवणी घेतली पाहिजे. सरांच्या हातच्या दोन छडया, बाबांचं कान पिरगाळणं  आणि शेजारच्या काकूंच्या शिव्या वाटेला येईल तेव्हा कळेल..

होय गड्या, हे सारं सारं खरं, पण मग आपल्या मूळ प्रश्नाचं काय..

तो तर अनिर्णितच राहतो.

मित्रांनो, घाबरु नका, हिम्मत सोडू नका. निराश होऊ नका, कारण जिथे प्रश्न, तिथे उत्तर असणारच, असं कुणीतरी कुणालातरी नक्कीच म्हणालं असणार...श्रीकांत मस्तपैकी अभिनय करत म्हणाला..

शिक्या, नाटकीपणा पुरे झाला. तुला जर उत्तर ठाऊक असेल तर सांगून टाकना, कशाला सगळयांचा जीव टांगणीला लावतोस....

मला, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं वाटतं. पण मी ते आता नाही सांगणार..उद्या शाळेत गेल्यावरच, भर दुपारी सूर्यमहाराजांना साक्षी ठेऊन, मी तुमची उत्सुकता पूर्ण करायचं ठरवलय. श्रीकांत पुन्हा नाटकी अभिनय करत म्हणाला...

आँ.. एका सुरात टोळी उद्गारली...

होय होय, आज रात्रभर धीर धरा.. कारण धिरज का फल मिठाही होता है, असं आपण कालच नाही का हिंदीच्या वर्गात शिकलो. श्रीकांत पुन्हा तसच नाटकीपणाने म्हणाला. त्याला मनवणं कठीण असल्याचं टोळीत सर्वांना ठाऊक असल्यानं सारेच जण गप्प बसले...(अपूर्ण)

०००

 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!