जखम


 


जखम

    1

    दर शनिवारी हनुमानजी आणि शनिमंदिराला भेट देण्याचा तेजोमयी आणि बाप्पांचा शिरस्ता. इतक्या वर्षात त्यात काही खंड पडला नाही. आता ही परवाची गोष्ट. शनीदेवांना मनोभावे नमस्कार केल्यानंतर बाप्पा आणि तेजोमयीने शनीदेवांभोवती परिक्रमा केली. 

    शनीदेवांच्या पाठीमागे एक वडाचं झाड आहे. प्रत्येक वेळी बाप्पाचं त्या झाडाकडं लक्ष जायचं. तजोमयीचं लक्ष त्या झाडाकडे वळवून तिला काहीतरी सांगायचं, असं प्रत्येक परिक्रमेच्या वेळेस बाप्पा ठरवत. पण ते नंतर विसरुन जात. आज मात्र त्यांनी काहीही झालं तरी विसरायचं नाही , हे त्यांनी पक्क ठरवलं.

  शनिदेवांभोवतीची परिक्रमा संपल्यावर बाप्पांनी तेजोमयीचं लक्ष झाडाकडे वेधलं. बाप्पांनी तिला बुंधा काळजीपूर्वक बघण्यास सांगितलं..तेजोमयी झाडाजवळ गेली तेव्हा गुडघ्याला जखम झाल्यावर जसा गुडघा दिसतो, तसा तो बुंधा दिसत होता.

  000

    शनीदेवांना नमस्कार करुन बाप्पा आणि तेजोमयी मंदिराच्या पारावर बसले. बाप्पांनी तेजोमयीचं लक्ष पुन्हा झाडाच्या बुंध्याकडे वळवलं.   

  बाप्पा, या झाडाच्या बुंध्याला ही अशी जखम कां बरी झाली असेल. आपल्या गुडघ्याला जखम होते, तेव्हा किती त्रास होतो , वेदना होतात, नाही का... तशाच वेदना या झाडालाही होत असणारच.

  होणारच ना गं. पण हे भक्तमंडळींना कळायला नको का..

  कां बरं...

    अगं, झाडाच्या बुंध्याला भक्तांमुळेच जखम झाली आहे.

  ती कशी काय, बाप्पा...

  अगं, शनीदेवांच्या दर्शनाला आलेली भक्त मंडळीची भक्ती केवळ शनिदेवांना नमस्कार करुन संपत नाही. बरेच भक्त शनिदेवांना तेलाची भेट चढवतात. त्याच्या मूर्तिवर तेल ओततात. उरलेलं तेल या झाडावर शिंपडतात. या बुंध्याच्या अवतीभवती बऱ्याच फटी आणि भोकं आहेत, तिथेच अगरबत्ती लावतात.असं सातत्यानं होत असल्यानं छोटीशी अगरबत्ती आता आपला प्रताप दाखवू लागलीय..

    म्हणजे हो बाप्पा..

    अगं, झाडाचा काही भाग जळू लागलाय. त्याच्यावर पडलेल्या तेलामुळे अगरबत्तीतून पडणारी गरम राख झाडाला हळूहळू इजा पोहचवत आहे. अगरबत्तीचा गूल संपला की काही क्षण शेवटी काडी नुसतीच धुमसत राहते ,त्यामुळेही झाडाला जखम होते. पण भक्तमंडळींच्या हे काही लक्षात येतच नाही. झाडाला अगरबत्ती लावण्याचा त्यांचा अट्टाहास अनाकलनीय आहे.  या अट्‌टाहासामुळेच या झाडाची जखम पुढेपुढे वाढतच जाईल. त्याचा परिणाम काय होईल माहीत काय तुला तेजोमयी..

  काय होईल बाप्पा,

  अगं एके दिवशी हे डौलदार कोळसा बनेल किंवा मग तुटून पडेल.

    बापरे बाप.

  अगं एक झाडं असं नष्ट होणं म्हणजे, आपल्या पर्यावरणाची आणि परिसराची मोठी हानी ठरते.

  ती कशी काय बाप्पा..

  अगं झाडं आपल्याला प्राणवायू देतात, विषारी कर्बाम्ल वायू शोषून घेतात हे तुला ठाऊकच आहे. झाडं सावली देतात. अनेक पक्षी झाडांवर राहतात. एखादे झाड  नष्ट होते, तेव्हा कित्येक पक्ष्याचं घरटं उद्‌ध्वस्त होतं. प्रदुषण कमी करणाऱ्या आपल्या निर्मळ मित्राला आपण घालवून बसतो.. बाप्पा एका दमात बोलून गेले..त्यांना धाप लागली.तेजोमयीनं त्यांना पाणी दिलं.

    शनीदेवांनीच आता त्याच्या भक्तांना, सुबुध्दी द्यायला हवी, तेजोमयी म्हणाली...

 बाप्पांनी होकारार्थी मान हलवली.

    000

       2

       गप्पा करत करत बाप्पा आणि तेजोमयी यांनी मंदिराचा फेरफटका मारला. मंदिराच्या परीसरात खोब-याचे  तुकडे आणि फुलं इतस्तत: विखुरलेली त्यांना दिसली. बाप्पांनी तेजोमयीचं लक्ष त्याकडे वेधलं.

