बंटी आणि बबली (भाग एक)
बंटी आणि बबली (भाग एक)
मालकीनबाईंनी
एके दिवशी नवी मांजर घरी आणली. त्यामुळे बंटी कुत्रोबाचं डोकं दुखायला लागलं. बंटी
हा घरचा जुना सदस्य. तो एकटाच असल्यानं मालकीनबाई त्याचे खूप लाड करत. त्यामुळे
आपण या घरचे राजपुत्रच अशी समजूत बंटीने करुन घेतली होती. त्याचे दिवस असे छान
मजेत कोडकौतुक करुन घेण्यात जात असतानाच, नव्या मांजरीचं घरी आगमन झालं. हे
त्याच्या पचनी पडलं नाही.
मी,
राजपुत्र घरी असताना या बयेस कां आणावी वाटली मालकीनबाई तुम्हास,
असं त्यांना चांगलं खडसावून विचारावं असं बंटिला वाटलं. पण बंटी हा जात्याच हुषार
असल्यानं तो नवी मांजर घरी आल्यावर गप्प बसला. त्याने तिच्याकडे अनिच्छेनं बघून
हसल्यासारखं केलं. ही बाब मालकीनबाईंच्या लक्षात आली. त्यांनी बंटीला आपल्या जवळ
बोलावून त्याला सांगितलं ...
ही
आता आपल्या घरातील नवी सदस्य. जसा तू, तशी ही. तुझी बहीणच समज हिला. किंवा मग
मैत्रिण. हिला अजिबात त्रास द्यायचा नाही.उलट हिला सगळं समजावून सांगायचं. हिच्याशी
खेळायचं. हिच्यावर रुसायचं नाही. ही तुझ्यापेक्षा लहान आहे. त्यामुळे तिचे हट्ट
पुरवायचे. भांडायचं नाही.. अशा बऱ्याच सूचना बंटीला
मालकीनबाईंनी दिल्या. प्रत्येक सूचनेनंतर बंटी मान डोलवायचा. शेपटी हलवायचा. जणूकाही
त्याला सर्व समजत होतं. तसच त्यांनी सांगितलेलं सर्व मान्यही होतं.
सर्वकाही
सांगून झाल्यावर बंटीनं होकारार्थी मान व शेपूट हलवल्यानं मालकीनबाईंनी त्याला
गुडबॉय म्हणून त्याचे लाड केले. बंटी खुष झाला. मात्र लगेच त्याचं लक्ष मांजरीकडे
गेल्यावर त्याचा चेहरा मलूल झाला.
घरी
आलेली नवी मांजर बंटीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे आणि येणारे सर्व भाव टिपत होती. या
कुत्र्याला आपण इथे आलेलो आवडलेलं नाही, हे तिच्या लक्षात आलं. तिला बंटीचा राग
आला. तसाच मालकीनबाईंचाही राग आला. त्यांच्या घरी आपल्याशिवाय कुणीच असणार नाही. असं
तिला वाटलं होतं. मालकीनबाईने आपल्यापासून बंटीची गोष्ट लपवून ठेवायला नको होती. अस
तिला वाटलं. पण आता नाईलाज होता. आता काही पळून जाणं शक्य नव्हतं. तिला बंटी आवडला
नसला तरी त्याच्यासोबतच या घरी एकत्र राहावं लागणार होतं. याची खुणगाठ तिने मनाशी
बांधली. तिने तोंडावर उसनं स्मित हास्य आणत बंटीकडे बघितलं. बंटीने दुसरीकडे तोंड
फिरवलं. मालकीनबाईंच्या बरोबर लक्षात ही गोष्ट आली. चारपाच दिवसात सारं काही बरोबर
होईल असं त्या मनात म्हणाल्या आणि बंटिला काहीही न बोलता त्या आतल्या खोलित निघून
गेल्या.
जाताना
त्यांनी बंटीला एका साखळदंडानं बांधलं. मांजरीला त्याच्यापासून थोड्या अंतरावर
बांधलं..आतल्या खोलित जाता जाता त्यांनी मांजरीला बबली म्हणून हाक मारली. आजपासून
तू बबली. तिच्याकडे बघत मालकीनबाई म्हणाल्या. हा बंटी आणि तू बबली. काय रे
बंट्या छान नाव आहे ना तुझ्या बहिणीचं, सॉरी म्हणजे तुझ्या मैत्रिणीचं. बंटीकडे
बघत त्या म्हणाला. नाही असं म्हणावं बंटीला वाटलं. पण आपल्या चतुर मालकीनबाईंना ते
आवडणार नाही, हे त्याला पक्क ठाऊक होतं. त्यामुळे त्याने होकारार्थी मान हलवली. त्यामुळे मालकीनबाईंनी पुन्हा एकदा त्याला
गुडबॉय म्हणून त्याचे लाड केले. बंटी सुखावून गेला.
मालकीनबाई
आतल्या खोलित गेल्यावर त्याचं लक्ष पुन्हा बबलीकडे गेलं. त्याचा नूर पालटला. तो
बबलीकडे बघून गुर्रावला. तीसुध्दा त्याच्याकडे बघून गुर्रावली.
जास्त
शहाणपणा करु नकोस. नाही तर तुला मी इंगा दाखवीन आणि हाकलून लावेन घराच्या बाहेर.
