अलिबाबाची गुहा
अलिबाबाची गुहा
पुस्तकांची आवड पिंकूस असल्यानं त्यास
सतत नवं पुस्तक लागतं. एखादं पुस्तक हाती आलं की त्याचा फडशा पाडल्याशिवाय त्याला
चैन पडत नाही. पुस्तक वाचनाचं त्याचं वेड इतकं की दोन तीन वर्षात त्याच्या
कॉलनीजवळ असणाऱ्या ग्रंथालयातील पुस्तक जवळपास सगळीच त्यानं वाचून काढली.
ग्रंथालयातील पुस्तकं संपल्यावर, आता काय करायचं, हा प्रश्न त्याने बाबांना केला.
त्यांच्यासाठी हा तसा अनपेक्षितच प्रश्न होता. घरी तर काही ग्रंथालय करणं शक्य
नव्हतं. ते विचार करु लागले आता काय करायचं. त्यांना आठवलं शहरात दूरच्या ठिकाणी
एक मोठं ग्रंथालय आहे. त्याची फी भरुन असंख्य ग्रंथाचं दालन पिंकूसाठी उघडं
करायचं. पण त्यात अडचण अशी होती की ते त्यांच्या राहत्या घरापासून होतं 20 किलोमीटर दूर. इतक्या दूर पिंकूला
एकटं पाठवणं त्यांच्या मनास काही पटेना. त्याच्या सोबत जायचं तर तेही प्रत्येक
वेळेस शक्य होईल असं त्यांना वाटेना. कारण त्यांना बरेचदा कार्यालयातून येण्यास
वेळ होत असे. शिवाय रविवारी ग्रंथालय बंद. त्यामुळे तिथे जाण्यासाठीचा एकमेव दिवस
हातातून गेला. पिंकू त्या 20 किलोमीटर दूर असलेल्या ग्रंथालयात
एकटं जाण्यास तयार होता. त्याने तशी हिम्मत दाखवली. पण बाबांनी काही परवानगी दिली
नाही. आता काय. हिरमुसलेल्या पिंकूने बाबांना विचारलं.
आता काय, हा
प्रश्न बाबांनाही पडला होताच. ते विचार करु लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की
त्यांच्या घरापासून चार पाच किलोमीटर
अंतरावर पुस्तकांचा जुना बाजार भरतो. कॉलनीतील बसस्टॉप पासून तिथे जाण्यासाठी एक
बस आहे. त्या ठिकाणांहून कॉलनीत एक बस आहे. एखादे वेळेस आपणास शक्य झालं नाही तर
पिंकू एकटाही या पुस्तकांच्या जुन्या बाजारात जाऊ शकतो.
आता काय, हा
प्रश्न जेव्हा पुन्हा पिंकूने बाबांना विचारला, तेव्हा
ते आपल्या विचारातून भानावर आले. त्याला
म्हणाले, मी तुला उद्या पुस्तकांच्या
अलिबाबाच्या गुहेतच घेऊन जातो.
वावा ,बाबांचे
हे बोल एकून पिंकू आनंदला.
दुसरा दिवस रविवार असल्यानं बाबांना
सुटीच होती. जेवण करुन दोघेही या जुन्या पुस्तक बाजारात पोहचले. हा बाजार तसा
रस्त्यावरच वसला होता. जिकडे पहावे तिकडे लाकडी फळ्यांमध्ये पुस्तकच पुस्तकं दिसत
होती. शिवाय खाली जमिनीवर शेकड्यानं पुस्तकं टाकलेली होती. एका अशाच ठिकाणी बाबा
आणि पिंकू थांबले आणि मग पिंकू त्या पुस्तकांमध्ये रमला. हे पुस्तक बघू की ते बघू
असे त्याला झाले. वेगवेगळ्या लेखकांची वेगवेगळी पुस्तकं बघून तो हरखून गेला.हे
पुस्तक घेऊ का, ते घेऊ असे त्यास झाले. बघता बघता
त्याने 22 -23 पुस्तकं निवडली. त्याची ही निवड बघून
बाबाही अचंबित झाले. पुस्तकांचा दुकानदारास सुध्दा आनंद झाला. त्याच्या आनंदाचं
कारण वेगळं होतं.आताशा त्याच्या या दुकानाकडे ग्राहक येणं कमी झाले होते. मोठी
माणसंच फार वाचत नसल्याचा हा परिणाम असावा. छोटे वाचक तर अभावानेच येत असत. असे
छोटे ग्राहक आले की दहा-पंधरा मिनिटातच त्यांना पुस्तक बघण्याचा कंटाळा यायचा.
पालक आधीच फारसे उत्सुक असत, त्यामुळे
त्यांचा मुलगाही अनुत्सुकच. एखादं दुसरे पुस्तक खरेदी की संपलं त्यांचं पुस्तक
प्रेम. त्यामुळे पिंकूने 22-23
पुस्तकं विकत घेतली तेव्हा त्या
दुकानदारास विशेषच आनंद झाला. या आनंदात त्याने पिंकूला एक त्याच्या आवडीचं पुस्तक
मोफत दिलं. बाबानं त्याचे पैसे घेण्याची गळ घातली पण दुकानदारानं ते पैसे घेतलं नाही.
त्याने बाबांजवळ त्याचं कौतुक केलं. या कौतुकानं पिंकू सुखावला. इतकी पुस्तकं एकाच
वेळी मिळाल्यानं पिंकूचा आनंद गगनात मावेनासा आला. गोष्टीच्या पुस्तकातली
अलिबाबाची गुहा पुस्तकापुरतीच मर्यादित होती. जुन्या पुस्तकांची दुकानं म्हणजे
खरोखरच अलिबाबाची गुहाच असल्याची त्याची खात्री पटली.
सुरेश
वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment