बंटी आणि बबली(उतरार्ध)


 

बंटी आणि बबली(उतरार्ध)

(पूर्वसूत्र-बंटी आणि बबलीचं वागणं मालकिनबाईंना आगावूपणाचं वाटत होतं. त्यामुळे त्या दोघांवरही सारख्या ओरडत होत्या.बंटी आणि बबलीस आपलं काय चुकलं हे कळत नव्हतं...पुढे काय झालं?)

बंटी जरी तिला आवडला नसला तरी मालकीनबाईने त्याला बाहेर काढल्याचं बघून बबलीस त्याची दया आली. पण ती काहीच करु शकत नव्हती. ती डोळे मिटून शांतपणे निपचित पडून राहिली..

इकडे खोलीच्या बाहेर असलेल्या बंटीला आता काय करावं नि काय करु नये हेच कळेना. इतक्या वर्षात अशी स्थिती कधीच आली नव्हती. बबलीमुळे अशी परिस्थिती आपल्यावर ओढवल्यानं तिला आता सोडायचीच नाही असं बंटीनं पक्क ठरवून टाकलं... म्हणजे काय करायचं, असा प्रश्न त्याला लगेच पडला. कारण बबलीला काहीही करायला गेलं तर मालकीनबाई आपल्याच रागवतील. त्यामुळे सध्या त्यांनी घराच्या बाहेर काढलं पुढे घरातूनच हाकलून लावतील असं बंटीच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने हा विचार डोक्यातून काढून टाकला. चरफडत बसण्याशिवाय काहीच गत्यंतर नसल्याचं त्याच्या लक्षात आलं.

घराच्या बाहेर बंटी अस्वस्थ होऊन दारासमोर इकडे - तिकडे फेऱ्या घालत असताना शेजारचे दोन मोठे कुत्रे तिथे आले. बंटीकडे बघून ते जोरजोराने भुंकू लागले. त्यामुळे बंटिला आता काय करावं हे कळेना. दोन्ही मोठ्या कुत्र्यांना बघून तो घाबरला. त्यामुळे त्याला नीट भुंकता येईना. बबलटीमुळं आपली कित्ती कित्ती वाईट स्थिती झाली हे वाटून त्याला तिचा प्रचंडच राग आला. पण चडफडण्याशिवाय त्याच्या हाती काहीच नव्हतं, हे सुध्दा त्याच्या क्षणात लक्षात आलं.त्यामुळे हिरमुसला.

दोन मोठ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून मालकीनबाई आतल्या खोलितून लगबगीने बाहेर आल्या. त्यांनी दार उघडलं. दोन मोठ्या कुत्र्यांच्या समोर गर्भगळीत झालेला बंटी बघून त्यांचे मन द्रवले. त्यांनी त्या दोन्ही कुत्र्यांना हाकलून लावले. बंटीला आत घेतले.

आत आल्यावर त्यांनी त्याची पाठ थोपटली. त्याच्या केसावरुन हात फिरवला. बंटीला आता कुठं बरं वाटलं. मोठ्याच संकटातून सुटल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले.

त्याला दूध देऊन मालकीनबाई आतल्या खोलित गेल्या. बंटीचं लक्ष झोपलेल्या बबलीकडे गेलं. तिला बघताच त्याच्या मस्तकात पोटतिडिक गेली. या रागात तिच्या अंगावर तो उडी मारणार तोच त्याने स्वत:ला सावरलं. क्षणभर तो तिथे शांत उभा राहिला. त्यानंतर रागारागाने बबलीभोवती फेऱ्या घालू लागला. काही वेळानं बबलीस जाग आली. तिच्या भोवती फेऱ्या घालणारा बंटी बघून तिची बोबडी वळली. घराबाहेर काढलेला बंटी कसा काय इतक्या लवकर आत आला, याचं बबलीला भीतीयुक्त आश्चर्य वाटलं. आता असा हा मोकळा असलेला बंटी आपल्याला सोडणार नाही, याची तिला खात्री पटली. त्यामुळे तिला ग्लानी येऊन ती निपचित पडली. ती अशी अचानक निपचित पडलेली बघून बंटी घाबरला. तो आतल्या खोलित पळाला. मालकीनबाईला त्याने ओढत बाहेर आणलं. बबलीकडे त्यांचं लक्ष वेधलं.

बबलीला ग्लानी आल्याचं मालकीनबाईंच्या लक्षात आलं. त्यांनी तिचा पट्टा सोडला. तिला हातात घेतलं. तिच्या पाठिवरुन त्या हात फिरवू लागल्या. पाणीही पाजलं. थोड्यावेळानं बबलीस बरं वाटलं. तिने डोळे उघडले. ती मालकीनबाईचे हात चाटू लागली. त्या ओल्याशार स्पर्शानं मालकीनबाईसही बरं वाटलं. मालकीनबाई बबलीकडे बघत असतानाच बंटीही तिच्याकडे प्रेमानं बघत होता. त्याच्या डोळयातील तिरस्काराचे भाव आता नाहिसे झाले होते. बंटी आपल्याकडे बघत असल्याचं लक्षात येताच बबली क्षणभर घाबरलीच. आवेगाने मालकीनबाईच्या कुशित शिरली. ती बंटीला घाबरल्याचं मालकीनबाईच्या लक्षात आलं.

अगं, तू घाबरु नकोस, तू निपचित पडली होतीस ना, तेव्हा बंटीनेच मला आत येऊन सांगितलं. नाहीतर तू खूप वेळ अशीच पडून राहिली असतीस बघ.. असं बबलीशी बोलताना मालकीनबाईंच्या डोळयात बंटीबद्दल कौतुकाचे भाव दाटून आले. त्यांनी बंटीला जवळ घेतलं. त्याच्या पाठिवरुन त्या मायेने हात फिरवू लागल्या. काहीवेळानं त्यांनी बबलीला खाली ठेवलं.

आता तुम्ही एकमेकांचे दोस्त झाला आहात हं. त्रास देऊ नका एकमेकांना, खेळा, गप्पा करा.. असं सांगून त्या आतल्या खोलित निघून गेल्या.

आता खोलित बंटी आणि बबली दोघेही मोकळे होते. बबलीला बघून बंटीचा राग अनावर होत होता, तिला खाउु की गिळू असं त्याला झालं होतं. बबलीला सुध्दा, ही बला कशासाठी पुन्हा घरात आली, असं वाटून तिच्या मनात बंटीबद्दल वाईट वाईट विचार येऊ लागले होते.

एकमेकांकडे न बघता दोघांनी विरुध्द दिशेला फतकल मारली. पण दोघांनाही ही शांतता काही मानवेना. बबली बंटीच्या समोर जाऊन बसली आणि तिने त्याची क्षमा मागितली.

तुझ्यामुळे मला आज घराच्या बाहेर जावं लागलं. मालकीनबाईंचा ओरडा खावा लागला, असं बंटी किंचित चढ्या आवाजात बबलीस म्हणाला.

जरा हळू बोल. गुर्रावू नकोस. मालकीनबाईस कळलं की, पुन्हा पुन्हा सांगूनही आपण दोघे भांडण करत आहोत, तर त्या दोघांनाही हाकलून देतील आता. बबली, बंटीला समजावत म्हणाली.

मग तुझं काय म्हणणं आहे. मी तुझी पूजा करु की, तुला डोक्यावरुन घेऊन नाचू.. असं बंटी बबलीस म्हणाला.

तसं तू काही करु नकोस. पण आता तुझी इच्छा असो की नसो किंवा माझी इच्छा असो की नको, आपल्या दोघांना इथं राहायचं असेल तर प्रेमानंच राहवं लागेल. किंवा तसं दाखवावं लागेल. मालकीनबाईस तेच हवं आहे. तसं त्यांनी तुला सांगितलंसुध्दा आहे. बबली, बंटीस म्हणाली.

बबलीचं म्हणणं बरोबर होतं. मालकीनबाईस जर दोघांच्याही भांडणाचा वैताग आला तर त्या हाकलून द्यायला मागेपुढे पाहणार नाही. पण त्या आपल्याच कां बरं हाकलतील. आपण या घरी आधीपासून आहोत. राजपुत्र आहोत. मालकीनबाईचे आवडते. या आज आलेल्या बबलीस मालकीनबाईंच्या गळ्यातील ताईत व्हायला खूप दिवस लागतील. तिलाच त्या हाकलतील.. पण समजा त्यांनी वैतागून दोघांनाही हाकललं तर..  मग ना घर का ना घाटका अशी स्थिती व्हायची, बंटी स्वत:स म्हणाला. त्याला बबलीचं समजावणं आवडलं नसलं तरी तो बबलीकडे पाहून कसाबसा हसला. तिही त्याच्याकडे बघून हसली. या हसण्यामुळे दोघांमध्ये सकाळपासून निर्माण झालेला दुरावा कमी झाला. ताणही कमी झाला.

त्याचवेळी बबलीला गॅलरिच्या खिडकीतून एक उंदिर घरात शिरताना दिसला. तिने बंटीचं तिकडे लक्ष वेधलं. बंटी आणि बबलीने दोघांनी एकाच वेळी त्या उंदरावर उडी मारली. या अनपेक्षित हल्ल्याने तो उंदिर अर्धमेला झाला. या धडपडीचा आवाज आतल्या खोलितल्या मालकीनबाईंच्या कानावर जाताच त्या धावतच बाहेर आल्या.

बंटी आणि बबलीचा पराक्रम त्यांच्या लक्षात आला. अर्धमेल्या उंदरावर त्यांनी एक मोठे कापड टाकले आणि त्याला पिशवित टाकून दूर भिरकावून दिले. मालकीनबाईंच्या चेहऱ्यावर मोठे हसू आलं.

काही दिवसांपासून घरात एका उंदराने मोठाच उच्छाद मांडला होता. या उंदरानं खूप नासधूस केली होती. त्याचा नायनाट असा आपल्या दोन शूरविरांनी केल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. त्यांनी बंटी आणि बबलीस एकाच वेळी एकेका हाताने उचलले. त्यांचे गालगुच्चे घेतले. दोघांचेही खूप कौतुक केलं. दोघांनाही त्यांनी मनसोक्त खाऊपिऊ घातलं...

आपणास या घरी असं कोडकौतुक करुन घ्यायचं असेल तर भांडणतंटा करुन, एकमेकांना पाण्यात पाहून उपयोग नाही. एकमेकांना मदत करत राहिलो तर मालकीनबाईंसोबतच आपलं राहणंही आनंदाचं, मजेचं होणार असं बंटी आणि बबलीस  एकाचं वेळी वाटलं आणि ते दोघेही एकमेकांकडे बघून खूदकन हसले. ते हसू बळजबरीचं नव्हतं. त्यानंतर ते दोघेही आंनदी राहू लागले. त्या दोघांच्या युतीमुळे एकाही उंदराला मालकीनबाईच्या घरात येण्याची हिंम्मत झाली नाही.

०००

सुरेश वांदिले,वाय १/१५,

भ्रमणध्वनी- ९३२४९७३९४७

 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!