    भक्तांचं कधीकधी काही कळतच नाही , पुजारी किती प्रेमानं देवाचा प्रसाद म्हणून खोब-याचे तुकडे भक्तांच्या हातात ठेवतो. देवाला वाहिलेली फुले देवाचा आशीर्वाद म्हणून देतो. भक्तमंडळी मात्र त्याचा आदर न ठेवता प्रसादाचे तुकडे आणि फुले अशी इतस्तत: टाकून देतात.

    पण बाप्पा हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का ?

    अजिबात नाही. एक तर हा प्रसाद कळत -नकळत टाकून दिल्यानं इतर भक्तांच्या पायाखाली तुडवला जातो. त्यामुळे देवाचा अपमान होतो, हे भक्तमंडळींनी लक्षात घ्यायला नको का ?

    खरच की..

    त्याशिवाय मंदिराचा परीसर अस्वच्छ होतो. केवळ देवाला नमस्कार करण्यानं देव प्रसन्न होत नाही. मंदिराचं पावित्र्य न टिकवणाऱ्या भक्तांना तो अद्दलही घडवू शकतो ,बरं का..बाप्पा म्हणाले.

    बाप्पांच्या या कथनावर तजोमयी, त्यांच्याकडे आ वासून बघतच राहिली.

    000

   3

   शनीदेवांच्या मूर्तीला फेरी मारल्यानंतर तेजोमयीनं पाच रुपयांचं नाणं दान पेटित टाकलं.

   हे कशासाठी गं, बाप्पांनी विचारलं.

   माहीत नाही हो बाप्पा, आईबाबा टाकतात म्हणून मी पण टाकते.

   याचा काय उद्देश असेल, याचा कधी विचार केला आहेस का...

   मला वाटतं देवाला आनंद होत असावा.

   पण देवाला कुठे ठाऊक असतं की तुम्ही पैसेच दान पेटीत टाकता की आणखी काही टाकता..

   तेही बरोबरच आहे म्हणा.. मग काय बरं उद्देश असावा या प्रथेमागे.

   हे बघ तेजू, मंदिर म्हणजे आपल्या घरासारखच घर असतं. त्याची स्वच्छता, देवाच्या मूर्तीची देखभाल, देवासाठी प्रसाद, दिव्यासाठी तेल, अगरबत्ती, पूजाऱ्यांचा पगार या साऱ्यांसाठी पैसा लागतो. तो या दानपेटीतूनच मिळतो. ज्या मंदिराच्या दानपेटीत खूप पैसे जमतात त्यांचा उपयोग सार्वजनिक कामांसाठी केला जातो.

   वाव..

   बघ, आपल्या काही प्रथा या किती उपयुक्त असतात.

   पण बाप्पा ही प्रथा कुणी सुरु केली असेल हो.

   कुणी म्हणजे ? मीच. कोई शक ?

   बाप्पांच्या या बोलण्यावर तेजोमयी खळाळून हसली.

   000

   4

   शनीदेवांच्या मंदिरातून बाहेर पडल्यावर तेजोमयीनं बाप्पांना विचारलं.

   बाप्पा , बहुतेकवेळा आईबाबा मंदिरातील दान पेटीत पैसे टाकतात. पण फार कमी वेळेस ते मंदिराच्या बाहेर असणा-या दिनवानी चेह-यांनी दानाची अपेक्षा करणाऱ्या व्यक्तिंकडे बघतही नाहीत.

   हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न.

   तो कसा काय..

   अगं, मंदिराच्या बाहेर दिनवाण्या चेह-याच्या व्यक्ती खरोखरच गरजू आणि परस्थितीने गांजलेल्या असतात का , हा ही प्रश्न असतो. ब-याच वेळा फसवणूकही होऊ शकते. धडधाडक व्यक्तही हात पसरून असतात. त्यामुळे त्यांच्याकडे ब-याचदा दुर्लक्ष होतं.

   पण यामुळे गरजूही भरडला जातो ना..

   काय करणार, ओल्याबरोबर सुकही जळतं, म्हणतात, ते  असं.

   बाप्पांनी तेजोमयीला समजावून सांगितलं. मंदिराचं पावित्र्य टिकवणं, हे भक्तांच्याच हातात असतं, हे तिला कळलं. भक्तमंडळी केवळ उपचारापुरतीच तर मंदिरात जात नाही ना..असाही प्रश्न तिला पडला.. जाऊ द्या.. हा ज्याचा त्याचा प्रश्न..आपण मात्र यापुढे बाप्पांनी सांगितलं, तसचं वागणार. आई बाबांनाही तसचं वागायला सांगणार. शनीदेवांच्या मंदिरातलं झाड वाचवायचा प्रयत्न करणार. तेजोमयी स्वत:लाच म्हणाली..

   नेहमीप्रमाणे बाप्पांनी तिच्या मनातलं ओळखलं.

त्यांनी तिला शाबासकी दिली.तेजोमयी खुदकन् हसली.    

000

  

   सुरेश वांदिले,

 

Comments