बंटी बबलीला म्हणाला.
जा
रे, आला मोठा मला हाकलून देणारा, तू तसं केलस तर तुला सोन्याचा हार नाही देणार
मालकीनबाई. तुला माझं सरंक्षण करण्याचं त्यांनी सांगितलंय. तुला ते करता येत
नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं की तुला त्या हाकलून लावलतील. रस्त्यावर येशील मग. रस्त्यावरुन
जाणाऱ्या एखाद्या वाहनाखाली येशील आणि पाय तुटून लंगडाच होशील. मग तुला बोंबलत
बसावं लागेल. सारेजण तुला लंगड्या लंगडया म्हणून चिडवतील.
असं बबली बंटीला वेडावत म्हणाली.
आज आपल्या
घरी आलेली ही मांजरी आपल्या मुळावरच आल्याचं बघून बंटी रागानं लालीलाल झाला. तिला
खाऊ की गिळू असं त्याला झालं. त्याने पट्याला जोरदार हिसका दिला. त्यामुळे तो आणखी
त्याच्या गळ्याभोवती घट्ट चिटकला. गळा दाबल्या गेल्यानं बंटी ओरडू लागला. त्याचं
ते ओरडणं ऐकून मालकीनबाई आतल्या खोलितून धावत बाहेर आल्या. त्याने तत्काळ पट्टा
ढिला केला. तेव्हा कुठे बंटीला बरं वाटलं. त्याची ती अवस्था बघून बबलीस हसू आवरत
नव्हतं. पण मोठ्या कष्टानं तिने आपलं हसू दाबून ठेवलं.
अरे,
गधड्या नसते उपदव्याप करायला सांगितलं कुणी तुला. अशाने तुला गळफास लागायचा ना. असा,
उगाच जास्त आगावूपणा करु नकोस. शांतपणे पडून राहा..अशी
दमदाटी करुन मालकीनबाई आत गेल्या. त्या आत जाताच बबली फिस्स्कन हसली. बंटीचा राग
अनावर झाला. पण आता आपण काही हालचाल केली तर पुन्हा पट्याचा गळफास आवळला जायचा, हे
त्याच्या लक्षात आलं नि त्याने एक जळजळीत नजर बबलीकडे टाकून डोळे मिटून घेतले. ते
बघून पुन्हा बबली फिस्कन हसली. हा आनंद व्यक्त करण्यासाठी तिने स्वत:भोवती गिरकी
घेण्याचा प्रयत्न केला तर तिची मान पट्याभोवती आवळली गेली. वेदनेने व्याकूळ होऊन
ती जोरजोरात ओरडू लागली. बंटीने डोळे उघडले. बबलीची ती अवस्था बघून बंटी फुर्रकन
हसला.
एवढ्यात
मालकीनबाई आतमधून बाहेर आल्या. त्यांना बघून बंटीने चेहऱ्यावर गंभीर भाव आणले. त्याच्याकडे
एक नजर टाकत, मालकीनबाईंनी बबलीच्या गळ्याभोवतीचा पट्टा सैल केला. त्यामुळे बबलीस
हायसं वाटलं. पण मालकीबाईंच्या बोलण्यानं तिचं हे सुख दोन क्षणही टिकलं नाही. मालकीनबाई
तिच्याकडे रागानं बघत म्हणाला,
अग, भवाने
शांत बसायचं सोडून हे काय सुरु आहे तुझं. मघा बंटीचं डोकं फिरलं होतं. आता तुझं
डोकं फिरलेलं दिसतय. गळा आवळला असता तर गेली असतीस ना बाराच्या भावात. आँ. काही शिरतय
का तुझ्या डोक्यात. बबलीकडे रागानं बघत मालकीन बाई म्हणाली. बबलीचा असा पाणउतारा
होत असल्याचं बघून बंटीचा आनंद गगणात मावत नव्हता. आता त्याच्याच्याने रहावेना. त्याने
मालकीनबाईकडे पट्यासह उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा एकदा तयाची मान
आवळली गेली. मटकन खाली बसून तो ओरडू लागला. मालकीनबाईने बबलीकडून आपलं लक्ष दूर
करत बंटीकडे धाव घेतली. त्यांनी त्याचा पट्टा सोडला. तेव्हा कुठे त्याला बरं
वाटलं. तो मालकीनबाईच्या कुशित शिरण्याचा प्रयत्न करु लागताच, त्यांनी त्याला दूर लोटून
त्याचे कान उपटले.
काय
रे गधड्या, तुला सांगून गेले होते ना की, तू आगावूपणा करु नकोस म्हणून. पण तू जरा
जास्तच शहाणपणा करायला लागला आहेस. तुला शिक्षा झालीच पाहिजे.
आँ.. बंटीने आँ फाकून
मालकीनबाईकडे केविलवाण्यानजरेनं बघितलं. पण मालकीनबाईस त्याची दया आली नाही.
त्यांनी दार उघडलं. बंटीला खोलिच्या बाहेर काढून दरवाजा लोटून दिला. पुन्हा आत
जाताना त्यांनी बबलीस, आता तू काही आगावूपणा केला तर तुलाही अशीच शिक्षा करीन,
अशी तंबी दिली. आपण काही करणार नाही, अशा आशयाची मान बबलीनं हलवली.(अपूर्ण)
.png)
Comments
Post a Comment